Wednesday, March 4, 2009
गोरठा (खास वाचकांच्या आग्रहास्तव)
नमस्कार मित्रांनो,
आपल्या ब्लॉगच्या दोन वाचकांनी आणि माझ्या काही मित्रांनी मला गोरठा ह्या गावाबद्दल माहितीपूर्ण लेख लिहायला सांगितला होता. (योगायोगाने गोरठा हे माझे गाव आहे.)
मला गोरठ्याबद्दल तसेच पर्यायाने संत श्री. दासगणू महाराज यांच्याबद्दल लिहायला मिळत आहे हे मी माझे भाग्यच समजतो.
गोरठा हे गाव नांदेडपासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर आहे.
गोरठा येथे संत श्री. दासगणू महाराजांची वस्त्रसमाधी आहे.
संत श्री. दासगणू महाराजांचे संपूर्ण नाव गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे आहे.
त्यांचा जन्म १८६७ मध्ये अकोळनेर येथे झाला.
पुढे त्यांनी पोलिसाची नौकरी केली.
यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले.
तेव्हापासून त्यांची अशी धारना झाली की देवानेच आपल्याला वाचविले.
मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
त्यांनी पोलिसाची नौकरीसुद्धा सोडली.
ते शिर्डीच्या साईबाबाला आपल्या गुरूस्थानी मानत.
दासगणू महाराज फार छान पद्यरचना करायचे.
त्यांनी अनेक संतांची चरित्रेसुद्धा लिहीली.
१९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला, पण गोरठ्यातील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांचे समाधीमंदीर इथेच गोरठ्यात बांधण्यात आले.
हे मंदीर दोन मजली आहे.
खालच्या भागात दासगणू महाराजांची समाधी आहे तर वरच्या मजल्यावर ध्यानगृह आहे.
या ध्यानगृहात विष्णू-नारायनाचे अत्यंत सुंदर व सुबक असे तैलचित्र आहे.
गोरठ्यातले दुसरे संत म्हणजे स्वामी वरदानंद भारती.
वरदानंद भारती हे संत दासगणू महाराजांचे दत्तकपुत्र होते.
त्यांनी गोरठ्यामध्ये अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अशी अनेक कामे केली.
इतकेच नव्हे तर ते किर्तन, प्रवचन करण्यासाठी भारतभर फिरत.
स्वामी वरदानंद भारती यांनी ५ सप्टेंबर २००२ रोजी उत्तरकाशी येथे देह ठेवला.
स्वामी वरदानंद भारती हे प्रसिद्धीपासून नेहमी दूरच राहिले त्यामुळे त्यांच्या कार्याची लोकांना फारशी माहिती झाली नाही.
गावात दरवर्षी एक छोटीशी जत्रादेखील भरते.
जत्रेच्या दिवशी सर्व ग्रामस्थ मंडळी ८ ते १० कि.मी. दूरवरुन आपापल्या कावड्यांत गोदावरी नदीचे पाणी आणून पुजारी महाराजांकडे सोपवितात आणि मग पुजारी महाराज गोदावरीच्या त्या पवित्र पाण्याने समाधिचा अभिषेक करतात.
या जलाभिषेकादरम्य़ान पुजाऱ्यांशिवाय कुणालाही आत येण्याची परवानगी नसते.
सध्या मंदीराची सगळी व्यवस्था श्रीमती गार्गी देशपांडे ह्या पाहात आहेत.
कौमार्यव्रताचे पालन करून गेली अनेक वर्षे संस्थानातर्फे चालणाऱ्या सर्व कामांचे नियोजन त्या करीत आहेत.
३-४ वर्षांपूर्वी मंदीराच्या मागच्या बाजूस संजीवन नावाची एक वास्तू बांधली आहे.
या इमारतीत स्वामी वरदानंद भारती यांच्या विविध छायाचित्रांचा संग्रह केला आहे आणि त्यातून त्यांचा जीवनपट दाखविला आहे.
मंदीरात फोटो काढण्यास मनाई आहे, पण विचार करण्याची बाब ही आहे की संजीवर ही वास्तू पूर्णतः छायाचित्रांवरच अवलंबून आहे.
जर त्या काळी त्या फोटो काढल्या नसत्या तर आज संजीवन सारखी नितांतसुंदर अशी वास्तू उभीच राहिली नसती.
तर असे आहे आमचे गाव.
हा लेख वाचून एखादा व्यक्ती जरी गोरठ्यात गेला तर ह्या लेखाचे सार्थक झाले असे मी समजेन.
माझ्या गोरठे गावात
हळू उतरे पहाट
अप्पाजींची मंगल वाणी
आम्हा दाखविते वाट.
माझ्या गोरठे गावात
शांतवितसे ओहोळ
प्रवृत्ती निवृत्ती काठ
भक्तिरस त्यात जळ.
माझ्या गोरठे गावाला
बाळेराजाची राखण
कपाशीत उतू जाई
कोजागिरीचं चांदणं.
गावभागी शिरावरी
ध्वज डोलतो केशरी
मरगळल्या मनाला
पुन्हा येतसे उभारी.
माझ्या गोरठे गावाची
असे एकच माऊली
दासगणूची ही कृपा
जशी शीतळ साऊली.
माझ्या गोरठे गावात
आता आकारती शब्द
बोल बोबडे ऎकण्या
वारा होतसे निशब्द.
माझ्या गोरठे गावात
नांदो लक्ष्मी - सरस्वती
राहो एकतेची याद
दूरवर जावो कीर्ती.
(कविता :- डॉ. सुरेश सावंत यांच्या दुभंग ह्या कवितासंग्रहातून साभार)
Labels:
निसर्ग/पर्यटन/प्रवासवर्णन
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment