Sunday, February 27, 2011

मराठीतून लिहा.

‘श्री. माधव शिरवळकर’ हे नाव तुम्हाला माहित असेलच.
संगणक आणि त्यासंबंधीत विषयांना त्यांनी त्यांच्या लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे सहज-सोप्प्या मराठी भाषेतून साज चढवलेला आहे.

त्यांच्याबद्दल इथे सांगण्याचे कारण की आज लोकसत्ताच्या ‘लोकरंग’मध्ये त्यांचा "मराठी ब्लॉग : एक रांगतं माध्यम" हा लेख प्रकाशित झाला आहे आणि त्यात नांदेडचा उल्लेख आहे.
त्या लेखातला काही भाग मी इथे देत आहे :

"मध्यंतरी नांदेडमध्ये गेलो असताना तेथील सायबर कॅफेत आलेल्या काही तरूण मित्रांशी याबाबत संवाद साधला.
ते म्हणाले, ‘आम्ही फेसबुकवर भेटतो, गप्पा मारतो, पण मराठी टायपिंग करता येत नाही. कसंतरी इंग्रजी कम मराठीतच मॅनेज करतो. फेसबुकचं मराठी सेटिंग अजून जमत नाही.’
इंग्रजी कच्चं आणि मराठी पक्कं नाही, अशा स्थितीतही फेसबुकवर बसणारे तरूण हजारोंच्या संख्येने आहेत.
हे तरूण मठ्ठ आहेत, असं मात्र अजिबात नाही.
उघडय़ा डोळ्यांनी ते आज जे घडतं आहे, ते पाहत आहेत, ऐकत आहेत, कदाचित कमी वाचत असतील, पण त्यांना जगात काय चाललं आहे, हे कळतंय आणि त्यांची त्यावरची आपली स्वतची मतं आहेत.
ही मतं विस्ताराने लिहावीत, यासाठी त्यांचे मराठी सेटिंगचे म्हणजे ‘युनिकोड’ तंत्राबद्दलचे अज्ञान किंवा अपुरे ज्ञान यासाठी काहीतरी करायला हवे.
तसे झाल्यास आज दिसणाऱ्या मराठी ब्लॉग्जचा दर्जा अनेक पटींनी वाढण्यास मदत होईल.
"

खरंच इतके अवघड आहे का हो मराठीतून टाईप करणे ?
आपला हा ब्लॉग सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून ‘मराठी टायपिंग कसे करावे ?’ हे सांगणारी विकिपीडीयाची लिंक मी ब्लॉगवर ठेवलेली आहे.
तुम्ही प्रयत्न तर करून पहा मराठीतून लिहिण्याचा, काही अडचण आली तर मी आहे ना मदतीला.

लेख :- मराठी ब्लॉग : एक रांगतं माध्यम
वाचा :- आजचा लोकरंग

मराठी भाषा दिन.

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! :-)

Saturday, February 26, 2011

रेल्वे अर्थसंकल्प.

 रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या अर्थसंकल्पात नांदेडच्या पदरी काय पडले ?

 नवीन रेल्वे :-
1) हावडा - नांदेड
2) विशाखापट्टणम - नांदेड ( व्हाया विजयवाडा सिकंदराबाद )
3) कोल्हापूर- नागपूर ( व्हाया अकोला, पूर्णा, लातूर )
4) नांदेड - पुणे ( व्हाया लातूर, कुर्डुवाडी )
5) तिरुपती - अमरावती ( व्हाया नांदेड, निझमाबाद )
6) संबललपूर - नांदेड ( व्हाया विशाखापट्टणम, राजमंड्री, सिकंदराबाद )
7) जालना -औरंगाबाद- नगरसोल
8) नरसापुर - नगरसोल ( व्हाया निझामाबाद )
--------------------------------------------------------------

विशेष म्हणजे मुदखेड ते परभणी हा रेल्वे ट्रॅक आता दुहेरी होणार आहे त्यामुळे "नो क्रॉसींग".


