Thursday, May 28, 2009

घिरट्या घालणारे विमान कुणाचे ?

तामसा, दि.२७ (२८-०५-०९ --> १२:४८)


मागील दोन दिवसांपासून एक विमान सतत तामसा व परिसरात घिरट्या घालत असल्याने चर्चेला विषय बनला आहे.
घिरट्या घालणारे विमान कुणाचे असेल याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

दि. २६ मे रोजी दुपारी ३ वाजता तामसा व परिसरात एक विमान आले व ते २०० - ३०० फुटाच्या उंचीवरून उडू लागले. यामुळे उन्हाच्यावेळी घरात बसलेले नागरिक घाबरून घराबाहेर पडले कारण त्या विमानाचा आवाज न कळाल्याने तो भूकंप तर नाही ना असा प्रश्न पडला.
त्या भितीने सर्व जण घाबरले.
२७ मे रोजी सकाळी ११ वाजता तेच विमान तामसा व परिसरातून पुन्हा एकदा घिरट्या घालून गेल्याने नागरिक आश्चर्यचकीत होऊन भयभीत झाले, कारण ते विमान मागील पाच ते सहा दिवसांपासून सरसम, भोकर, वसमत, तामसा येथेच घिरट्या घालत आहे.
काही गावांतून विमान कोसळल्याच्या अफवासुद्धा पसरत आहेत.
सदरील विमानाबद्दल तामसा पोलिसांना विचारले असता विमानाबद्दल काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सदरील विमान हे सी.आर.पी.एफ. किंवा सैनिकांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमानासारखे दिसून येत होते.
दुसरीकडे या विमानाबाबतची माहिती नांदेड येथील सुरक्षारक्षकाला मोबाईलवरून विचारली असता येथे विमानतळ झाले असल्याचे वैमानिकाला विमानतळाचा बरोबर अंदाज येत नसल्याने ते खालून व दुरून घिरट्या घेत आहे.

हे विमान मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमिताताई चव्हाण यांच्या खाजगी दौऱ्यासाठी आले असल्याचे सांगितले जाते.


--- दैनिक लोकमत

Wednesday, May 20, 2009

महापुरूषाच्या पुतळ्याने महापालिका कामाचे पितळ उघडे पाडले !

आठवड्याभरापुर्वीच झालेल्या पावसामुळे शहारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नव्यानेच लावण्यात आलेला रंग निघून गेला होता आणि त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर दोन ठिकाणी बसेसच्या काचासुद्धा फोडल्या होत्या.

त्याच बातमीच्या अनुषंगाने श्री. ऋषिकेश कोंडेकर यांनी बुधवार, दि.२० मे २००९ रोजीच्या दैनिक समिक्षामध्ये एक डोळ्यात अंजन घालेल असा लेख लिहीला आहे.
तोच लेख मी इथे पोस्ट करत आहे.


नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने महापुरूषांच्या पुतळा सुशोभिकरणावर झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या खर्चावर पाणी फेरले गेले. पुन्हा एकदा गुरू-ता-गद्दीच्या कामातील पडद्यामागचा कारभार आता हळूहळू पुढील नियमीत पावसाने पावसाळ्यात जनतेसमोर येतो की काय अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

गुरू-ता-गद्दीचा सोहळा म्हणजे शहराला मिळालेले एक 'वरदान’ होते.
याच सोहळ्याने नांदेड शहराला विकासासाठी करोडॊ रूपयांचा निधी प्राप्त करून दिला, पण म्हणतात ना "दैव देते पण कर्म नेते", तशीच गत आता शहरवासीयांची होते की काय असा प्रश्न सामान्य जनाच्या मनात घर करून बसला आहे. प्रश्नाला वाचा फोडायला कोणीही समोर येत नाही हे पाहून महापालिकेने केलेल्या गैरकारभाराच्या उघडकीची सुरूवातही शिवरायांच्या पुतळ्यालाच करावी लागली अन शेवटी पुतळ्याने आपले लढवय्ये रूप दाखवून दिले.
बाकी महापुरूषांचे पुतळे मात्र शांत असून बिचारे गांधीबाबा मात्र आपल्या हातात काठी घेऊन तटस्थ अवस्थेत हे करोडो रुपयांचे वाटोळे आपल्या नजरेने पहात स्तब्ध उभे आहेत.

गुरू-ता-गद्दीमुळे करोडो रूपये खर्च करून तात्पुरते निवारे, रस्ते, पाण्याच्या सोयी, वीज व इतर सुविधांवर कसा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आणि त्यावर शेवटी कसे पाणी फिरले हे चित्र अद्यापही नांदेडीअन्स विसरले नाहीत.
शहराच्या मुख्य हॉटमिक्स रस्त्यावर कॉंक्रीटची भर टाकून उंचच उंच रस्ते शहराची की कंत्राटदाराची आर्थिक स्थिती उंचावीत आहेत, असाही प्रश्न सामान्यांच्या मनात आहेच.
अहो इतकंच काय, प्रथम रोड करायचा व नंतर मधोमध ड्रेनेज लाईन किंवा पाईप लाईनसाठी खोदायचा. यात कसले नियोजन आहे हे तज्ञ अभियंत्यालाही कळणार नाही. पण पैसे उपलब्ध आहेत ना, मग ते ठराविक कालावधीत खर्च झालेच पाहिजेत म्हणून तर हा सारा खटाटोप नाही ना ?
आजपर्यंत शहरातल्या ओव्हरब्रीजचं उदाहरण घेतलं तर शिवाजीनगरचा ब्रीज अधुरा तर हिंगोली गेटचा एका पायाचा.
रस्ता रूंदीकरणामध्ये पादचारी मार्गासाठी भलीमोठी जागा, रस्त्यालगतच पार्किंगची सोय पण पार्किंग मात्र रस्त्यावरच.
बिचारे पोलिस तरी काय करतील, शेवटी तीसुद्धा माणसंच आहेत ना!
शहराच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे रस्त्याची रूंदी वाढविणे आवश्यक होते, ती वाढलीही पण पादचारी आणि सायकलमार्गामुळे रस्ते प्रसरण पावण्याऎवजी आकुंचनच पावले.

ऎवढा सगळा खटाटोप फक्त सुंदर नांदेडसाठी आणि कराचा बोजा मात्र सामान्य नागरिकांच्या माथी.
डोक्यावर अफाट कर्जाचा बोजा पडायला लागल्यावर जनतेला या सुंदर संकल्पनेचा आस्वाद तरी कसा घेता येईल ?

पण काही असो, पहिल्याच अवकाळी पावसाने महापालिकेच्या गुरू-ता-गद्दी कार्यक्रमादरम्यान झालेल्या विविध कामातील गैरप्रकार उघडकीस येण्याची सुरूवात महापुरूषाच्या पुतळ्यापासून झाली आणि आता नियमीत पावसाळा कशा-कशावर पाणी फेरतो आणि किती जणांना घेवून बुडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunday, May 17, 2009

किनवटचे जंगल आणि पैनगंगा अभयारण्य

नमस्कार मित्रांनो,
सुट्ट्या असल्यामुळे नुकताच मी किनवट आणि पैनगंगा अभयारण्यात फिरून आलोय. (किनवटचे जंगल आणि पैनगंगा अभयारण्य यात गल्लत करू नका, दोनिही वेगवेगळी ठिकाणं आहेत.)
किनटच्या जंगलाचा पूर्ण भाग हा नांदेड जील्ह्यातच मोडतो तर पैनगंगा अभयारण्याच्या अगदीच थोड्या भागाचा समावेश नांदेड जील्ह्यात होतो आणि उर्वरित भाग हा यवतमाळ जील्ह्यात मोडतो.

दोनीही जंगलं वन्यप्राण्यांच्या वसतीस्थानाच्या दृष्टीने अगदी परीपूर्ण आहेत पण किनवटचे जंगल हे अभयारण्य नसल्यामुळे साहजिकच तीथे माणसांचा अधिक जास्त वावर आहे.

२-३ दिवसांची सुट्टी काढून किनवटच्या जंगलात आणि पैनगंगा अभयारण्यात एकदा फिरून याच !


