Saturday, June 19, 2010

कृत्रिम पाऊस.

नमस्कार मित्रांनो.
अनेक दिवसांपासून मी आपल्या डॉ. राजा मराठे (‘आपल्यायासाठी की ते नांदेडीअन आहेत.) आणि त्यांच्या संशोधनावर लेख लिहायचा विचार करत होतो, पण या ना त्या कारणाने ते राहूनच गेले.
आजच्या सकाळमध्ये अभय कुळकजाईकर सरांनी याच विषयावर एक लेख लिहीलाय, तोच इथे देतो.


डॉ. राजा मराठे यांनी सुरू केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग सगरोळी (ता. बिलोली) येथे गुरुवारी (ता.17) यशस्वी झाला.
प्रयोगानंतर वीस तासांनी म्हणजेच शुक्रवारी (ता. 18) दुपारी या भागात पावसाने हजेरी लावल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

'सकाळ सोशल फाऊंडेशन'च्या वतीने डॉ. मराठे यांनी सगरोळी, नायगाव परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू केला आहे.
सगरोळीत संस्कृती संवर्धन मंडळाच्या सहकार्याने गुरुवारी (ता. 17) दुपारी चारच्या सुमारास सगरोळी येथे जवळपास दोन तास हा प्रयोग केला.
या प्रयोगानंतर दोन ते बहात्तर तासांच्या आत पाऊस पडेल, असे डॉ. मराठे यांनी सांगतिले.
अपेक्षेनुसार दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रयोगाच्या वीस तासांनंतर पावसाच्या सरी कोसळल्या.

या प्रयोगासाठी दोनशे लिटर क्षमतेची लोखंडी टाकी, त्यावर लोखंडी जाळी यात हवा जाण्यासाठी तयार केलेली नळी होती.
टाकीमध्ये जळण म्हणून लाकडाचे तुकडे, भुशाच्या विटा टाकण्यात आल्या.
त्यावर रॉकेल टाकून ते पेटवले.
चांगले पेटावे म्हणून बाहेरून भात्याने जोरात हवा दिली. जाळ चांगला पेटल्यानंतर टाकीमध्ये मीठ टाकण्यात आले.
साधारण दोन तासांच्या या प्रयोगात तीन ते चार किलो बारीक मीठ तर जवळपास दहा किलो मीठाचे तुकडे टाकण्यात आले.
धुराबरोबर मीठाचे सूक्ष्म कण आकाशात जातात.
पाऊस पडण्यासाठी ढगामधील पाण्याचे छोटे, मोठे थेंब एकमेकांकडे आकर्षित होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्प्रेरकाची गरज असते.
मीठाचे सूक्ष्म कण उत्प्रेरकासारखे काम करतात ढगातील पाण्याचे थेंबात रूपांतर होते, असे डॉ. मराठे म्हणाले.

हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आद्रर्ता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्यक असते.
हा प्रयोग केल्यानंतर डॉ. मराठे यांच्या अपेक्षेनुसार दोन ते बहात्तर तासांत पाऊस पडणे आवश्यक आहे.
सगरोळी येथे प्रयोगानंतर मध्यरात्री दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या.
एका वरुण यंत्राद्वारे हा प्रयोग केल्यास चार किलोमीटर परीघ क्षेत्रावर म्हणजे एका गावावर पाऊस पडेल, असे डॉ. मराठे यांनी सांगितले.

लोखंडी टाकीपासून तयार केलेल्या यंत्रापेक्षा कमी खर्चिक यंत्र म्हणून विटांनी तयार केलेल्या हौदाचा प्रयोग येथे करण्यात आला.
दोनशे विटा घेऊन चार बाय चारचा हौद करून त्यात संविधा जाळण्यात आल्या त्यात मीठ टाकण्यात आले.
हा प्रयोग प्रत्येक शेतकरी करू शकतो.
गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
डॉ. राजा मराठे यांच्या अल्पखर्चिक वरुण यंत्राची माहिती "सकाळ'ने प्रकाशित केल्यानंतर संस्कृती संवर्धन मंडळाने हा प्रयोग करण्याचे ठरविले होते.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी गेल्या 50 वर्षांपासून ही संस्था कार्य करीत असून, शेतकऱ्यांसाठी डॉ. मराठे यांच्या मार्गदर्शनाने कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.


...असा पाडावा पाऊस
कृत्रिम पावसाचा हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी उंबर, पिंपळ, वड, आंबा, पळस या चिकाची झाडे असलेल्या संविधा जाळाव्यात, त्यात भुशाच्या विटा टाकल्यास वातावरणात कार्बन तयार होतो.
मीठाऐवजी नवसागर टाकल्यास अधिक चांगले.
यात वाफेला शोषून घेणारे घटक आहेत.
नवसागरामुळे बाष्पीभवन होते ढगातील पाण्याचे थेंबात रूपांतर होते, असे डॉ. मराठे यांनी सांगितले.


डॉ. राजा मराठे यांच्या वरूणयंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.




0 comments:

Post a Comment

Post a Comment