Saturday, January 10, 2009

शंखतीर्थ - गोदाकाठच्या खजिन्यातील एक मोती


दिनांक
१७ डिसेंबर २००८.

सकाळचे ६ वाजलेले आहेत आणि आमच्या मोटारसायकल्सने दिशा धरली आहे शंखतीर्थ या ठिकाणाकडची.

थंडी जास्त आहे म्हणून गाडीचा वेग कमी आहे.
अक्षरशः धुक्यातून मार्ग काढत चालली आहे गाडी.
पक्षी जागे झाले आहेत आणि शेतात आलेल्या पिकावर एकदाच धावा कसा बोलायचा याचा विजेच्या तारांवर बसून बेत आखत आहेत.

निसर्गाचा आणि थंडीचा आस्वाद लुटत आम्ही आमदुरा गावाजवळील गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलावर पोहोचलो आहोत.

इथून शिकारघाट गुरुद्वाऱ्याचे अंतर जेमतेम ४०० - ५०० मिटर आहे पण आज जरा जास्तचं धुकं आहे त्यामुळे एरव्ही या पुलाहून अतिशय सुंदर दिसणाऱ्या गुरुद्वाऱ्याचे आज दर्शनसुद्धा झाले नाही.
आमदुरा गाव आले, डावीकडे जाणारा रस्ता मुदखेडला चालला आहे पण आम्हाला उजवीकडे आमदुरा गावात जाणाऱ्या रस्त्याने शंखतीर्थला जावे लागणार आहे.
आमदुरा गावातील पुरुष मंडळी मंदिराच्या चौथऱ्यावर गप्पा मारत बसली आहेत तर स्त्रिया आपापल्या घरापुढे झाडून काढून सडा टाकत आहेत.

आता आम्ही आमदुरा गावातून बाहेर पडलो आहोत.
पुढे वासरी या गावाची पाटी मोडलेल्या आणि वाकलेल्या अवस्थेत दिसत आहे.
उजवीकडे जाणारा रस्ता वासरी या गावाकडे जात आहे तर पुढे सरळ जाणारा रस्ता शंखतीर्थकडे जात आहे.

वासरीच्या पाटीपासून थोड्याच अंतरावर वीटभट्ट्या आहेत...
वीटभट्ट्यांवरील कामगार कामाला लागलेले दिसत आहेत.

आता मात्र रस्ता थोडा खराब आहे.
बहुधा शंखतीर्थपर्यंत हा रस्ता असाच असावा, कारण शंखतीर्थ आता फक्त ३-४ की.मी. अंतरावर आहे.
शंखतीर्थ जवळ आल्याची खुशीही मनात आहे आणि अशा रस्त्यामुळे हाडं खिळखिळी होण्याची भीतीही वाटतं आहे.
पण म्हणतात ना की संत गोरा कुंभार हे विठ्ठलाच्या भक्तीत इतके तल्लीन होऊन गेले होते की त्यांना कळालेच नाही आपण कधीपासून चिखलाऎवजी आपल्या लहान बाळालाचं पायाखाली तुडवतं आहोत.
तशीचं काहिशी ओढ आमच्या मनात शंखतीर्थबद्दल निर्माण झाली आहे त्यामुळे रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आम्ही आगेकूच करीत आहोत.

हे काय !
पुढे तर शंखतीर्थ गाव आले सुद्धा.
गावात छोटे-छोटे ३-४ रस्ते दिसत आहेत, कोणता रस्ता नेमक्या कोणत्या मंदिरात जातो ?
कोण्यातरी गावकऱ्याला विचारावे लागेल.
तो काय, एक माणूस त्याच्या छोट्याशा घरापुढे बसला आहे. त्यालाच विचारतो......

मी :- मामा महादेव मंदिर कुठे आहे ?
तो :- हे काय इथून (बोटाच्या इशाऱ्याने) थोडसं पुढे जाऊन उजवीकडं वळायचं.
मी :- आणि नृसिंह मंदिर ?
तो :- ते तं मागचं ह्रायलं बगा.
मी :- मागं म्हणजे खूप दूर राहिलं का ?
तो :- न्हाई ओ, थोडं मागं जाऊन गावात जाणाऱ्या रस्त्यानं गेलं की आलचं मंदिर.
मी :- ठीक आहे, धन्यवाद मामा.

मामाला धन्यवाद म्हणून पुढे निघालो आहोत.
पहिल्यांदा महादेव मंदिरात जायचं ठरवलं.
हे काय, आलोत सुद्धा मंदिरात !

मंदिर हेमाडपंथी असून अतिशय जुनं दिसत आहे.
या मंदिरात जास्त कोरीव काम दिसत नाहीये. मंदिरात सभामंडप, अंतराळ आणि गाभारा आहे.
मंदिरात तुळ्यांवर उलटे नाग कोरले आहेत.
मंदिराच्या एका गाभाऱ्यात विष्णुची मुर्ती आहे.
कोपऱ्यात काळभैरव, शिवपार्वती आणि गणेशाची मूर्ती आहे.
मंदिराची अवस्था बघून इकडे कोणी लक्षं देत नसावे असं दिसून येत आहे.
मंदिराच्या परिसरात एक मोठ्ठं वडाचं झाड आहे आणि त्याखाली काही देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.

मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलोत, आता या जागेची आठवण म्हणून काही फोटो काढतं आहोत.
सगळे मित्र थंडीमुळे कुडकुडतं आहेत.
गावातून एक आजीबाई वर मंदिराकडेच येत आहेत.
थंडीपासून संरक्षण म्हणून म्हाताऱ्या आजीबाईने घोंगडी पांघरून घेतलेली आहे.
आज कित्येक दिवसांनंतर घोंगडी पाहायला मिळाली, नाहीतरी घोंगडीची जागा स्वेटर कधीपासूनचं काबीज करत येत आहे.
इतक्यात त्या आजिबाई आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या सुद्धा आणि त्यांनी चक्क आमच्याशी बोलायलासुद्धा सुरुवात केली.

आजीबाई :- कुठले व्हा बाबांनो ?
आम्ही :- नांदेडचेचं आहोत आजी.
आजीबाई :- च्हा पिता का, जरा गरम वाटल ? (बहुतेक त्यांनी आम्हाला कुडकुडताना पाहिलं असावं)
आम्ही :- चहा नको आजी, तुमच्या नुसत्या विचारण्यानेच उबदारपणा जाणवला.

त्या अनामिक आजीच्या मायेच्या उबेची आठवण राहावी म्हणून आम्ही आजीला त्यांची फोटो काढण्याची परवानगी मागितली.
आजीनेही नकार दिला नाही.
आजीची फोटो काढल्यानंतर आम्ही नरसिंह मंदिराकडे जायचे ठरविले. आता रस्ता सुद्धा कळाला होता.

गावातील अरूंद गल्लीबोळांतून आमची गाडी पुढे जात आहे, इतक्यात समोरच शंखतीर्थ ह्या ठिकाणाची माहिती सांगणारा फलक दिसला.
आम्ही आता गाडींवरून उतरलोच आहोत, तोच आमच्या नजरा डावीकडे वळल्या.

आमच्या तोंडून नकळतच सुंदर, अप्रतीम, जबरदस्त असे शब्द बाहेर पडत आहेत, कारण मंदिर आहेच इतकं सुंदर की प्रथमदर्शी कोणालाही आपण चुकून काळाच्या पाचशे - सहाशे वर्षं मागे तर आलो नाहीत ना असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे असे हे हेमाडपंथी मंदिर आहे.
पूर्वीच्या मंदिराची फारच पडझड झाली होती, त्यामूळे ते मंदिर पाडून त्याजागी हुबेहूब पूर्वीप्रमानेच हे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे अशी माहिती त्या फलकावरून मिळाली.