मी माझ्या किनवट भेटीदरम्यान काढलेल्या काही फोटो.
:: Click Here ::




:: महत्त्वाचे अंतरदर्शक ::
नांदेडपासून किनवट शहर हे १४० कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
किनवटपासून उनकेश्वरचे अंतर ३५-४० कि.मी. आहे.
आणि पैनगंगा अभयारण्याची हद्द किनवट रेल्वे स्टेशनपासून ३ कि.मी. अंतरावर सुरू होते.

:: राहण्याची व्यवस्था ::
पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे.
किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.

:: जवळची ठिकाणे ::
नांदेड किनवट रस्त्यावर हिमायतनगर तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा.
किनवटपासून ३५-४० कि.मी. अंतरावर उनकेश्वर येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे.
उनकेश्वरहून जवळच देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदीर.

Saturday, May 16, 2009

नांदेडचे नवनिर्वाचित खासदार

नांदेड मतदारसंघातून राष्ट्रीय कॉंग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे निवडून आले आहेत.


मित्रांनो, लोकसभा निवडणूकीत संयुक्त पुरोगामी आघाडी बहुमताच्या दिशेने पुढे पाऊल टाकते आहे.
सध्या हाती आलेल्या बातमीनुसार यु.पी.ए.ने १२९ जागा पटकावून आघाडी घेतली आहे तर एन.डी.ए. ७८ जागा पटकावून दुसऱ्या नंबरवर आहे. तिसऱ्या मोर्चाला ३० तर चौथ्या मोर्चाला केवळ ७ जागा पटकाविण्यात यश आलेले आहे. इतर १२ जागांवर आहेत.

आत्ता चालत असलेल्या आघाडीनुसार यु.पी.ए. जवळपास २५२ जागा पटकावून सरकारस्थापनेचा प्रस्ताव ठेवणार असेच जाहीर होते.

Monday, May 11, 2009

°o.O आता तुम्हीही व्हा नांदेडीअन्सचे लेखक O.o°

मित्रांनो,
तुम्ही माझ्या ब्लॉगला आजवर भरभरून प्रतिसाद दिला आणि देत आहात, त्यामुळेच मला माझा ब्लॉग नेहमीअपडेटेड ठेवावासा वाटतो. :)

माझ्या ब्लॉगवरचे सगळे लिखाण नेहमी माझेच असते, त्यामुळे मला आता अशी भिती वाटू लागली आहे की नांदेडीअन्स फक्त माझ्या एकट्याचे लिखाण वाचून-वाचून कदाचीत कंटाळले असतील. :(

त्यामुळे मी आता नांदेडीअन्स ब्लॉगसाठी नवीन लेखकांच्या शोधात आहे.
तेव्हा चला, लिहायला लागा. :)

तुम्ही लिहीलेली माहिती, लेख, प्रवासवर्णन, कविता इत्यादी लेखनप्रपंच नांदेडशी संबंधीतच असायला हवा.

तुमचे लिखाण माझ्यापर्यंत पोहोचवा.
निवडक लेखनाला तुमच्या नावासह, संपर्क पत्त्यासह नांदेडीअन्स ब्लॉगवर प्रसिद्धी देण्यात येईल. :)

माझा -मेल आय.डी. तर तुम्हाला माहितच आहे.
power_8383@yahoo.com

Thursday, May 7, 2009

‘परिस्थितीच्या अभ्यासा’साठी शीघ्र कृतिदल नांदेडमध्ये

जातीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या राज्यातल्या जिल्ह्य़ांची यादी तयार झाली असून त्यात नांदेड अग्रभागी आहे, असे सांगण्यात आले.
या पाश्र्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास

करण्यासाठी शीघ्र कृतिदलाचे पथक येथे दाखल झाले आहे.

