Wednesday, February 2, 2011

नांदेडच अव्वल !

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या स्पर्धेत नांदेड जिल्ह्य़ाचे चौथ्यांदा फेरमूल्यांकन झाल्यानंतरही हा जिल्हा अव्वलस्थानी असल्याचे स्पष्ट झाले!
यवतमाळच्या अहवालानंतर पुण्याची बनवाबनवी उघड झाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तंटामुक्त स्पर्धेच्या यशावरून यंदा पुणे व नांदेड जिल्ह्य़ांमध्ये तंटा निर्माण झाला होता.
या स्पर्धेत प्रथमच उघडपणे राजकारण झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
गेल्या वर्षी तळाशी असलेला नांदेड जिल्हा यंदा शिखरावर विसावला होता.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, तत्कालीन पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त अधीक्षक शहाजी उमाप, सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकारी यांनी अथक परिश्रम केल्याने जिल्ह्य़ाला यश मिळाले होते.

नांदेड अव्वलस्थानी असल्याचे लक्षात आल्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धेत असलेल्या पुणे जिल्ह्य़ाने आक्षेप नोंदवला.
हिंगोली, गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्य़ांतील पथकांनी तीनदा मूल्यांकन केल्यानंतरही नांदेड पहिल्या क्रमांकावरून हटला नाही.
त्यामुळे गृह विभागाने केवळ नांदेडचेच चौथ्यांदा मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. गृहविभागाच्या या निर्णयाबाबत जिल्ह्य़ात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
गृहविभागाच्या या आकसपूर्ण निर्णयाबाबत विरोधी पक्ष मूग गिळून गप्प असताना खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी जाहीर निषेध केला होता.
चौथ्यांदा मूल्यांकनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात प्रवेश करू देऊ नका, असे आवाहन करताना त्यांनी गृह विभागाला खरमरीत पत्रही लिहिले होते.
चौथ्यांदा मूल्यांकन करायचे असेल तर पुणे जिल्ह्य़ाचे करा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
श्री. खतगावकर यांच्या या भूमिकेनंतर गृह विभागाने नरमाईची भूमिका घेतली.
नांदेडमध्ये न जाता कागदपत्रे मागवून मूल्यांकन करावे, असा आदेश यवतमाळच्या पथकाला देण्यात आला होता.

नांदेडहून शुक्रवारी सर्व कागदपत्रे पाठविण्यात आली.
या पथकाने मूल्यांकन क रून १ हजार ५९ गावांपैकी केवळ २० गावे अपात्र ठरवली.
चार वेळा वेगवेगळ्या पथकांमार्फत मूल्यांकन केल्यानंतर आजही जिल्ह्य़ातील १ हजार ३९ गावे पात्र ठरली आहेत.
ही संख्या पुण्यापेक्षा अधिक असल्याने यवतमाळच्या मूल्यांकनानंतरही नांदेड अव्वलस्थानी आहे.

गृह विभागाने आता नांदेडचे यश मान्य केले तर या स्पर्धेतून मिळालेला सुमारे २६ कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
यवतमाळच्या अहवालानंतर जिल्ह्य़ात समाधानाचे वातावरण आहे.
आमच्या प्रयत्नांना ‘अग्निपरीक्षेनंतर’ का होईना यश आले आहे. गृहविभागाने आता तरी खळखळ न करता नांदेडच्या यशावर शिक्कामोर्तब करावे, अशी मागणी समोर आली आहे.

लोकसत्ता, मराठवाडा वृत्तांत.
१ फेब्रुवारी २०११

2 comments:

Nitin said...

Sourav,
Can you please post on Nanded Ahead - Investors' Meet 2011?
it'd be nice to get update on that. I hope some of the big cos should invest in nanded and that will put nanded in india's developed city map.

सौरभ said...

I was about to write the same. :)

Post a Comment

Post a Comment