Monday, June 22, 2009

दैनिक सत्यप्रभा आता इंटरनेटवर

नमस्कार मित्रांनो,
नांदेडच्या 'दैनिक सत्यप्रभा' या वृत्तपत्राची आवृत्ती आता इंटरनेटवरही उपलब्ध झाली आहे.
आणि अशा प्रकारे नांदेडच्या स्थानिक वृत्तपत्राची आवृत्ती सर्वप्रथम इंटरनेटवर आणण्याचा बहुमानदेखील दैनिक सत्यप्रभानेच पटकावीला आहे. :-)

साईटवरच्या काही सुविधा अजून पुर्णपणे कार्यान्वीत झाल्या नसल्या तरी लवकरच त्या सुरळीत होतील आणि तुम्हाला त्यांचा फायदा घेता येईल अशी आशा करूयात.

दैनिक सत्यप्रभाच्या भावी वाटचालीस 'नांदेडीअन्सतर्फे' हार्दिक शुभेच्छा !


:: Link ::
http://satyaprabha.com/



Friday, June 5, 2009

ती फाईटर प्लेन्स आता नांदेडात

तामसा आणि भोकर परिसरात घिरट्या घालणाऱ्या "त्या" विमानांबद्दल आपण अगोदरच वाचलं असेल.
मित्रांनो, तीच विमानं आता गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहरावर घिरट्या घालीत आहेत.
अगदी कमी उंचीवरून, प्रचंड आवाज करीत आणि अतिशय वेगाने ही विमानं नांदेड शहरावरून उड्डाण घेत आहेत.



नांदेडीअन्स अशी विमानं नांदेडमध्ये पहिल्यांदाच पाहात आहेत त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनातवेगवेगळ्या शंका - कुशंका निर्माण होत आहेत की ही विमानं नांदेडमध्ये कशासाठी, इतक्या खालून उडण्यामागेत्यांचे प्रयोजन काय, वगैरे वगैरे.
अजूनपर्यंत कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा वृत्तपत्राने याबाबत कोणतीच माहिती जाहीर केली नसल्यामुळे यातर्क-वितर्कांना अजून उधानच येत आहे.
सकृतदर्शनी ही विमानं दिसायला भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेल्या "हॉक" विमानांसारखीच दिसत आहेत.



आपणा सर्वांना तर माहितच आहे की बिदर (कर्नाटकातील एक जिल्हा) येथे भारतीय वायुसेनेचे तळ आहे.
माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः वर्षभरापुर्वी आपल्या वायुसेनेने काही "हॉक" विमानं विकत घेतली होती आणिती विमानं बिदर येथेच कार्यरत आहेत. (माझी माहिती बरोबरच असेल याची काही शाश्वती नाही.)
असा अंदाज बांधायला काही हरकत नाही की ही विमानं "हॉक"च असतील आणि ती नांदेड येथे काही सराव करतअसतील.
पण हा सर्वस्वी एक अंदाजच आहे, ऑफिशीयल माहिती मिळेपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही.


:: Photos ::



ता.क. :- या साईटवरील चित्रं आणि माहिती पाहून ही विमानं "British Aerospace Hawk 132 ZK122" आहेत असे दिसून येते.

http://www.airplane-pictures.net/image31781.html

Wednesday, June 3, 2009

लातुरच्या राजस्थान विद्यालयात तोडफोड

अहो, लातुरचा उल्लेख असला म्हणून काय झालं, नांदेडशीच संबंधित आहे ही बातमी.

अरे नाही, कोणत्या राजकीय वादातून नाही झाली ही तोडफोड.
अहो तुम्हाला तर माहितच आहे ना, आपल्या मुखेड तालुक्यातील १२वीच्या परिक्षेतील सामुहिक कॉपी प्रकरण!
तेच ते, ज्यात सुरूवातीला लातुर बोर्डाने फक्त १६० परिक्षार्थ्यांनाच चौकशीकरीता बोलाविलं होतं पण नंतर अधिक चौकशीनंतर विद्यार्थ्यांची हीच संख्या ३,००० पर्यंत पोहोचली.

उद्या महाराष्ट्रात सगळीकडे १२ वीचा निकाल लागेल, पण मुखेडच्या या ३,००० विद्यार्थ्यांना मात्र निकालासाठी अजून बरीच वाट पाहावी लागण्याचे चिन्हं दिसत आहेत कारण लातुर बोर्डाने या सर्वच्या सर्व ३,००० विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.



याच विद्यार्थ्यांच्या संतापाचा फटका आज दुपारी लातुर येथील राजस्थान विद्यालयाला बसला.
विद्यार्थ्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड केली, तसेच पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी केलेल्या सौम्य लाठीमारात एका पत्रकाराचा कॅमेराही फुटला त्यामुळे स्थानिक पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली.



या विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉफी केल्याचा आरोप महाविद्यालय आणि मंडळाचा असून, विद्यार्थ्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. महाविद्यालयाने जाणून-बुजून निकाल राखीव ठेवले असून, हे निकाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



बघुयात पुढे हे प्रकरण काय वळण घेते.

या बातमीच्या अपडेट वेळोवेळी पोस्ट करण्यात येतील.




ता. क. :- (
मंगळवार ४ जून, ९:३० AM)
आमचे मित्र सौरभ कौरवार यांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठविला आहे.
हा व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या मोबाईलमधून शूट केला आहे.
काल जेव्हा तोडफोड झाली, तेव्हा सौरभ कौरवार हा राजस्थान विद्यालयातच होता.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tuesday, June 2, 2009

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पाहण्याची आज सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा
Monday, June 01st, 2009 AT 11:06 PM


नांदेड - अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक अगदी साध्या डोळ्यांनी पाहण्याचा सुवर्णयोग नांदेडकरांच्या वाट्याला आला आहे. मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी ०७.३४, ०७.३९ व ०७.४१ या तीन वेळी हे स्थानक नांदेडच्या उत्तर पश्‍चिम आकाशातून साध्या डोळ्यांनीही स्पष्ट दिसेल. अंतराळप्रेमींनी ही संधी गमावू नये, असे आवाहन महात्मा गांधी मिशनच्या अंतराळ व खगोलशास्त्र तंत्रशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक दरदिवशी पृथ्वीला जवळपास १६ प्रदक्षिणा घालते. मात्र, काही विशिष्ट दिवशीच आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणाहून हे अंतराळस्थानक पाहता येणे शक्‍य आहे.
मंगळवारी ही संधी उपलब्ध होणार असून आकाश जर निरभ्र असेल तर साध्या डोळ्यांनीही ते पाहता येईल.
या स्थानकाला जोडलेल्या उपकरणांवर सूर्यप्रकाश पडल्याने ते प्रकाशमान होणार असून या वेळी त्याची तेजस्विता एखाद्या ताऱ्याप्रमाणे (उणे १.२) भासेल.

आकाशातील उत्तर ध्रुवाजवळून सप्तर्षी तारकासमूह, भुतक मार्ग, वृश्‍चिक तारकासमूहाकडे, असा या अंतराळ स्थानकाचा मार्ग असेल. भुतकजवळ असताना ते अगदी स्पष्टपणे ओळखता येईल. या वेळी उत्तर क्षितीजावरून जवळपास ३७ अंश उंचीवर ते दिसणार आहे.
१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक असेल. तेव्हा ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे असेल. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे.
या स्थानकाचे पृथ्वीजवळ असतानाचे अंतर ३५० किलोमीटर एवढे असते. तेव्हा ते साध्या डोळ्यांनी पाहणे शक्‍य आहे. तासाला २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

पृथ्वीवरील गुरत्वीय बदलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. वजन विरहीत अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल, जेणेकरून मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.

मूळ अंतराळस्थानकाला आतापर्यंत १४ वेगवेगळ्या उपकरणांनी जोडलेले आहे. या अंतराळ स्थानकात आजवर भारतीय वंशाच्या कल्पना चावला व त्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी काम केले आहे. कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुनीता विल्यम्स यांनी सलग सहा महिने या स्थानकात वास्तव्य करण्याचा विक्रम केला आहे, असेही श्री. औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.



Monday, June 1, 2009

हिंगोली गेट उड्डाणपुल

मित्रांनो, काल (रविवार, ३१ मे २००९ रोजी) शहरातील हिंगोली गेट परीसरातील उड्डाणपुलाची दुसरी बाजूसुद्धा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या निश्चितच थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी होईल.

याबद्दल आपले काय मत आहे ?

Thursday, May 28, 2009

घिरट्या घालणारे विमान कुणाचे ?

तामसा, दि.२७ (२८-०५-०९ --> १२:४८)


मागील दोन दिवसांपासून एक विमान सतत तामसा व परिसरात घिरट्या घालत असल्याने चर्चेला विषय बनला आहे.
घिरट्या घालणारे विमान कुणाचे असेल याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

दि. २६ मे रोजी दुपारी ३ वाजता तामसा व परिसरात एक विमान आले व ते २०० - ३०० फुटाच्या उंचीवरून उडू लागले. यामुळे उन्हाच्यावेळी घरात बसलेले नागरिक घाबरून घराबाहेर पडले कारण त्या विमानाचा आवाज न कळाल्याने तो भूकंप तर नाही ना असा प्रश्न पडला.
त्या भितीने सर्व जण घाबरले.
२७ मे रोजी सकाळी ११ वाजता तेच विमान तामसा व परिसरातून पुन्हा एकदा घिरट्या घालून गेल्याने नागरिक आश्चर्यचकीत होऊन भयभीत झाले, कारण ते विमान मागील पाच ते सहा दिवसांपासून सरसम, भोकर, वसमत, तामसा येथेच घिरट्या घालत आहे.
काही गावांतून विमान कोसळल्याच्या अफवासुद्धा पसरत आहेत.
सदरील विमानाबद्दल तामसा पोलिसांना विचारले असता विमानाबद्दल काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सदरील विमान हे सी.आर.पी.एफ. किंवा सैनिकांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमानासारखे दिसून येत होते.
दुसरीकडे या विमानाबाबतची माहिती नांदेड येथील सुरक्षारक्षकाला मोबाईलवरून विचारली असता येथे विमानतळ झाले असल्याचे वैमानिकाला विमानतळाचा बरोबर अंदाज येत नसल्याने ते खालून व दुरून घिरट्या घेत आहे.

हे विमान मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमिताताई चव्हाण यांच्या खाजगी दौऱ्यासाठी आले असल्याचे सांगितले जाते.


--- दैनिक लोकमत

Wednesday, May 20, 2009

महापुरूषाच्या पुतळ्याने महापालिका कामाचे पितळ उघडे पाडले !

आठवड्याभरापुर्वीच झालेल्या पावसामुळे शहारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नव्यानेच लावण्यात आलेला रंग निघून गेला होता आणि त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर दोन ठिकाणी बसेसच्या काचासुद्धा फोडल्या होत्या.

त्याच बातमीच्या अनुषंगाने श्री. ऋषिकेश कोंडेकर यांनी बुधवार, दि.२० मे २००९ रोजीच्या दैनिक समिक्षामध्ये एक डोळ्यात अंजन घालेल असा लेख लिहीला आहे.
तोच लेख मी इथे पोस्ट करत आहे.


नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने महापुरूषांच्या पुतळा सुशोभिकरणावर झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या खर्चावर पाणी फेरले गेले. पुन्हा एकदा गुरू-ता-गद्दीच्या कामातील पडद्यामागचा कारभार आता हळूहळू पुढील नियमीत पावसाने पावसाळ्यात जनतेसमोर येतो की काय अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

गुरू-ता-गद्दीचा सोहळा म्हणजे शहराला मिळालेले एक 'वरदान’ होते.
याच सोहळ्याने नांदेड शहराला विकासासाठी करोडॊ रूपयांचा निधी प्राप्त करून दिला, पण म्हणतात ना "दैव देते पण कर्म नेते", तशीच गत आता शहरवासीयांची होते की काय असा प्रश्न सामान्य जनाच्या मनात घर करून बसला आहे. प्रश्नाला वाचा फोडायला कोणीही समोर येत नाही हे पाहून महापालिकेने केलेल्या गैरकारभाराच्या उघडकीची सुरूवातही शिवरायांच्या पुतळ्यालाच करावी लागली अन शेवटी पुतळ्याने आपले लढवय्ये रूप दाखवून दिले.
बाकी महापुरूषांचे पुतळे मात्र शांत असून बिचारे गांधीबाबा मात्र आपल्या हातात काठी घेऊन तटस्थ अवस्थेत हे करोडो रुपयांचे वाटोळे आपल्या नजरेने पहात स्तब्ध उभे आहेत.

गुरू-ता-गद्दीमुळे करोडो रूपये खर्च करून तात्पुरते निवारे, रस्ते, पाण्याच्या सोयी, वीज व इतर सुविधांवर कसा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आणि त्यावर शेवटी कसे पाणी फिरले हे चित्र अद्यापही नांदेडीअन्स विसरले नाहीत.
शहराच्या मुख्य हॉटमिक्स रस्त्यावर कॉंक्रीटची भर टाकून उंचच उंच रस्ते शहराची की कंत्राटदाराची आर्थिक स्थिती उंचावीत आहेत, असाही प्रश्न सामान्यांच्या मनात आहेच.
अहो इतकंच काय, प्रथम रोड करायचा व नंतर मधोमध ड्रेनेज लाईन किंवा पाईप लाईनसाठी खोदायचा. यात कसले नियोजन आहे हे तज्ञ अभियंत्यालाही कळणार नाही. पण पैसे उपलब्ध आहेत ना, मग ते ठराविक कालावधीत खर्च झालेच पाहिजेत म्हणून तर हा सारा खटाटोप नाही ना ?
आजपर्यंत शहरातल्या ओव्हरब्रीजचं उदाहरण घेतलं तर शिवाजीनगरचा ब्रीज अधुरा तर हिंगोली गेटचा एका पायाचा.
रस्ता रूंदीकरणामध्ये पादचारी मार्गासाठी भलीमोठी जागा, रस्त्यालगतच पार्किंगची सोय पण पार्किंग मात्र रस्त्यावरच.
बिचारे पोलिस तरी काय करतील, शेवटी तीसुद्धा माणसंच आहेत ना!
शहराच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे रस्त्याची रूंदी वाढविणे आवश्यक होते, ती वाढलीही पण पादचारी आणि सायकलमार्गामुळे रस्ते प्रसरण पावण्याऎवजी आकुंचनच पावले.

ऎवढा सगळा खटाटोप फक्त सुंदर नांदेडसाठी आणि कराचा बोजा मात्र सामान्य नागरिकांच्या माथी.
डोक्यावर अफाट कर्जाचा बोजा पडायला लागल्यावर जनतेला या सुंदर संकल्पनेचा आस्वाद तरी कसा घेता येईल ?

पण काही असो, पहिल्याच अवकाळी पावसाने महापालिकेच्या गुरू-ता-गद्दी कार्यक्रमादरम्यान झालेल्या विविध कामातील गैरप्रकार उघडकीस येण्याची सुरूवात महापुरूषाच्या पुतळ्यापासून झाली आणि आता नियमीत पावसाळा कशा-कशावर पाणी फेरतो आणि किती जणांना घेवून बुडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunday, May 17, 2009

किनवटचे जंगल आणि पैनगंगा अभयारण्य

नमस्कार मित्रांनो,
सुट्ट्या असल्यामुळे नुकताच मी किनवट आणि पैनगंगा अभयारण्यात फिरून आलोय. (किनवटचे जंगल आणि पैनगंगा अभयारण्य यात गल्लत करू नका, दोनिही वेगवेगळी ठिकाणं आहेत.)
किनटच्या जंगलाचा पूर्ण भाग हा नांदेड जील्ह्यातच मोडतो तर पैनगंगा अभयारण्याच्या अगदीच थोड्या भागाचा समावेश नांदेड जील्ह्यात होतो आणि उर्वरित भाग हा यवतमाळ जील्ह्यात मोडतो.

दोनीही जंगलं वन्यप्राण्यांच्या वसतीस्थानाच्या दृष्टीने अगदी परीपूर्ण आहेत पण किनवटचे जंगल हे अभयारण्य नसल्यामुळे साहजिकच तीथे माणसांचा अधिक जास्त वावर आहे.

२-३ दिवसांची सुट्टी काढून किनवटच्या जंगलात आणि पैनगंगा अभयारण्यात एकदा फिरून याच !


मी माझ्या किनवट भेटीदरम्यान काढलेल्या काही फोटो.
:: Click Here ::




:: महत्त्वाचे अंतरदर्शक ::
नांदेडपासून किनवट शहर हे १४० कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
किनवटपासून उनकेश्वरचे अंतर ३५-४० कि.मी. आहे.
आणि पैनगंगा अभयारण्याची हद्द किनवट रेल्वे स्टेशनपासून ३ कि.मी. अंतरावर सुरू होते.

:: राहण्याची व्यवस्था ::
पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे.
किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.

:: जवळची ठिकाणे ::
नांदेड किनवट रस्त्यावर हिमायतनगर तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा.
किनवटपासून ३५-४० कि.मी. अंतरावर उनकेश्वर येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे.
उनकेश्वरहून जवळच देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदीर.