नांदेड, १५ नोव्हेंबर/वार्ताहर
‘स्वाइन फ्लू’मुळे शहरातील संगीता कोंडेकर या महिलेचा मृत्यू झाला असून नागरिकांनी या आजाराबाबत दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे.
श्रीमती कोंडेकर यांच्या आजाराबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, १ नोव्हेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे असर्जन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथेही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने पुन्हा ४ नोव्हेंबरला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ८ नोव्हेंबरला लोटस हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करून त्याच दिवशी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे निदान झाले. परिणामी उपचारास विलंब लागल्याने १४ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांना मधुमेह असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होती. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा तात्काळ सल्ला दिला असता तर त्या वाचल्या असत्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘स्वाइन फ्लू’ची तीव्रता कमी झालेली नसून हिवाळ्यामुळे तो आणखी वाढण्याची शक्याता आहे.
त्यामुळे ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशा तक्रारी असतील त्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे.
नांदेडचे श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय, शिवाजीनगर भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यापाठोपाठ जिल्ह्य़ातील सर्व तालुकापातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची सोय आहे. पुरेशी औषधी, टॉमी फ्लू गोळ्या तसेच मास्कही उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसत्ता - मराठवाडा वृत्तांत (१६ नोव्हेंबर ०९)
Monday, November 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment