Wednesday, August 12, 2009

स्वाईन फ्लू आता नांदेडमध्ये ?

मार्च-एप्रील २००९ च्या आसपास मेक्सिको शहरात स्वाईन फ्लू (H1. N1) ह्या रोगाने आपले डोके वर काढले.
हा रोग जेव्हा माणसांमध्ये दिसून येऊ लागला तेव्हा मेक्सिको सरकारने सगळी कार्यालयं आणि तत्सम गर्दीच्या जागा जीथे ह्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो अशी सर्व ठिकाणे बंद करायला सुरूवात केली.

जून २००९ च्या सुरूवातीस जेव्हा हा रोग सगळ्या जगात पसरायला लागला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने देखील याची दखल घेऊन ह्याला साथीचा रोग म्हणून घोषित केले. (११ जून २००९)

स्वाईनफ्लूइंडीया ह्या संकेतस्थळावरील माहितीनुसार संपूर्ण जगात जवळपास १,६२,३८० व्यक्तींना ह्या रोगाची लागण झाली आहे.
स्वाईन फ्लूने जगभरात आत्तापर्यंत एकूण १,१५४ लोकांचा बळी घेतला आहे.
भारतातील १४ लोक ह्या साथीच्या रोगामुळे मृत्युमुखी पडले आहेत. (पुणे-७, मुंबई-२, नाशिक-१, गुजरात-२, केरळ-१, तामिळनाडू-१)


तर अश्या हा जगभर थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लूची नांदेड जील्ह्यातील पहिली केस माहूर येथे ८ ऑगस्ट रोजी आढळून आली.
हा तरूण नौकरीसाठीची मुलाखत द्यायला पुण्याला गेला होता पण ५ तारखेला जेव्हा तो माहूरला परतला तेव्हा त्याला सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अश्या तक्रारी चालू झाल्या.
गावातच औषधपाणी करूनही त्यांचा आजार थांबत नव्हता म्हणून तीथल्या डॉक्टरांनी त्यांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात शिफ्ट व्हायला सांगितले.
परंतू दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती दवाखाण्यातून पळून गेली त्यामुळे हे प्रकरण अजूनच गंभीर झाले.

नांदेडचे बहुतांश विद्यार्थी १०-१२ वी नंतरच्या शिक्षणासाठी हमखास पुण्यातच जातात, आणि भारतामध्ये पुण्यात तर या स्वाईन फ्लूने सगळ्यात जास्त थैमान घातलेले आहे त्यामुळे इथल्या पालकांनी आपापल्या पाल्याच्या काळजीस्तव त्यांना परत नांदेडला बोलावून घेतले.


माझे अनेक मित्र पुण्यात वेगवेगळ्या शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांच्याशी बोलल्यावर असे कळाले की,
नांदेडला परत आलोत तर आपला अभ्यास बुडेल या भितीने अनेकांनी पुण्यातच राहणे पसंद केले होते पण त्याच सुमारास (सोमवार, १० ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारने पुण्यातील सर्व खाजगी शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृहे, शॉपींग मॉल्स इत्यादींना ७ दिवसांची सुट्टी जाहीर केली.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नांदेडला परतण्याचे नियोजन केले आणि नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी गाड्या रीकाम्या तर येणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या.

पण नांदेडला परतलेल्यांपैकी काही विद्यार्थी आणि इतर व्यक्ती पुण्यामध्येच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्वाईनफ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या असाव्यात कारण नांदेडला आल्यावर सहा व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं दिसायला लागली होती.

त्या संशयीत रुग्णांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या थुंकीचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (११ ऑगस्ट २००९)
त्या रूग्णांना स्वाईन फ्लू झाला आहे की नाही याबद्दल अजून कोणत्याही वृत्तवाहिनीवर किंवा वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली नाही.

वृत्तवाहिन्यांनी या रोगाचा फार मोठा बागुलबुवा उभा करून लोकांच्या मनात भिती निर्माण केली आहे, पण थोडी काळजी बाळगली तर स्वाईन फ्लू हा रोग सहजपणे टाळता येऊ शकतो.




ता.क. :- पुण्यात अजून एका व्यक्तीचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला आहे. :(


ताजा कलम :- १५ ऑगस्ट २००९ (४:१४ PM)

संशयीतांपैकी ५ जणांना स्वाईन फ्लू ह्या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

0 comments:

Post a Comment

Post a Comment