* दक्षिण-मध्य रेल्वेचे नांदेड डिव्हिजन *
या अंतर्गत महाराष्ट्र-मध्यप्रदेश-आंध्र या तीन राज्यातील एकूण 11 जिल्हे येतात.
त्यात राज्यातील नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्याचा काही भाग, अकोला,वाशिम,हिंगोली हे जिल्हे येतात.
- या डिव्हिजन अंतर्गत एकूण 105 रेल्वे स्थानक आहेत. त्यातील 3 जंक्शन आहेत.
- या डिव्हिजन अंतर्गत एकूण 1000 किमी चा लोहमार्ग आहे.
- केवळ अकोला खंडवा हा 180 किमी लोहमार्ग मीटर गेज आहे उर्वरित सर्व लोहमार्ग ब्रॉडगेज आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

1 एप्रिल 2010 ते 31 जानेवारी 2011 पर्यंत नांदेड डिव्हिजन अंतर्गत प्रवाशी वाहतुक ( सर्व आकडे लाखांत ) :-
344.89 (मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 4.63 टक्के आहे.)

प्रवाशी वाहतुकीतून मिळालेले उत्पन्न - 14007 (मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 10.24 टक्के आहे.) :-

1 एप्रिल 2010 ते 31 जानेवारी 2011 पर्यंत नांदेड डिव्हिजन अंतर्गत माल वाहतुक उत्पन्न ( सर्व आकडे लाखात ) :-
3797 ( मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 37.67 टक्के आहे. )

1 एप्रिल 2010 ते 31 जानेवारी 2011 पर्यंत नांदेड डिव्हिजन अंतर्गत सर्व मार्गाने मिळालेले उत्पन्न :-
19510 (मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 15 टक्के आहे.)


--- सौजन्य :- श्री. योगेश लाठकर ---

याशिवाय नांदेड-देगलूर-बिदर या मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे, तसेच मुदखेड -परभणी मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला मंजूरी मिळाली आहे.

Saturday, February 12, 2011

नांदेड अहेडचा दणक्यात शुभारंभ.

 अभिनंदन नांदेडीअन्स !. :-)
‘नांदेड अहेड’च्या पहिल्याच दिवशी अनेक उद्योगपतींनी नांदेडमध्ये गुंतवणुक करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.


‘नांदेड अहेड’ परिषदेत काल झालेल्या घोषणा :-

उद्योगपती खा. राजकुमार धूत :- व्हिडीओकॉनचे कॉल सेंटर सुरू करण्यात येईल ज्यात १००० ते १५०० युवकांना रोजगार मिळेल.
 
श्री. विनित मित्तल :- ‘वेलस्पन’ तर्फे बाराशे कोटी रुपयांची गुंतवणुक.

मा. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील :- राज्यातील मोजक्‍या चार ते पाच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ‘ऍग्रो इकॉनॉमिक झोन’साठी नांदेडचा प्राधान्याने विचार केला जाईल.

टाटा स्टीलचे उपाध्यक्ष श्री. सेनगुप्ता :- जागा उपलब्ध करुन दिल्यास पोलाद प्रकल्प सुरू करणार.

रिलायन्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या बसरकोड :- लवकरच तिरुपती, हैदराबाद, बेंगलोर आणि पंजाबसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी अनिल अंबानी यांच्या वतीने सांगितले. नांदेड विमानतळाचा विस्तार.

सी.आय.आय.चे अध्यक्ष अरुण नंदा :- जागा उपलब्ध झाल्यास अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करणार.

एस.बी.एच.चे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर गर्ग :- एस.बी.एच. बॅंकेच्या दोन नव्या शाखा, एक प्रशिक्षण संस्था आणि विभागीय कार्यालय सुरू करण्यात येतील.

Thursday, February 10, 2011

Diamond Triangle Expedition

भारतीय सेनेच्या Corps of Signals या दलाची १९११ रोजी स्थापना झाली होती. (या दलाला Information Warriors या नावानेही ओळखल्या जाते.)
या दलाच्या स्थापनेला १०० वर्षं पूर्ण होत असल्यामुळे भारतीय सेनेने Diamond Triangle Expedition या नावाने भारतातील काही मोजक्या शहरांमध्ये ‘एयर शो’ आयोजित केले आहेत. (ज्यात सुदैवाने आपले नांदेडही होते.)
शांती, सद्भावना आणि साहस यांचा प्रचार आणि प्रसार करणे हाच या मोहीमेमागील उद्देश आहे.
मध्यप्रदेशातील महू या शहरातून सुरू झालेली ही ‘मोहीम’ आज आपल्या नांदेडात येऊन पोहोचली होती.
दुपारी ३ ते ६ या वेळामध्ये नांदेडीअन्सना या ऎतिहासिक मोहिमेला पाहण्याचे नशिब लाभले.