क्षुल्लक कारणावरून नेहमी घडणाऱ्या दंगलीसंदर्भात राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणा यांनी अभ्यास केला.
ज्या जिल्ह्य़ात दंगली होतात अशा जिल्ह्य़ांची यादी तयार करण्यात आली आहे. दंगली, नक्षलवादी समस्या, बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे कार्य व अन्य बाबींचा अग्रक्रम लावण्यात आला आहे.
दंगलीत नांदेड अग्रभागी असल्याचे स्पष्ट झाले; तर अन्य बाबीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शहरातील दंगली नेहमीच क्षुल्लक कारणावरून होतात.
बळाचा वापर केल्याशिवाय ही दंगल नियंत्रणात येत नाही, असे वेळोवेळी स्पष्ट झाल्याने किंवा गुप्तचर यंत्रणांनीही तसा अहवाल दिल्याने त्या जिल्ह्य़ाचा अभ्यास करण्यासाठी शीघ्र कृतिदलाच्या दक्षिण विभागातील बटालियनचे पथक नांदेडात दाखल झाले आहे.
हे पथक सर्वच अतिसंवेदनशील, संवेदनशील भागाचे सर्वेक्षण करणार आहे.
इत्थंभूत माहिती घेऊन मंदिर, मशीद, विहार, चर्च, गुरुद्वारा याची तपशीलवार तसेच वेगवेगळ्या मिरवणुकांचे मार्ग, वाद होणारी ठिकाणे, अंतर्गत रस्ते, टोलेजंग इमारती याची संपूर्ण माहिती घेऊन हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे, असे सांगण्यात आले.

भविष्यात जातीय किंवा कोणत्याही कारणाने दंगल झाली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृतिदलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
संपूर्ण शहराची माहिती त्यांना असावी या उद्देशानेच या पथकाचा अभ्यास दौरा असल्याचे सूत्रांनी सांगितले.


:: Source ::
Loksatta

Wednesday, May 6, 2009

मराठी सॉफ्टवेअर्स

एक अब्जापेक्षाही जास्त अस्लेल्या बहुभाषिक भारतियांना एकमेकांच्या संपकीत
आणण्यासाठी माहीती तंत्रज्ञान विभागाचे भाषा तंत्रज्ञान एक महत्वाची भूमिका बजावत आहे.
भाषा तंत्रज्ञानामधे विकसित उपकरणें सर्वसामान्य पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशनि भारत
सरकारच्या माहीती तंत्रज्ञान विभागाच्या तरतूदी अंतर्गत
www.ildc.gov.in तसेच
www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था
करण्यात आली आहे.



या उपकरणांमधे तसेच सेवांमधे मुख्य आहे...
फ़ॉन्ट, कोड परिवर्तक, वर्तनी संशोधक, ओपन ऑफ़िस, मैसेंजर, ई-मेल क्लायंट, ओ सी आर, शब्दकोश, ब्राउज़र, ट्रांसलिटरेशन, कॉर्पोरा, शब्द-संशोधन.




::
डाऊनलोड पेज ::
http://www.ildc.in/Marathi/mdownload.html



दोन गटांमधे सशस्त्र हाणामारी

शहरातील भाग्यनगर भागात आज दुपारी दोन गटांमधे तुंबळ हाणामारी झाली आहे.
त्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रथमदर्शी तरी हे भांडण राजकीय वादातून झाले आहे असे वाटते.


राज्याचे मुख्यमंत्री आज नांदेडमधे आलेले असल्यामुळे सर्व पोलीस फौजफाटा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.
या कारणामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले.
पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हमलावरांच्या तलवारी, चाकू-सुरे हे सर्व रस्त्यावरच पडून होते.

दिवसाढवळ्या इतके मोठे आणि खुणशी भांडण नांदेडीअन्सनी कधीच पाहिले नसल्यामुळे आज घटनास्थळावर व आजुबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांमधे एकच धावपळ उडाली.
या घटनेमुळे शहरातील भाग्यनगर, स्नेहनगर इत्यादी भागांमधील बाजारपेठ काही काळापुरती बंद झाली होती.

घटनेची अधिक माहिती हातात आल्यावर मी हा टॉपिक परत अपडेट करेन.


(संध्याकाळचे ६ वाजून ३७ मिनिटे)
अधिक माहिती अशी हातात आली आहे की हे भांडण दोन राजकीय नेत्यांच्या पूर्ववैमनस्यातून झाले आहे.

माझ्या एका मित्राने सांगितले की गंभिर जखमींपैकी एकाचा मृत्यु झाला आहे. (अर्थात ही बातमी खोटीसुद्धा असू शकते.)

उद्या वर्तमानपत्रात तपशिलवार माहिती मिळेलच.


एकंदरीत हा सर्व प्रकार अगदी दुर्दैवी म्हणायला हवा.

या घटनेचा निषेध !