नमस्कार मित्रांनो,
बागवान समाजाने टी.व्ही. फोडल्याची बातमी आपण विसरला तर नाहीत ना ?
विसरला असाल तर इथे वाचा.
http://nandedians.blogspot.com/2010/06/blog-post.html
या घटनेच्या काही दिवसांनंतर प्रजावाणी वृत्तपत्रात श्री. अभयकुमार दांडगे यांचा ‘टी.व्ही. नकोच : बागवान समाजाचा स्तुत्य उपक्रम’ हा लेख प्रकाशित झाला होता.
या लेखामध्ये दांडगे सरांनी बागवान समाजाची ही कृती योग्य असल्याचे म्हटले होते.
प्रतिवाद करण्याइतका मी काही ज्ञानपंडीत नाही पण मला हा लेख कुठेतरी खटकला होता.
त्यामुळे मीसुद्धा माझ्या मनातल्या भावना प्रजावाणीपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले, पण माझ्या मतांवर चहूबाजूने टीका होईल या भीतीने मी माझा लेख माझ्याजवळच ठेवला.
तो लेख आपल्या ब्लॉगवर टाकावा की नाही, याबद्दलसुद्धा बर्याच दिवसांपासून द्विधा मनःस्थितीत होतो, पण आज हिंमत करून तो लेख इथे प्रकाशित करतोय.
रविवार दि. १३ जूनच्या प्रजावाणीच्या अंकात श्री. अभयकुमार दांडगे यांचा ’टी.व्ही. नकोच : बागवान समाजाचा स्तुत्य उपक्रम’ हा लेख वाचला आणि आश्चर्याचा धक्का बसला कारण बागवान समाजाचा हेतू चांगला असला तरी त्यांचा उपक्रम मला स्तुत्य नक्कीच वाटला नाही.
८-१० दिवसांपूर्वी शहरातल्या देगलूरनाका परिसरात मोठ्या संख्येने राहत असलेल्या बागवान समाजाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या भावनेतून घरातील टी.व्ही. मशीदीसमोर आणून फोडून व जाळून टाकले.
बातमी होतीच तशी महत्त्वाची.
त्यामुळे दुसर्या दिवशी सगळ्याच वृत्तपत्रांनी ही बातमी हायलाईट केली.
एका नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर जेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
त्यातलीच एक विचार करायला भाग पाडणारी अशी एक प्रतिक्रिया :-
"एखाद्या गरजू संस्थेला या टी.व्ही. दान करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकला असता. टी.व्ही. फोडण्याणे आणि जाळण्याणे जे ई-वेस्ट तयार झाले, त्याला जबाबदार कोण ?"
ही बातमी कळाल्यानंतर सगळ्याच पालकांना हा प्रकार चांगला वाटला असेल; कारण प्रत्येक पालकाला टी.व्ही. नावाच्या वस्तूबद्दल राग वाटतोच.
(मुलगा अभ्यासात हुषार नसेल किंवा त्याला कमी गुण मिळाले; तर बहुतांश वेळा त्याचे खापर टी.व्ही.वरच फोडल्या जाते.)
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट.
वाईट याचे वाटते की, आपण नेहमी वाईट बाजूच अगोदर पाहतो आणि तिलाच अवास्तव महत्त्व देतो.
चांगली बाजू नेहमी उशीरा पुढे येते आणि तेव्हा आपण पश्चाताप करत असतो.
तुम्ही म्हणाल, 'टी.व्ही.ला काय चांगली बाजू असू शकते ? तो इडिअट बॉक्स वेळ वाया घालवण्याशिवाय काय करू शकतो ?’
पण तसे नाही, उलट टी.व्ही.पासून नुकसानापेक्षा फायदेच अधिक आहेत.
दांडगे सरांनी टी.व्ही.वर दाखवली जाणारी अश्लील गाणी, चित्रपट इत्यादींवर आक्षेप घेतला आहे.
मान्य आहे की हल्ली टी.व्ही.वर असे कार्यक्रम सर्रास दाखवले जातात पण टी.व्ही.चा रिमोट तर आपल्याच हातात असतो ना !
