Thursday, January 1, 2009

सोमेश्वर - एक उपेक्षित देवस्थान आणि पर्यटनस्थळ

नमस्कार मित्रांनो,
राहेरबद्दल लिहिल्यानंतर प्रवासवर्णन लिहिण्याची ही माझी दुसरीच वेळ.

सध्या कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाणे हाच एक उद्योग.
तर असेच आम्ही मित्र गेलो होतो नांदेडपासून १५-२० कि.मी. अंतरावर असलेल्या सोमेश्वर या ठिकाणी.
नाव अपरिचित वाटतयं ना ? परिचयाचं असण्याचं काही कारणही नाही, कारण इतके सुंदर, निसर्गरम्य ठिकाण असूनही याची कुठेही फार प्रसिद्धी झालेली नाही.

सहज एकदा गुगल अर्थ पाहात असताना त्यात हे इवलसं, टुमदार गाव दिसलं. पण गुगल अर्थमध्ये त्याचं नाव किंवा इतर माहिती कळाली नाही म्हणून विकिमॅपिया ही साईट उघडली आणि त्यातून कळालं की हे गाव सोमेश्वरआहे आणि तिथे एक महादेव मंदिर सुद्धा आहे.
इंटरनेटवरून सोमेश्वरबद्दल अजून माहिती काढायचा प्रयत्न केला पण निकाल शून्य. अनेक पुस्तकं शोधून पाहिली, अनेक व्यक्तींना विचारून पाहिलं पण कुणालाच काही माहित नव्हतं.
गुगल अर्थवरून तर हे गाव फार छान दिसत होतं म्हणून तिथे जाण्याचा बेतसुद्धा रद्द करवतं नव्हता.
शेवटी धाडस करून १५-१२-०८ रोजी आम्ही सोमेश्वरला जायचं ठरवलचं.

भल्या पहाटे ६.३० वाजता आम्ही निघालोत सोमेश्वरला.

नांदेड-लालवाडी-नाळेश्वर-राहाटी-सोमेश्वर असा रस्ता माहीत होता.
२०-२५ मिनिटांतच आम्ही नाळेश्वरला पोहोचलो आणि तिथून १० मिनिटांत सोमेश्वरला पोहोचलोत पण मंदिराचा कुठे ठाव-ठिकाणा लागत नव्हता.
गावात थोडसं आत शिरल्यावर एका मंदिराचा कळस दिसला, आम्ही त्या दिशेला जाणारचं होतोत पण एव्हाना गाव जागं झालं होत. एका घराच्या ओट्यावर २-३ माणसं बसली होती, बहुधा त्यांनी आमची होणारी घालमेल पाहिली असावी कारण त्यातील एकाने दुरूनच आम्हाला ओरडून विचारले की. "
कुठं जायचं हाय पाव्हणं ?"
आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सोमेश्वरच्या महादेव मंदिराला जायचयं, पण रस्ता सापडत नाहीये.
त्या माणसाने सांगितलं की आम्ही चुकून थोडसं पुढे आलोत. त्या माणसाने आम्हाला कोणत्या रस्त्याने, कोणत्यादिशेने जायचं याबद्दल सांगितलं.

आम्ही त्यांचे आभार मानून त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने निघालो.
१००-२०० मिटरपर्यंत रस्ता बरा होता पण थोडं पुढे गेल्यावर मात्र या ठिकाणाची म्हणावी तेवढी प्रसिद्धी का झाली नाही याचे कारण कळाले.
जेमतेम एक मोटरसायकल जाईल इतका प्रचंड(?) मोठा रस्ता
आणि त्यात भर म्हणून रस्त्याच्या दोन्ही कडेला भारताचं भवितव्यं असणारी २०-३० बालके तांब्या घेऊन बसली होती.
R.T.O. इन्स्पेक्टरने उगाच डोळे बंद करून मला ड्राईव्हींग लाईसन्स दिले नाही हे दाखवून देण्यासाठी मी हिम्मत करून गाडी त्याच रस्त्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वीही झालो.
(मला गाडी चालविता येते हे पाहूनच मला लाईसन्स दिलयं हे अशा प्रकारे सिद्धं झालं.)


अजून थोडसं पुढं गेल्यावर परत एकदा बरा (इतर कोणत्याही खेडेगावात असतो तसा.) रस्ता लागला.
२-३ कि.मी. पर्यंतच आम्हाला हा बरा रस्ता अनुभवायला मिळाला, कारण मंदिर अगदी ५००-६०० मिटरच्या टप्प्यावर आलेलं असताना पुन्हा एकदा खराब रस्ता सुरु झाला. (खरं तर इथे मी 'रस्ता' हा शब्द वापरल्याने सा.बां.वि. च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्यासं माफी असावी.)


अक्षरशः अगदी चिखलापासून तयार झालेली ही एक पायवाटचं आहे.
कधिकाळी एखाद्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्यावरून गेल्यामुळे त्याला रस्त्याचे स्वरूप आले आहे.
अगदी हिवाळ्यातसुद्धा त्या वाटेवर चिखल साचला होता मग पावसाळ्यात तर ह्या रस्त्याची कल्पना न केलेलीच बरी.

हा रस्ता संपताक्षणीच महादेव मंदिर दिसले.
एव्हाना आमची आणि आमच्या गाडीची पुरती दमछाक झाली होती त्यामुळे आता लगेच महादेवाचे दर्शन घ्यायचे आणि परत फिरायचे हीच गोष्ट मनात होती.
पण मंदिरात पोहोचताक्षणीचं पुढे जे दृष्य दिसलं त्याने आमचा सगळा शीन घालवाला.
छान, सुंदर, सुबक असे महादेवाचे मंदिर जणू आम्हाला सांगत होते की '
सबर का फल मिठा होता है '.

इथले महादेव मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे आणि प्राचिन आहे पण बाहेर नव्यानेच बांधलेला चबुतरा आणि दीपमाळसुद्धा आहे.
मंदिराच्या आवारातचं एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथऱ्यावर श्री हनुमान विसर्जित आहेत.

गोदावरीच्या अगदी काठावरच हे मंदिर असल्याने आजूबाजूचा सर्व परिसर हिरवागार आहे.
हा
मंदिराचा परिसरइतका नयनरम्य आहे की आम्ही स्वतःला पायी फिरण्यापासून थांबवू शकलो नाही.
विष्णूपुरी जलाशयाचं बॅकवाटर असल्यामुळे इथे जवळपास वर्षभर पाणी असतं.
नदिच्या काठावरच एक भलं मोठ्ठं वडाचं झाड आहे.
तिथून
दिसणारे निसर्गाचे रूप तर माथेरान, महाबळेश्वरच्या एखाद्या टुरीस्ट स्पॉटालाही लाजवेल असं आहे.


सोमेश्वरला भेट द्यायची ठरवल्यास चारचाकी गाडी नेण्याचा चुकूनही विचार करू नये.
नांदेड ते सोमेश्वर या रस्त्यावर कुठेही खाण्यापिण्याची सोय नाही.
त्यामुळे वनभोजनाचा आनंद लुटायचा असेल तर घरूनच डब्बा घेऊन जाणे उत्तम.

एकंदरित 'ते' विश्वस्तरीय रस्ते सोडले तर सोमेश्वर हे ठिकाण एकदा तरी नक्की आवर्जून भेट देण्यासारखे आहे।


2 comments:

LOVELY NANDED said...

bahut acha hai tumara blogger

acha laga dost

सौरभ said...

Thanks for your comment sir.

Post a Comment

Post a Comment