आज परत वाहतूकीचे हाल-हवाल पाहण्यासाठी राऊंडवर जाऊन आलो.
काही विशेष नाही हो, उगीच आपली एक भाबडी आशा की ट्रॅफिकला शिस्त लागली असेल आजपासून.
मामा, कालचा लेख वाचून माझे मित्र मला काय म्हणाले माहित आहे का ?
ते म्हणाले की, "तुझं कसं रे लक्ष गेलं सिग्नल्सकडे ? आम्हाला तर माहित देखील नव्हतं की ही खांब्यावरची लाईटींग सुरू झाली आहे म्हणून."
आत्ता बोला !
किती पांचट जोक मारतात नाही ?
जाऊ देत, त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा ? त्यांना लहाणपणीच मास्तरांनी शिकवलंय की निर्जीव वस्तूंमध्ये कसलिही हालचाल होत नसते.
इतके दिवस हे सिग्नल्सचे खांबे धूळखात पडूनच होते ना, त्यामुळे मित्रांना कसे कळणार की या निर्जीव वस्तूमधे सजिवांना थांबवण्याची ताकद आहे.
काल असाच मी रेड सिग्नल लागल्यामुळे गाडी बंद करून थांबलो होतो, पण माझ्या मागून येणार्या गाड्या तशाच पुढे जात होत्या.
एक दोघे तर माझ्याकडे पाहून इतक्या कुत्सीतपणे हसले की बस्स. मला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले.
रेड सिग्नलवर थांबणे म्हणजे बेशिस्त की थांबलेल्यावर हसणे म्हणजे शिस्त हे तुम्हीच सांगा आता.
लक्ष्मिकांत बेर्डेचा एक चित्रपट होता, त्यात त्याला लाल रंग दिसला की त्याची सगळी शक्ती निघून जायची पण आपल्या नांदेडीअन्सचे याच्या उलटे आहे.
त्यांना ट्रॅफिक सिग्नलचा लाल रंग दिसला की त्यांच्या अंगात शक्ती संचारते जी त्यांना वाहतूकीचे नियम मोडायला प्रवृत्त करते.
असं काय करता मामा ?
अहो पुण्या-मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलमधला लाल रंग नांदेडच्या ट्रॅफिक सिग्नलपेक्षा जास्त गडद आहे का ?
नाही ना ?
मग नांदेडचीच वाहतूक इतकी बेशिस्त का ?
का बरे थांबत नसतील नांदेडीअन्स रेड लाईट लागल्यावर ?
ट्रॅफिक सिग्नलचे सोडा मामा, ते तरी शिट्टी वाजवून नियम मोडणार्याला अडवू शकत नाहीत पण तुम्ही तर आहात ना ? (खरं पाहता तुम्ही कुठे असता हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.)
पण माझे ते दुष्ट मित्र आहेत ना, ते मला नेहमी सांगत असतात की तुम्ही ट्रॅफिक सिग्नलच्या आसपासच्या हॉटेलात हमखास आढळता म्हणे.
काय मामा, तुम्हीच असं करत असाल तर सामान्य जनतेकडून वाहतूकीचे नियम पाळल्या जाण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे गुन्हाच होईल की !
कालच माझे मित्र म्हणाले की, ’चल तुला जादू दाखवतो.’
मी म्हणालो , ’कसली जादू’ ?
जादूचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ते मला त्यांच्या सोबत घेऊन निघाले..
कधी नाही ते पुढे चौकात तुम्ही उभे होतात.
माझे मित्र म्हणाले, "चौकातून ट्रिपल सीट जाताना आम्ही अदृष्य होऊन दाखवतोत."
मी तर चक्रावून गेलो त्यांचे बोलणे ऎकून. मला काहीच कळाले नाही ते काय बोलत होते ते.
एव्हढ्यात ते गाडीवर ट्रिपल सीट बसून तुमच्या पुढून आरामात, सावकाश निघून देखील गेले.
माझ्याजवळ परत येऊन ते म्हणाले, "बघ झालो होतोत की नाही आम्ही अदृष्य ?"
"अरे मला तर तुम्ही दिसत होतात", माझे उत्तर.
तर ते म्हणाले, "ट्रॅफिकवाल्या मामाला दिसलोत का ? दिसलो असतो तर त्यांनी अडवलं नसतं का आम्हाला ?"
परत इतका पांचट जोक ऎकून मी कप्पाळावर हात मारून घेतला.
डी.वाय.एस.पी. ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही "ट्रॉफिक" सिग्नल्सची माहिती देणारा एक बोर्ड ठेवलाय, त्या ठिकाणी किती जणांचे लक्ष जाईल हे तुम्हीच प्रामाणिकपणे सांगा.
आज तुम्ही दादर्यावर वाहतूकीला नियंत्रीत करण्याचा प्रयत्न करत होतात. तुमच्या मागून-पुढून ऑटोरिक्षावाले अगदी स्टंट मारल्यासारखे ऑटॊ चालवत होते.
एक ऑटॊ तर तुम्हा-आम्हाला मच्छर समजून मनपाच्या त्या मच्छर मारण्याच्या गाडिलाही लाजवेल इतका धूर सोडत जात होता.
त्या वेळी PUC नावाची काहीतरी गोष्ट असते असे कुठेतरी वाचल्याचे आठवले पण तुम्ही त्याला एका शब्दानेही बोलला नाहीत म्हणजे माझ्याच वाचण्यात काहीतरी चुकीची माहिती आली असेल.
खरं सांगतो मामा, पेपरला जेव्हा वाचतो ना की अमूक एका ऑटोवाल्याने तुम्हाला मारले, तेव्हा फार वाईट वाटतं हो.
अहो ट्रॅफिकवाले आहात म्हणून काय झालं, तुम्हीही पोलीस मामाच आहात की !
तिथून पुढे आलो तर I.T.I. कॉर्नरला तुम्ही बहुतेक तुमच्या गावाकडच्या माणसाला बोलत उभे होतात.
तसं नाही, तुम्ही त्यांच्याशी भररस्त्यात त्यांना त्यांची गाडी थांबवायला लावून मनसोक्त गप्पा मारत होतात म्हणून सहज आपला एक अंदाज लावला हो !
खरं सांगतो मामा, एव्हढा सगळा लेखन प्रपंच तुमचा अपमान करण्यासाठी मुळीच लिहीला नाही हो.
लोकांच्या मनात दहशत बसवायला सांगत नाहीये मी, पण निदान आदरयुक्त भिती असायलाच हवी.
नांदेडीअन्सना वाहतूकीचे नियम मोडायचा कसलाही छंद नाहीये मामा, तुम्ही फक्त थोडं मनावर घ्या आणि मग बघा आपले नांदेडीअन्स तुम्हाला साथ देतात की नाही.
तुमचा एक नांदेडीअन भाचा,
सौरभ सावंत.
सौरभ सावंत.
2 comments:
यदा कदा, मामांनी कुणाला अडवले आणि त्याने इथून-तिथून ओळख कडून मामांची चंपी केली असेही होते...
१००% दोष मामांचाहि नाहीये...आणि लोकांनीही जवाबदारी स्वीकारायला शिकले पाहिजे...
असो, त्यांनी त्यांची ड्युटी मात्र योग्य प्रमाणात केलीच पाहिजे.... धन्यवाद
हा, हा, हा! मस्त आहे.
Post a Comment