हल्ली प्रत्येक टी.व्ही.मध्ये ’चाईल्ड लॉक’ किंवा ’पॅरेन्टल कंट्रोल’चे सॉफ्टवेअर येते, त्याद्वारे तुम्ही मुलांनी कोणते चॅनल्स पाहावेत आणि कोणते नाही हे सहज ठरवू शकता.
हां, जे पालक आपल्या मुलांना डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट, हिस्टरी किंवा नॅटजीओसारखे चॅनेल्ससुद्धा पाहू देणार नसतील त्यांनी परग्रहवासी असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे म्हणजे त्यांना कुणीही काहीही म्हणणार नाही.
मला जाणवलेले टी.व्ही.चे काही फायदे :-
१) मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास कुणामुळे होतो ?
याच टी.व्ही.मुळे ना ?
हल्लीची पिढी फार हुषार आहे, असे आपण वारंवार का म्हणतो ?
हा निसर्गातील बदल आहे का ?
नाही.
टी.व्ही.चा वाढता वापर हेच यामागचे मुख्य कारण आहे.
२) इंटरनेट हा माहितीचा सगळ्यात मोठा खजिना आहे, पण आजही इंटरनेट खेड्यापाड्यांत पोहोचलेले नाही किंवा सगळ्यांना त्याचा वापर करता येत नाही.
पण टी.व्ही.चे तसे नाही.
आज प्रत्येक घरात टी.व्ही. आहे, प्रत्येकाला तो हाताळता/चालवताही येतो, त्यामुळे टी.व्ही. हाच माहितीचा सगळ्यात मोठा Easy to access खजिना आहे, असे म्हणावे लागेल.
३) टी.व्ही.मुळे मुलांनी मैदानी खेळ खेळायचे सोडून दिले, असे आपण नेहमी म्हणतो.
अहो, पण आज मैदाने आहेतच कुठे ?
आणि भारत तर ठरला क्रिकेटवेडा देश, मग मुलांनी घरात क्रिकेट खेळलेलं चालेल का तुम्हाला ?
टी.व्ही.वर बुद्धीला चालना देणारे बरेच खेळ असतात, मुलांनी थोडावेळ ते खेळले तर काय बिघडलं ?
४) २४ तास सुरू असलेल्या वृत्तवाहिन्यांमुळे आपल्याला घरबसल्या कळतं की आपल्या आजूबाजूला काय चालले आहे.
सध्याच्या अपडेटेड युगात आपल्याला मागे पडून चालणार नाही.
आणि अपडेटेड राहायचं असेल तर टी.व्ही.ला पर्याय नाही.
एका नावाजलेल्या चॅनलच्या, नावाजलेल्या कार्यक्रमामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे.
’प्रॉब्लम्स तो है सबके साथ । बस नजरीये की है बात ।’
आपला दृष्टिकोन महत्त्वाचा.
आपण ज्या रंगाच्या चष्म्याने जगाकडे बघू, जग आपल्याला त्याच रंगाचं दिसेल.
म्हणून मी माझ्या या मतावर ठाम आहे की, बागवान समाजाचा हेतू चांगला असला तरी त्यांचा उपक्रम मात्र नक्कीच स्तुत्य नव्हता.
Thursday, August 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
तुझे मुद्दे पटले सौरभ... कृती नक्कीच योग्य नव्हती.
ब्लॉगवर तू हा लेख आधीच प्रसिद्ध करायला हवा होता, अरे ब्लॉग हे तुझं व्यक्त होण्याचं माध्यम आहे, त्यावर तुझा सोडून इतरांचा कंट्रोल असेल तर मग वृत्तपत्र आणि ब्लॉग मध्ये फरक काय राहीला... असो तू सुज्ञ आहेसच...
धन्यवाद मित्रा.
तुझा प्रतिसाद वाचून खरंच माझी मलाच लाज वाटतेय रे.
यापूर्वी अनेकदा मी याच भितीमुळे काही ब्लॉगपोस्ट्स टाकायचे रद्द केले होते.
पण आता तसे होणार नाही.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
Post a Comment