Sunday, February 27, 2011

मराठीतून लिहा.

‘श्री. माधव शिरवळकर’ हे नाव तुम्हाला माहित असेलच.
संगणक आणि त्यासंबंधीत विषयांना त्यांनी त्यांच्या लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे सहज-सोप्प्या मराठी भाषेतून साज चढवलेला आहे.

त्यांच्याबद्दल इथे सांगण्याचे कारण की आज लोकसत्ताच्या ‘लोकरंग’मध्ये त्यांचा "मराठी ब्लॉग : एक रांगतं माध्यम" हा लेख प्रकाशित झाला आहे आणि त्यात नांदेडचा उल्लेख आहे.
त्या लेखातला काही भाग मी इथे देत आहे :

"मध्यंतरी नांदेडमध्ये गेलो असताना तेथील सायबर कॅफेत आलेल्या काही तरूण मित्रांशी याबाबत संवाद साधला.
ते म्हणाले, ‘आम्ही फेसबुकवर भेटतो, गप्पा मारतो, पण मराठी टायपिंग करता येत नाही. कसंतरी इंग्रजी कम मराठीतच मॅनेज करतो. फेसबुकचं मराठी सेटिंग अजून जमत नाही.’
इंग्रजी कच्चं आणि मराठी पक्कं नाही, अशा स्थितीतही फेसबुकवर बसणारे तरूण हजारोंच्या संख्येने आहेत.
हे तरूण मठ्ठ आहेत, असं मात्र अजिबात नाही.
उघडय़ा डोळ्यांनी ते आज जे घडतं आहे, ते पाहत आहेत, ऐकत आहेत, कदाचित कमी वाचत असतील, पण त्यांना जगात काय चाललं आहे, हे कळतंय आणि त्यांची त्यावरची आपली स्वतची मतं आहेत.
ही मतं विस्ताराने लिहावीत, यासाठी त्यांचे मराठी सेटिंगचे म्हणजे ‘युनिकोड’ तंत्राबद्दलचे अज्ञान किंवा अपुरे ज्ञान यासाठी काहीतरी करायला हवे.
तसे झाल्यास आज दिसणाऱ्या मराठी ब्लॉग्जचा दर्जा अनेक पटींनी वाढण्यास मदत होईल.
"

खरंच इतके अवघड आहे का हो मराठीतून टाईप करणे ?
आपला हा ब्लॉग सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून ‘मराठी टायपिंग कसे करावे ?’ हे सांगणारी विकिपीडीयाची लिंक मी ब्लॉगवर ठेवलेली आहे.
तुम्ही प्रयत्न तर करून पहा मराठीतून लिहिण्याचा, काही अडचण आली तर मी आहे ना मदतीला.

लेख :- मराठी ब्लॉग : एक रांगतं माध्यम
वाचा :- आजचा लोकरंग

0 comments:

Post a Comment

Post a Comment