या विमानांच्या उड्डाणांची काही छायाचित्रे :-




नांदेड अहेड

उद्या शहरात गुंतवणूकदारांची राष्ट्रीय परिषद (नांदेड अहेड) भरविण्यात येत आहे.
नांदेड अहेड’ या कार्यक्रमादरम्यान तज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील चर्चासत्रांसोबतच नामवंत कंपन्यांच्या प्रोडक्ट्स आणि कन्सेप्ट्सचे प्रदर्शनसुद्धा असणार आहे.
परिषदेचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

तज्ञांचे मार्गदर्शन ‘वस्त्रोद्योग आणि कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग’ या विषयावर असणार आहे, तर चर्चासत्रांसाठी बँकिग व वित्त पुरवठा, अपारंपरिक ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि औषधी निर्माण, अभियांत्रिकी, पर्यटन, उद्योग इत्यादी विषय ठेवण्यात आले आहेत.

अशी आशा करूयात की या कार्यक्रमानंतर अनेक नामवंत कंपन्या आणि स्वतंत्र व्यावसायिक नांदेडमध्ये गुंतवणूक करतील आणि नांदेड विकासाच्या जोरावर नेहमीच ‘अहेड’ मार्गक्रमण करत राहील.

या परिषदेची अधिक माहिती तुम्ही खालील वेबसाईटवरून मिळवू शकता :-
http://nanded.gov.in/htmldocs/Nanded_2010/Nanded_2010/index.html

Wednesday, February 2, 2011

नांदेडच अव्वल !

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या स्पर्धेत नांदेड जिल्ह्य़ाचे चौथ्यांदा फेरमूल्यांकन झाल्यानंतरही हा जिल्हा अव्वलस्थानी असल्याचे स्पष्ट झाले!
यवतमाळच्या अहवालानंतर पुण्याची बनवाबनवी उघड झाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तंटामुक्त स्पर्धेच्या यशावरून यंदा पुणे व नांदेड जिल्ह्य़ांमध्ये तंटा निर्माण झाला होता.
या स्पर्धेत प्रथमच उघडपणे राजकारण झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
गेल्या वर्षी तळाशी असलेला नांदेड जिल्हा यंदा शिखरावर विसावला होता.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, तत्कालीन पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त अधीक्षक शहाजी उमाप, सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकारी यांनी अथक परिश्रम केल्याने जिल्ह्य़ाला यश मिळाले होते.

नांदेड अव्वलस्थानी असल्याचे लक्षात आल्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धेत असलेल्या पुणे जिल्ह्य़ाने आक्षेप नोंदवला.
हिंगोली, गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्य़ांतील पथकांनी तीनदा मूल्यांकन केल्यानंतरही नांदेड पहिल्या क्रमांकावरून हटला नाही.
त्यामुळे गृह विभागाने केवळ नांदेडचेच चौथ्यांदा मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. गृहविभागाच्या या निर्णयाबाबत जिल्ह्य़ात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
गृहविभागाच्या या आकसपूर्ण निर्णयाबाबत विरोधी पक्ष मूग गिळून गप्प असताना खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी जाहीर निषेध केला होता.
चौथ्यांदा मूल्यांकनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात प्रवेश करू देऊ नका, असे आवाहन करताना त्यांनी गृह विभागाला खरमरीत पत्रही लिहिले होते.
चौथ्यांदा मूल्यांकन करायचे असेल तर पुणे जिल्ह्य़ाचे करा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
श्री. खतगावकर यांच्या या भूमिकेनंतर गृह विभागाने नरमाईची भूमिका घेतली.
नांदेडमध्ये न जाता कागदपत्रे मागवून मूल्यांकन करावे, असा आदेश यवतमाळच्या पथकाला देण्यात आला होता.

