Monday, January 26, 2009

सिताखंडी, कोंडलिंग, बारलिंग, गौतमतीर्थ, केदारगुडा.

नमस्कार मित्रांनो,
मागच्याच आठवड्यात आम्ही मित्र केदारगुड्याला गेलो होतोत.

तुम्हीसुद्धा जर केदारगुड्याला जायचे ठरविले तर भोकरमार्गे जा, कारण तुम्हाला मग रस्त्यावरच असणारी सिताखंडी, कोंडलिंग, बारलिंग, गौतमतीर्थ ही मंदिरे पाहता येतील.

त्याच प्रवासाचे काही फोटोज मी इथे अपलोड करित आहे.
अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हे फोटो आवडतील.






Tuesday, January 20, 2009

अनिवासी नांदेडीअन - शैलेश पुरोहीत

नमस्कार मित्रांनो,
आजचा हा नविन टॉपिक काढताना मला विशेष आनंद होत आहे कारण ह्या टॉपिकमध्ये मी आज एका अनिवासी भारतीयाचे (जे मुळ नांदेडचेच आहेत) नांदेडबद्दलचे मत, नविन झालेली विकासकामे, रस्ते वगैरे माहिती सांगणार आहे.

ही माहिती ऑर्कुट ह्या वेबसाईटमार्फत त्यांनीच माझ्यापर्यंत पोहचविली आहे.
ह्या माहितीशिवाय त्यांनी आपल्यासाठी नांदेड शहराचे काही व्हिडीओ काढले आहेत, ते सुद्धा मी इथे पोस्ट करणार आहे.
शेवटी नांदेडहून युक्रेनला विमानाने परत जाताना त्यांनी विमानातून सुद्धा एक व्हिडीओ काढला आहे त्यामुळे आकाशातून नांदेड कसे दिसते हे सुद्धा तुम्हाला त्यांच्या त्या व्हिडीओतून पाहायला मिळेल. (इंटरनेटवर सर्वप्रथम नांदेडचा एरिअल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल.)


शैलेश पुरोहीत !

शैलेश पुरोहीत यांचे आई-वडील नांदेडमध्येच राहतात त्यामुळे शैलेश वर्षाकाठी दोनदा तरी त्यांना भेटायला नांदेडमध्ये येत असतात.
ते मागच्याच आठवड्यात नांदेडमध्ये होते.
हे सर्व व्हिडीओ त्यांनी १४ जानेवारी २००९ रोजी घेतलेले आहेत.


मी त्यांना नांदेडबद्दल, नांदेडच्या विकासकामांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. मी गतवर्षी जुलै २००८ रोजी जेव्हा नांदेडला आलो होतो तेव्हा मला वाटलेसुद्धा नव्हते की ह्या विकासकामांमधली बहुतांशी कामे गुरू-ता-गद्दी सोहळ्यापुर्वी पुर्ण होतील.
पण मला आता इथल्या नविन इमारती, उड्डाणपूल, रस्ते पाहून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे.
सर्व विकासकामे अगदी व्यवस्थीत पार पडली आहेत.
खासकरून गुरूद्वारा आणि त्याच्या आसपासचा परिसर तर फारच छान झाला आहे.

माझे मत विचारशील तर मी तर म्हणेन की आजचे नांदेड हे १ वर्षात काळाच्या १५ वर्षे पुढे गेलेले आहे.

पण आता हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे की ही सगळी विकासकामं कशी कायम राखल्या जातात आणि नांदेडवासीयांना किती फायद्याची ठरतात ?

स्थानिकांच्या पुढाकाराने आणि औद्योगिक संस्थांद्वारे नांदेड शहर व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात भारताच्या काही सर्वोत्तम मोजक्या शहरांच्या पंक्तीत जाऊन बसू शकते.

नांदेड आणि नांदेडीअन्समधे भरपूर पोटेन्शिअल आहे पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नांदेडीअन्सना सोयी-सुविधा हव्या आहेत पण त्याकरिता ते थोड्याफार कळा सोसायला तयार नाहित.

नांदेडीअन्सनी आपली हीच वृत्ती बदलली तर नांदेडची प्रगती होण्यापासून कुणीच अडवू शकत नाही."


तर मित्रांनो हे होते श्री. शैलेश पुरोहीत यांचे मत.
आज मला अत्यानंद होत आहे की अनिवासी भारतीय सुद्धा आपला ब्लॉग वाचत तर आहेतच आणि शिवाय आता कॉन्ट्रीब्युटही करित आहेत.

मी शैलेश पुरोहीत यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या ब्लॉगला त्यांचे व्हिडीओज शेअर करण्यासाठी लायक समजले.


:: Videos ::

Road to Nanded Airport
http://in.youtube.com/watch?v=ZA1_dwsLwwA


Nanded Airport look
http://in.youtube.com/watch?v=v1CDCSmj2Cg&feature=related


Aerial View of Nanded city
http://in.youtube.com/watch?v=9_45hr6k_5g&feature=channel_page


Tuesday, January 13, 2009

माळेगाव यात्रा

नमस्कार मित्रांनो,
माफ करा माळेगावची यात्रा होऊन खूप दिवस झालेत आणि मी आज त्या संदर्भात टॉपिक काढतोय.

तुम्हा सर्वांना तर माहितच आहे माळेगाव यात्रेचं स्वरूप, भव्यता वगैरे, त्यामुळे आज मी इथे काही माहिती देणार नाहीये यात्रेबद्दल.
पण मी काही फोटो काढलेल्या आहेत, त्याच पोस्ट करतो.

तुमचे कमेन्ट्स अवश्य पोस्ट करा.


:: फोटो ::

http://www.orkut.com/Main#ExternalAlbum.aspx?uid=7239984522049257699&aid=1231738563&t=16631049344975587025&vid=00783953990472694803&ik=ACGyDXvXXztZQ4IdmOy2cActGNGe_B5Sdw

Saturday, January 10, 2009

शंखतीर्थ - गोदाकाठच्या खजिन्यातील एक मोती


दिनांक
१७ डिसेंबर २००८.

सकाळचे ६ वाजलेले आहेत आणि आमच्या मोटारसायकल्सने दिशा धरली आहे शंखतीर्थ या ठिकाणाकडची.

थंडी जास्त आहे म्हणून गाडीचा वेग कमी आहे.
अक्षरशः धुक्यातून मार्ग काढत चालली आहे गाडी.
पक्षी जागे झाले आहेत आणि शेतात आलेल्या पिकावर एकदाच धावा कसा बोलायचा याचा विजेच्या तारांवर बसून बेत आखत आहेत.

निसर्गाचा आणि थंडीचा आस्वाद लुटत आम्ही आमदुरा गावाजवळील गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलावर पोहोचलो आहोत.

इथून शिकारघाट गुरुद्वाऱ्याचे अंतर जेमतेम ४०० - ५०० मिटर आहे पण आज जरा जास्तचं धुकं आहे त्यामुळे एरव्ही या पुलाहून अतिशय सुंदर दिसणाऱ्या गुरुद्वाऱ्याचे आज दर्शनसुद्धा झाले नाही.
आमदुरा गाव आले, डावीकडे जाणारा रस्ता मुदखेडला चालला आहे पण आम्हाला उजवीकडे आमदुरा गावात जाणाऱ्या रस्त्याने शंखतीर्थला जावे लागणार आहे.
आमदुरा गावातील पुरुष मंडळी मंदिराच्या चौथऱ्यावर गप्पा मारत बसली आहेत तर स्त्रिया आपापल्या घरापुढे झाडून काढून सडा टाकत आहेत.

आता आम्ही आमदुरा गावातून बाहेर पडलो आहोत.
पुढे वासरी या गावाची पाटी मोडलेल्या आणि वाकलेल्या अवस्थेत दिसत आहे.
उजवीकडे जाणारा रस्ता वासरी या गावाकडे जात आहे तर पुढे सरळ जाणारा रस्ता शंखतीर्थकडे जात आहे.

वासरीच्या पाटीपासून थोड्याच अंतरावर वीटभट्ट्या आहेत...
वीटभट्ट्यांवरील कामगार कामाला लागलेले दिसत आहेत.

