या ओळखीनं पार पोचता येतं नंदीग्राम पर्यंत.
इतिहास-भूगोलातही हे गाव अव्वल.
दबलं होतं निजामाच्या नजरेखाली.
त्यास्तव पडलं नाही नंबर एक उमटून.
इथला सचखंड गुरुद्वारा जगप्रसिद्ध.
त्यायोगे जगभरातल्या पर्यटकांचे नित्य येणे-जाणे.
गुरूगोविंदसिंघांच्या समाधीवर माथा टेकवून लंगर घेणारे सर्वधर्मीय भावीक जरूर दिसतात इथं.
दक्षिणगंगा गोदावरीचं हे नाभीस्थान.
ही नदी वाहत राहते या शहराच्या मधोमध.
सुंदर घाटावर वसलेल्या टोलेजंग इमारती.
नदीच्या दोन्ही बाजूंनी सारखंच विस्तारत चाललेलं हे गाव.
पूर्वी होतं शेलाटी सारखं.एकमार्गी,एकटांगी.
होळी पासून निघायचं आणि डोळे झाकून पोचायचं थेट वर्कशॉपला.
आता फुगलं आडवं तिडवं.
गुरूतागद्दीनं फेडले या शहराचे सारे पांग.
पूर्वी दोन वसाहतीला जोडणारे होते दोनच पूल गोदावरीवर.
आता सात-आठ झाले जागोजाग.
पूर्वी होता एकच जलाशय विष्णुपुरीचा भागवायला शहराची तहान.
आता डाव्या बाजूनं वळसे घेत जाणारी आसनाही आणते पाणी आडीपडीला.
खरं तर ही शंकराची कृपा.
हा शंकर म्हणजे शंकरराव चव्हाण.
त्यांच्या नावानं ओळखलं जातं हे गाव दिल्लीत आणि देशभरातही.
त्यांचाच वसा चालवताहेत अशोकराव चव्हाण नेटानं.
असलंच एक नरहर कुरुंदकर हे नाव साहित्याच्या शिवारातलं.
मराठी साहित्यात लखलखलेलं.
साहित्य, संगीत,नाट्य या ही अंगानं या गावचं वैभव वैभवशालीच.
बाकी नांदेडबद्दल सांगता येईल खूप काही.
महाराष्ट्रातलं सगळ्यात किफायतशीर शहर म्हणूनही ओळखलं जातं.
इथं दहा रूपये हातावर टेकवले म्हणजे रिक्षातून जाता येतं दुस-या टोकाला.
कटिंग चहा पाच-सहात.
भरपेट जेवण पन्नास-साठ.
निक्कं दूध पन्नासला लिटर.
भाजीपाला वीस-तीस किलो.
शिवाय दररोज जागा बदलून बाजार.
फळाफुलांचं मार्केट वेगळंच.
मुदखेडची फुलं जशी प्रसिद्ध तशीच अर्धापूरची केळी देशात प्रसिद्ध.तीस रूपये डझन शिवाय केमिकल फ्री!
दळणवळणाची साधनं भरपूर.
विमान,रेल्वे.बस,लक्झरी,टॅक्सी गाड्या अशा सोयीस्कर सुविधा.
हजारो लोकांना एकाच वेळी थांबता येईल असे यात्रीनिवास.वातानुकूलित खोल्या.खूप माफक दर.तीनशे-चारशेत खोली.
अट एकच तंबाखू,मद्यपानाला तेवढा मज्जाव.
बाकी इतरत्रही थांबू शकतो आपण हजार-दोन हजारात.
इथून माहूर,उनकेश्वर,सहस्रकुंड,नरसी नामदेव,औंढा,शिकारघाट,
काळेश्वर,रत्नेश्वरी,बाबरी-दाभड,गोपाळचावडी,कंधारचा किल्ला,होट्टल,शिवूर,केदारगुडा,कंधारचा दर्गा
अशी अवतीभोवतीची प्रेक्षणीय स्थळं पाहता येतात सहजपणे.
आहे इथं अत्यंत देखण्या इमारतीत मांडून ठेवलेलं स्वामी रामानंद तीर्थ नावाचं विद्यापीठ.
बाकी शाळा,महाविद्यालये जागोजाग.
या शहराची अलिकडची दोन खास वैशिष्ट्य नजरेत भरण्यासारखी!
एक म्हणजे या गावात आहेत डाॅक्टर लेनी(रांगा) वस्तीवस्तीत.
पुण्या-मुंबईत सुध्दा दिसणार नाहीत अशी दाटीवाटीनं उभी असलेली इस्पितळं.
विदर्भ-मराठवाडा आणि तेलंगणातूनही रूग्ण येतात इथं.
आता क्वालिटी वगैरे म्हणाल तर ते जोखण्याचं तराजू नाही आमच्याकडे.
पण दवाखान्याला नाही कमी.
कदाचित पुढे मागे इस्पितळांचं गाव म्हणूनही होऊ शकेल हे महशूर.
दुसरं अलिकडचं वैशिष्ट्य असं की हे शहर कोचिंग क्लासेसचं शहर म्हणून लागलं ब-यापैकी उभरू.
इथला शामनगरचा रस्ता पूर्वी वाटायचा भयंकर सुनसान.
आता या रस्त्यावर मावत नाही विद्यार्थ्यांची गर्दी.
विशेषतः दहावी-बारावीची ही मुलं.
पार कुठून कुठून आलेली.
नागपूर-चंद्रपूर पासून जिंतूर-परळी पर्यंत.
एवढंच कशाला मुंबईच्या पालकांनाही वाटतं आपल्या लेकराला भिर्कावं इकडंच.
त्याचं कारणही सांगतात तेवढंच तगडं.लातूरकडूनही क्लासेसवाले आपला पसारा घेऊन आलेले दिसतात या गावात.
पार कोट्यातून आलेल्या मास्तरांच्या पाट्याही टांगलेल्या दिमतीला.
चांगलीचुंगली स्थीर नोकरी सोडून आलेले दिसतात मास्तरलोक या वहिवटीला.
हे चांगलं की वाईट हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो जरूर.पण त्यासाठी नव्हे ही जागा.
तर सांगत हे होतो अक्षरशः हजारोंनी कोचिंग क्लासेसच्या पाट्या दिसतील इथं.
बाकी देण्याघेण्याचं गणित ठाऊक नाही.
पण या वर्षी 'नीट' मध्ये देशात फडकवली म्हणतात याच क्लासेसनी आभाळ-पताका.
हजारावर विद्यार्थी सहज जातील मेडिकलला अशी मांडली जाताहेत गणितं.
बाकी अभियांत्रिकी वगैरेतही अव्वलच.
ते काहीही असो!
यानिमित्तानं गाव गेलं गजबजून.
खानावळी चालल्यात ओसंडून.
दहा बाय दहाची खोली देऊन चालली दामदुप्पट मोबदला.
बाकी छोटी मोठी दुकानदारीही दौडू लागली दमदारपणानं.
हे ही नसे थोडके!
आता प्रश्न एवढाच.
हे शहर ओळखलं जातं शांत आणि सुरक्षित म्हणून.
ही ओळख होऊ नये धूसर आणि इथं आयुष्य घडवायला आलेल्या लेकरांना लागू नये गालबोट.
याची दक्षता प्रशासनाएवढीच इथल्या सजग रहिवाशांनीही घ्यायला हवी.
- जगदीश कदम,
कवी, लेखक, निवृत्त-मराठी विभाग प्रमुख, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
0 comments:
Post a Comment