नांदेडहून शुक्रवारी सर्व कागदपत्रे पाठविण्यात आली.
या पथकाने मूल्यांकन क रून १ हजार ५९ गावांपैकी केवळ २० गावे अपात्र ठरवली.
चार वेळा वेगवेगळ्या पथकांमार्फत मूल्यांकन केल्यानंतर आजही जिल्ह्य़ातील १ हजार ३९ गावे पात्र ठरली आहेत.
ही संख्या पुण्यापेक्षा अधिक असल्याने यवतमाळच्या मूल्यांकनानंतरही नांदेड अव्वलस्थानी आहे.

गृह विभागाने आता नांदेडचे यश मान्य केले तर या स्पर्धेतून मिळालेला सुमारे २६ कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
यवतमाळच्या अहवालानंतर जिल्ह्य़ात समाधानाचे वातावरण आहे.
आमच्या प्रयत्नांना ‘अग्निपरीक्षेनंतर’ का होईना यश आले आहे. गृहविभागाने आता तरी खळखळ न करता नांदेडच्या यशावर शिक्कामोर्तब करावे, अशी मागणी समोर आली आहे.

लोकसत्ता, मराठवाडा वृत्तांत.
१ फेब्रुवारी २०११

जगावेगळा छंद जोपासणारा दिलीपकुमार.


वेडे म्हणावे तर चांगले वागतो, वेडा म्हणावे तर चांगले बोलतो...
केवळ कपडे न घालता फिरुन कचऱ्यातील वस्तू गोळा करतो, हाच त्याचा वेडेपणाचा गुण.
परंतु कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दिलीपकुमार गेल्या आठ वर्षापासून कचरा गोळा करण्याचा जगावेगळा छंद जोपासत आहे.

नांदेड शहरातील अनेक गल्ली बोळात असे कितीतरी वेडे असतील. काही वेडे असे आहेत की, फक्त वेडे-वाकडे हाव-भाव करुन निघून जातात. पण हा वेडा कुणालाही त्रास होईल,असे कधी वागत नाही.
शहरातील अनेक गल्ली-बोळात तो दररोज लोकांच्या दृष्टीस पडतो.
त्याच्याबद्दल थोडी फार माहिती असलेल्या गणेश शेट्टी यांनी सांगितले, दिलीपकुमार हा पंढरपूर येथील आहे.
गेल्या आठ वर्षापासून आम्ही त्याला पाहतोय.
वेडा असूनही तो कुणालाही त्रास देत नाही. दिवसभर गोळा गेलेल्या कचराच रात्री झोपण्यासाठी त्याचे अंथरुण असते.
त्याच्या अंगाला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. बऱ्याच वेळा तो जखमावर माती टाकतो. दिवसभर दिसेल त्या रस्त्याने फिरुन दिसलेला कचरा गोळा करतो. तसेच त्याच्या ठरलेल्या हॉटेलसमोर जावून उभा राहतो. इतर कुणी काही खायला दिले तर त्याला तो हातही लावत नाही.

सुरुवातीला गोकुळनगर भागातील कचरा गोळा करुन तेथेच तो मुक्काम करीत होता. परंतु या ठिकाणी काही जणांनी वेडा म्हणून त्याला दगडं मारले. त्यानंतर मात्र तो गोकुळनगर भागात कधी फिरकला नाही.

शहरात दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिग वाढत आहेत. सुशिक्षित, सुज्ञ म्हणून घेणारेही त्यासाठी तितकेच जबाबदार आहेत.
रस्त्यावर कचरा फेकण्यात कुणालाही कसला संकोच वाटत नाही.
त्यामुळे तो उचलण्याची तसदीही कुणी घेत नाही. परंतु जगाने वेडा ही उपाधी दिलेल्या दिलीपकुमार सारख्या अवलियाने आपल्या कचरा गोळा करण्याच्या जगापेक्षा वेगळ्या छंदाने शहरवासियांना आत्मचितनाची वेळ आणली आहे.

मनपाचा स्तुत्य उपक्रम :-
शहरात फिरणार्‍या वेड्यांची मनपाने छायाचित्रासह यादीच तयार केली आहे.
या सर्वांना येत्या काही दिवसांत मनपा स्वच्छता विभागामार्फत कपडे देण्यात येणार आहेत, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना पुणे येथे नेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
याबद्दल काही दिवसांपूर्वीच महापौरांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक लोकमत, २ फेब्रुवारी २०११

ता. क. :-
दैनिक प्रजावाणी
१० एप्रिल २०११