आता मात्र रस्ता थोडा खराब आहे.
बहुधा शंखतीर्थपर्यंत हा रस्ता असाच असावा, कारण शंखतीर्थ आता फक्त ३-४ की.मी. अंतरावर आहे.
शंखतीर्थ जवळ आल्याची खुशीही मनात आहे आणि अशा रस्त्यामुळे हाडं खिळखिळी होण्याची भीतीही वाटतं आहे.
पण म्हणतात ना की संत गोरा कुंभार हे विठ्ठलाच्या भक्तीत इतके तल्लीन होऊन गेले होते की त्यांना कळालेच नाही आपण कधीपासून चिखलाऎवजी आपल्या लहान बाळालाचं पायाखाली तुडवतं आहोत.
तशीचं काहिशी ओढ आमच्या मनात शंखतीर्थबद्दल निर्माण झाली आहे त्यामुळे रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आम्ही आगेकूच करीत आहोत.

हे काय !
पुढे तर शंखतीर्थ गाव आले सुद्धा.
गावात छोटे-छोटे ३-४ रस्ते दिसत आहेत, कोणता रस्ता नेमक्या कोणत्या मंदिरात जातो ?
कोण्यातरी गावकऱ्याला विचारावे लागेल.
तो काय, एक माणूस त्याच्या छोट्याशा घरापुढे बसला आहे. त्यालाच विचारतो......

मी :- मामा महादेव मंदिर कुठे आहे ?
तो :- हे काय इथून (बोटाच्या इशाऱ्याने) थोडसं पुढे जाऊन उजवीकडं वळायचं.
मी :- आणि नृसिंह मंदिर ?
तो :- ते तं मागचं ह्रायलं बगा.
मी :- मागं म्हणजे खूप दूर राहिलं का ?
तो :- न्हाई ओ, थोडं मागं जाऊन गावात जाणाऱ्या रस्त्यानं गेलं की आलचं मंदिर.
मी :- ठीक आहे, धन्यवाद मामा.

मामाला धन्यवाद म्हणून पुढे निघालो आहोत.
पहिल्यांदा महादेव मंदिरात जायचं ठरवलं.
हे काय, आलोत सुद्धा मंदिरात !

मंदिर हेमाडपंथी असून अतिशय जुनं दिसत आहे.
या मंदिरात जास्त कोरीव काम दिसत नाहीये. मंदिरात सभामंडप, अंतराळ आणि गाभारा आहे.
मंदिरात तुळ्यांवर उलटे नाग कोरले आहेत.
मंदिराच्या एका गाभाऱ्यात विष्णुची मुर्ती आहे.
कोपऱ्यात काळभैरव, शिवपार्वती आणि गणेशाची मूर्ती आहे.
मंदिराची अवस्था बघून इकडे कोणी लक्षं देत नसावे असं दिसून येत आहे.
मंदिराच्या परिसरात एक मोठ्ठं वडाचं झाड आहे आणि त्याखाली काही देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.

मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलोत, आता या जागेची आठवण म्हणून काही फोटो काढतं आहोत.
सगळे मित्र थंडीमुळे कुडकुडतं आहेत.
गावातून एक आजीबाई वर मंदिराकडेच येत आहेत.
थंडीपासून संरक्षण म्हणून म्हाताऱ्या आजीबाईने घोंगडी पांघरून घेतलेली आहे.
आज कित्येक दिवसांनंतर घोंगडी पाहायला मिळाली, नाहीतरी घोंगडीची जागा स्वेटर कधीपासूनचं काबीज करत येत आहे.
इतक्यात त्या आजिबाई आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या सुद्धा आणि त्यांनी चक्क आमच्याशी बोलायलासुद्धा सुरुवात केली.

आजीबाई :- कुठले व्हा बाबांनो ?
आम्ही :- नांदेडचेचं आहोत आजी.
आजीबाई :- च्हा पिता का, जरा गरम वाटल ? (बहुतेक त्यांनी आम्हाला कुडकुडताना पाहिलं असावं)
आम्ही :- चहा नको आजी, तुमच्या नुसत्या विचारण्यानेच उबदारपणा जाणवला.

त्या अनामिक आजीच्या मायेच्या उबेची आठवण राहावी म्हणून आम्ही आजीला त्यांची फोटो काढण्याची परवानगी मागितली.
आजीनेही नकार दिला नाही.
आजीची फोटो काढल्यानंतर आम्ही नरसिंह मंदिराकडे जायचे ठरविले. आता रस्ता सुद्धा कळाला होता.