आता आम्ही नृसिंह मंदिराचे दर्शन घेत आहोत.
इथेही मंदिराचे स्वरूप मुखमंडप, गाभारा, सभामंडप आणि गाभारा असे आहे.
गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती सौम्यरुपाची आहे.
मंदिराच्या आवारात एकूण ४ मंदिरे आहेत. (महादेव मंदिर, नृसिंह मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल-रुख्माईचे मंदिर आणि कोण्यातरी महाराजाच्या २-३ समाध्या.
त्या समाध्यांजवळ काही पायर्‍या दिसत आहेत.
सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही आता तिकडेच निघालो आहोत.
त्या ४-५ पायऱ्या चढून पुढचे दृष्य पाहिल्यानंतर परत एकदा आमच्या तोंडून तेचं शब्द बाहेर पडत होते.
अप्रतिम ! सुंदर ! जबरदस्त !
कारण पुढचे दृष्यच तसे आहे.

पुढे दिसत आहे गोदावरी नदीचे विशाल पात्र आणि नदीच्या पात्रात नरसिंहाचे अजून एक इवलेसे मंदिर.
इतका वेळ आम्हाला मंदिर किती उंचीवर आहे याची कल्पनाच नव्हती पण आता खालचे दृष्य पाहिल्यानंतर मात्र मंदिराच्या उंचीची जाणीव होत आहे.

नदीच्या ऎन पात्रात नरसिंहाचे देऊळ आहे.
या ठिकाणी भगवान विष्णु नरसिंह रूपात भक्तांच्या रक्षणासाठी गोदावरीच्या पात्रात राहतात असे मानतात.
गोदावरी नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते आणि आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रीजवळ समुद्रला मिळते.
या संपूर्ण मार्गाचा मध्य म्हणजे हे गाव होय असेही म्हणतात.
गोदावरी नांदेडजवळ पश्चिमवाहिनी आहे तर येथे ती परत पुर्ववाहिनी झालेली आहे.

सध्या नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी त्यात पाणी आहे.
नदीच्या ऎन पात्रात नरसिंहाचे देऊळ आहे. पण आता मात्र तिथे जायला रस्ता नाहीये कारण मध्येच नदीचे पाणी आहे.
एक गावकरी आमच्या समोरुन त्या पाण्यातून रस्ता काढत मंदिरात जाऊन आला आणि आम्ही शहरातील भित्रे प्राणी मात्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आहोत.

नदीच्या काठाहून फिरताना आम्हाला अनेक पक्षी दिसत आहेत.
अजून उन पडलेले नसल्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न आणि निसर्गरम्य वाटत आहे.

सकाळचे ८.३० वाजले आहेत आणि आता आम्ही सर्व देवांना, 'या' निसर्गाला आणि 'त्या' म्हाताऱ्या आजीबाईला नमन करून घराकडे परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत.


5 comments:

Unknown said...

Hey..I never heard of this temple. Its really good..u visit the places and let us know.

I will definitely visit this place on next visitto Nanded. Why dont you visit the Das Ganu Pratishthan at Gortha near Umri???

Unknown said...

Hey..I never heard of this temple. Its really good..u visit the places and let us know.

I will definitely visit this place on next visitto Nanded. Why dont you visit the Das Ganu Pratishthan at Gortha near Umri???

सौरभ said...

Thanks you sir for your comment.
I'm glad that some1 is visiting this place due to me. :D

And for your info. Gortha is my village. :-)

I was there just a week before for the annual Jatra.

Would you like to see a topic on Gortha ?

Unknown said...

Hey Saurabh

Thanks a lot for your reply. Yes, I would like to read an article on Gortha. Its good to hear that Gortha is a your native place.

And I really like the articles, the way you writr its, and mainly the professional language (no gramatical miustakes in the articles really amazes me, and also the pic covering of the places.

Thanks a lot and wish you and your blog a big success and all the best.

Regards

Unknown said...

सुंदर वर्णन केलेले आहे, सरजी. इतर भाविकासाठी वाटाड्या चे काम केले आहे.

Post a Comment

Post a Comment