सोमवारी National Geophysical Research Institute च्या तज्ञ्यांचे एक पथक नांदेडला आले होते.
त्यांनी हे स्पष्ट केले की हा प्रकार भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचाच आहे, शिवाय असे धक्के अजून काही आठवडे बसण्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.
रविवारी एकंदरीत २० धक्के जाणवले होते आणि त्यापैकी ४ धक्के २ रिश्टर स्केलचे होते.
सोमवारीसुद्धा दिवसभरात भूकंपाचे ४ धक्के जाणवले, त्यातल्या सकाळी ५:१५ च्या भूंकपाची रिश्टर स्केलवर २.३ इतकी नोंद झाली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा भूगर्भातून आवाज सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ता.क. :- (ईसकाळ 26-Oct-10)
नांदेड - ऐन दिवाळीच्या तोंडावर अवतरलेले भूकंपाचे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना अशी नांदेडकरांची अवस्था झाली आहे.
मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊपासून पुन्हा गूढ आवाजांना सुरवात झाली.
बुधवारी (ता. 27) सकाळी सहापर्यंत जवळपास 18 आवाज झाले.
पैकी चार आवाज मोठे होते आणि त्याची रिश्टर स्केलवर नोंद 2.28 आणि 2.25 एवढी नोंदली गेली.
आवाज होताच पळापळ होऊन नागरिक घराबाहेर येत आहेत.
सध्या सहामाही परीक्षा सुरू आहेत; पण भूकंपाच्या आवाज व हादऱ्यांनी विद्यार्थ्यांचीही झोप उडाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी एकदा भूकंपाचा आवाज झाला होता; परंतु तेव्हा त्याला भूकंप मानायला कोणी तयार नव्हते.
त्यानंतर रविवारी (ता. 24) सकाळी पाच वाजता मोठा आवाज झाला आणि हादराही चांगलाच जाणवला.
रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.3 एवढी नोंदली गेली आणि प्रशासन सतर्क झाले.
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य वैज्ञानिक श्रीनागेशा हेदेखील सोमवारी येऊन पाहणी करून गेले.
त्यांनी हा भूकंपाचाच पण सौम्य धक्का असल्याचे सांगितले.
नांदेडचा परिसर "सी झोन'मध्ये येत असल्याने फारसा धोका नसला तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
रविवारपासून सुरू झालेला हा सिलसिला थांबायला तयार नाही.
मंगळवारी रात्रीपासूनच आवाज आणि हादऱ्यांची मालिका सुरू झाली.
रात्री साडेनऊ, बारा, साडेबारा अशा प्रकारे सकाळी सहापर्यंत 18 धक्के जाणवल्याचे या भागातील लोक सांगतात. या प्रकाराने नागरिकांची घाबरगुंडी उडाली असून, किरायेदार घर सोडून जात आहेत.
रात्र-रात्र जागून काढावी लागते आहे.
घराबाहेर बसून गप्पाटप्पा करीत कशीबशी रात्र काढावी तर घाण आणि त्यामुळे झालेले डास एक सेकंदही बसू देत नाहीत.
महापालिका साफसफाईत सपशेल अपयशी ठरल्यानंतर नागरिकच आता श्रमदानाने साफसफाई करीत आहेत. त्यांनाच रात्र बाहेर जागून काढायची असल्याने ही पाळी ओढवली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षण, नोकरीसाठी आलेली मंडळी सुरक्षित घर शोधण्याच्या कामी लागली आहे.
कित्येकजण तर गावाकडून येणे-जाणे करण्याच्या तयारीने स्थलांतरित झाले आहेत.
जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक ज्यांची गावे रेल्वेमार्गावर आहेत, असे लोक निघून गेले आहेत.
मालकीहक्क असलेले नागरिक घरे विकण्याची मानसिकता करीत आहेत.
कित्येकजण दिवाळीच्या सुट्या लागण्याची वाट पाहत आहेत.
एकदा का सुट्या लागल्या की, त्यांनाही किमान पंधरा दिवस या भागापासून फारकत घेणे शक्य होणार आहे.
चार हादरे मोठे
मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊपासून बुधवारी (ता. 27) सकाळी सहापर्यंत अतिशय सौम्य असे अनेक हादरे बसले; परंतु त्यातल्या त्यात जाणवणारे हादरे 18 होते. त्यापैकी चार तर 2.25 आणि 2.28 रिश्टर स्केल एवढ्या नोंदीचे होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष पावडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
ता.क. :- (27-Oct-10)
काल नांदेड शहर पुन्हा भूकंपाने हादरले.
काल (बुधवारी) शहराला लहान-मोठे अनेक धक्के बसले, पण सायंकाळी ७.२२ वाजता भूकंपाचा मोठा हादरा बसला.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.३ एवढी नोंदविल्या गेली.