गावातील अरूंद गल्लीबोळांतून आमची गाडी पुढे जात आहे, इतक्यात समोरच शंखतीर्थ ह्या ठिकाणाची माहिती सांगणारा फलक दिसला.
आम्ही आता गाडींवरून उतरलोच आहोत, तोच आमच्या नजरा डावीकडे वळल्या.

आमच्या तोंडून नकळतच सुंदर, अप्रतीम, जबरदस्त असे शब्द बाहेर पडत आहेत, कारण मंदिर आहेच इतकं सुंदर की प्रथमदर्शी कोणालाही आपण चुकून काळाच्या पाचशे - सहाशे वर्षं मागे तर आलो नाहीत ना असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे असे हे हेमाडपंथी मंदिर आहे.
पूर्वीच्या मंदिराची फारच पडझड झाली होती, त्यामूळे ते मंदिर पाडून त्याजागी हुबेहूब पूर्वीप्रमानेच हे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे अशी माहिती त्या फलकावरून मिळाली.

आता आम्ही नृसिंह मंदिराचे दर्शन घेत आहोत.
इथेही मंदिराचे स्वरूप मुखमंडप, गाभारा, सभामंडप आणि गाभारा असे आहे.
गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती सौम्यरुपाची आहे.
मंदिराच्या आवारात एकूण ४ मंदिरे आहेत. (महादेव मंदिर, नृसिंह मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल-रुख्माईचे मंदिर आणि कोण्यातरी महाराजाच्या २-३ समाध्या.
त्या समाध्यांजवळ काही पायर्‍या दिसत आहेत.
सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही आता तिकडेच निघालो आहोत.
त्या ४-५ पायऱ्या चढून पुढचे दृष्य पाहिल्यानंतर परत एकदा आमच्या तोंडून तेचं शब्द बाहेर पडत होते.
अप्रतिम ! सुंदर ! जबरदस्त !
कारण पुढचे दृष्यच तसे आहे.

पुढे दिसत आहे गोदावरी नदीचे विशाल पात्र आणि नदीच्या पात्रात नरसिंहाचे अजून एक इवलेसे मंदिर.
इतका वेळ आम्हाला मंदिर किती उंचीवर आहे याची कल्पनाच नव्हती पण आता खालचे दृष्य पाहिल्यानंतर मात्र मंदिराच्या उंचीची जाणीव होत आहे.

नदीच्या ऎन पात्रात नरसिंहाचे देऊळ आहे.
या ठिकाणी भगवान विष्णु नरसिंह रूपात भक्तांच्या रक्षणासाठी गोदावरीच्या पात्रात राहतात असे मानतात.
गोदावरी नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते आणि आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रीजवळ समुद्रला मिळते.
या संपूर्ण मार्गाचा मध्य म्हणजे हे गाव होय असेही म्हणतात.
गोदावरी नांदेडजवळ पश्चिमवाहिनी आहे तर येथे ती परत पुर्ववाहिनी झालेली आहे.

सध्या नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी त्यात पाणी आहे.
नदीच्या ऎन पात्रात नरसिंहाचे देऊळ आहे. पण आता मात्र तिथे जायला रस्ता नाहीये कारण मध्येच नदीचे पाणी आहे.
एक गावकरी आमच्या समोरुन त्या पाण्यातून रस्ता काढत मंदिरात जाऊन आला आणि आम्ही शहरातील भित्रे प्राणी मात्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आहोत.

नदीच्या काठाहून फिरताना आम्हाला अनेक पक्षी दिसत आहेत.
अजून उन पडलेले नसल्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न आणि निसर्गरम्य वाटत आहे.

सकाळचे ८.३० वाजले आहेत आणि आता आम्ही सर्व देवांना, 'या' निसर्गाला आणि 'त्या' म्हाताऱ्या आजीबाईला नमन करून घराकडे परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत.


Saturday, January 3, 2009

हॅलो कौन.... ? पैचान कौन !

नमस्कार मित्रांनो,
स्टार वन ह्या चॅनेलवर "हॅलो कौन.... पैचान कौन" ही नवीन मालिका सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाचा मूळ उद्देश भारतातील सर्वात चांगला मिमिक्री आर्टिस्ट शोधणे हा आहे.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आहेत नविन प्रभाकर (पैचान कौन फेम) आणि ऐश्वर्या, तर कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून चंकी पांडे आणि सुरेश मेनन हे काम पाहतील.

तुम्हाला वाटत असेल की आपला ब्लॉग तर नांदेडशी संबंधित आहे मग मी ह्या कार्यक्रमाची का प्रसिद्धी करीत आहे.
तर मित्रांनो तुम्हाला हे ऐकून खुशी होईल,
की नांदेडचे 'रामेश्वर महाजन ' (जॉनी लिव्हर यांचे डुप्लिकेट) हे या कार्यक्रमातील स्पर्धकांपैकी एक आहेत.

आहे की नाही मित्रांनो आपल्या नांदेडसाठी गौरवाची बाब ?

शनिवारी रात्री ९ वाजता तुम्ही हा कार्यक्रम स्टार वन वाहिनीवर पाहू शकता.


नांदेडीअन्सतर्फे
रामेश्वर महाजन यांना त्यांच्या स्पर्धेतील आणि जीवनातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Thursday, January 1, 2009

सोमेश्वर - एक उपेक्षित देवस्थान आणि पर्यटनस्थळ

नमस्कार मित्रांनो,
राहेरबद्दल लिहिल्यानंतर प्रवासवर्णन लिहिण्याची ही माझी दुसरीच वेळ.

सध्या कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाणे हाच एक उद्योग.
तर असेच आम्ही मित्र गेलो होतो नांदेडपासून १५-२० कि.मी. अंतरावर असलेल्या सोमेश्वर या ठिकाणी.
नाव अपरिचित वाटतयं ना ? परिचयाचं असण्याचं काही कारणही नाही, कारण इतके सुंदर, निसर्गरम्य ठिकाण असूनही याची कुठेही फार प्रसिद्धी झालेली नाही.

सहज एकदा गुगल अर्थ पाहात असताना त्यात हे इवलसं, टुमदार गाव दिसलं. पण गुगल अर्थमध्ये त्याचं नाव किंवा इतर माहिती कळाली नाही म्हणून विकिमॅपिया ही साईट उघडली आणि त्यातून कळालं की हे गाव सोमेश्वरआहे आणि तिथे एक महादेव मंदिर सुद्धा आहे.
इंटरनेटवरून सोमेश्वरबद्दल अजून माहिती काढायचा प्रयत्न केला पण निकाल शून्य. अनेक पुस्तकं शोधून पाहिली, अनेक व्यक्तींना विचारून पाहिलं पण कुणालाच काही माहित नव्हतं.
गुगल अर्थवरून तर हे गाव फार छान दिसत होतं म्हणून तिथे जाण्याचा बेतसुद्धा रद्द करवतं नव्हता.
शेवटी धाडस करून १५-१२-०८ रोजी आम्ही सोमेश्वरला जायचं ठरवलचं.

भल्या पहाटे ६.३० वाजता आम्ही निघालोत सोमेश्वरला.

नांदेड-लालवाडी-नाळेश्वर-राहाटी-सोमेश्वर असा रस्ता माहीत होता.
२०-२५ मिनिटांतच आम्ही नाळेश्वरला पोहोचलो आणि तिथून १० मिनिटांत सोमेश्वरला पोहोचलोत पण मंदिराचा कुठे ठाव-ठिकाणा लागत नव्हता.
गावात थोडसं आत शिरल्यावर एका मंदिराचा कळस दिसला, आम्ही त्या दिशेला जाणारचं होतोत पण एव्हाना गाव जागं झालं होत. एका घराच्या ओट्यावर २-३ माणसं बसली होती, बहुधा त्यांनी आमची होणारी घालमेल पाहिली असावी कारण त्यातील एकाने दुरूनच आम्हाला ओरडून विचारले की. "
कुठं जायचं हाय पाव्हणं ?"
आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सोमेश्वरच्या महादेव मंदिराला जायचयं, पण रस्ता सापडत नाहीये.
त्या माणसाने सांगितलं की आम्ही चुकून थोडसं पुढे आलोत. त्या माणसाने आम्हाला कोणत्या रस्त्याने, कोणत्यादिशेने जायचं याबद्दल सांगितलं.

आम्ही त्यांचे आभार मानून त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने निघालो.
१००-२०० मिटरपर्यंत रस्ता बरा होता पण थोडं पुढे गेल्यावर मात्र या ठिकाणाची म्हणावी तेवढी प्रसिद्धी का झाली नाही याचे कारण कळाले.
जेमतेम एक मोटरसायकल जाईल इतका प्रचंड(?) मोठा रस्ता
आणि त्यात भर म्हणून रस्त्याच्या दोन्ही कडेला भारताचं भवितव्यं असणारी २०-३० बालके तांब्या घेऊन बसली होती.
R.T.O. इन्स्पेक्टरने उगाच डोळे बंद करून मला ड्राईव्हींग लाईसन्स दिले नाही हे दाखवून देण्यासाठी मी हिम्मत करून गाडी त्याच रस्त्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वीही झालो.
(मला गाडी चालविता येते हे पाहूनच मला लाईसन्स दिलयं हे अशा प्रकारे सिद्धं झालं.)


अजून थोडसं पुढं गेल्यावर परत एकदा बरा (इतर कोणत्याही खेडेगावात असतो तसा.) रस्ता लागला.
२-३ कि.मी. पर्यंतच आम्हाला हा बरा रस्ता अनुभवायला मिळाला, कारण मंदिर अगदी ५००-६०० मिटरच्या टप्प्यावर आलेलं असताना पुन्हा एकदा खराब रस्ता सुरु झाला. (खरं तर इथे मी 'रस्ता' हा शब्द वापरल्याने सा.बां.वि. च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्यासं माफी असावी.)


अक्षरशः अगदी चिखलापासून तयार झालेली ही एक पायवाटचं आहे.
कधिकाळी एखाद्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्यावरून गेल्यामुळे त्याला रस्त्याचे स्वरूप आले आहे.
अगदी हिवाळ्यातसुद्धा त्या वाटेवर चिखल साचला होता मग पावसाळ्यात तर ह्या रस्त्याची कल्पना न केलेलीच बरी.

हा रस्ता संपताक्षणीच महादेव मंदिर दिसले.
एव्हाना आमची आणि आमच्या गाडीची पुरती दमछाक झाली होती त्यामुळे आता लगेच महादेवाचे दर्शन घ्यायचे आणि परत फिरायचे हीच गोष्ट मनात होती.
पण मंदिरात पोहोचताक्षणीचं पुढे जे दृष्य दिसलं त्याने आमचा सगळा शीन घालवाला.
छान, सुंदर, सुबक असे महादेवाचे मंदिर जणू आम्हाला सांगत होते की '
सबर का फल मिठा होता है '.

इथले महादेव मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे आणि प्राचिन आहे पण बाहेर नव्यानेच बांधलेला चबुतरा आणि दीपमाळसुद्धा आहे.
मंदिराच्या आवारातचं एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथऱ्यावर श्री हनुमान विसर्जित आहेत.

गोदावरीच्या अगदी काठावरच हे मंदिर असल्याने आजूबाजूचा सर्व परिसर हिरवागार आहे.
हा
मंदिराचा परिसरइतका नयनरम्य आहे की आम्ही स्वतःला पायी फिरण्यापासून थांबवू शकलो नाही.
विष्णूपुरी जलाशयाचं बॅकवाटर असल्यामुळे इथे जवळपास वर्षभर पाणी असतं.
नदिच्या काठावरच एक भलं मोठ्ठं वडाचं झाड आहे.
तिथून
दिसणारे निसर्गाचे रूप तर माथेरान, महाबळेश्वरच्या एखाद्या टुरीस्ट स्पॉटालाही लाजवेल असं आहे.


सोमेश्वरला भेट द्यायची ठरवल्यास चारचाकी गाडी नेण्याचा चुकूनही विचार करू नये.
नांदेड ते सोमेश्वर या रस्त्यावर कुठेही खाण्यापिण्याची सोय नाही.
त्यामुळे वनभोजनाचा आनंद लुटायचा असेल तर घरूनच डब्बा घेऊन जाणे उत्तम.

एकंदरित 'ते' विश्वस्तरीय रस्ते सोडले तर सोमेश्वर हे ठिकाण एकदा तरी नक्की आवर्जून भेट देण्यासारखे आहे।


~(*)~ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ~(*)~

कटू गोड आठवणींसह
गेलेले ते वर्ष जुने
आता इतिहासी जमा होवो,
आणि तुम्हा सर्वांना
हे नवीन वर्ष सुखाचे जावो.



नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!



!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!



!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!



!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!