Thursday, April 8, 2010

नांदेडहून आता दिल्ली, नागपूरलाही विमानसेवा

नांदेड - नांदेडहून विमान सेवेचा विस्तार होत असून मंगळवारी (ता. सहा) दिल्ली- नांदेड-मुंबई मार्गे नागपूर या मार्गावर "गो एअर' या कंपनीची विमानसेवा सुरू झाली आहे.

आठवड्यातून दोन दिवशी ही सेवा असून एकाच दिवशी प्रस्थान व आगमन अशी सोय असल्याने या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुता गद्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने येथील विमान तळाचा विकास करण्यात आला. विमान तळासाठी लागणाऱ्या बहुतेक अद्ययावत सुविधा येथे उपलब्ध आहेत. मागील वर्षी किंगफिशर या विमान कंपनीने नांदेड-लातूर-मुंबई या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार व शुक्रवार) विमानसेवा सुरू केली. या सेवेला प्रारंभी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने काही कालावधीत खंड पडून आता ती पुन्हा नियमित सुरू झाली आहे. दरम्यान, येथील विमानतळाचे व्यवस्थापन शासनाने रिलायन्स कंपनीकडे सोपविले आहे.

नांदेडला धार्मिक पर्यटनाचे प्रमाण अधिक असून त्यातही गुरुद्वारामुळे पंजाब प्रांतातील भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या भाविकांना सोयीचे होईल, या दृष्टीने विमान सेवेची गरज ओळखून "गो एअर' या कंपनीशी करार करण्यात आला आहे. दिल्ली-नागपूर-नांदेड-मुंबई अशा या सेवेत नांदेड आता देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या दोन मेट्रोपॉलिटीन शहरांशी जोडले गेले आहे. शिवाय ही विमानसेवा आठवड्यातून मंगळवार आणि गुरुवार अशी दोन दिवस असल्याने आठवड्यातील पाचही कार्यालयीन दिवशी मुंबईला जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मंगळवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या सुमारास हे विमान दिल्लीहून नांदेडला पोचले. दिल्ली येथून या विमानाने 173 प्रवासी आले. येथील विमानतळावर त्याचे स्वागत करण्यात आले. नऊ वाजून 53 मिनिटांनी त्याने मुंबईकडे झेप घेतली. याद्वारे नांदेड येथून मुंबईला 72 प्रवासी गेले आहेत. त्यात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार डी. पी. सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, एमआयडीसीचे जॉईंट सेक्रेटरी राधेश्‍याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी एच. व्ही. आरगुंडे, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे आदींसह इतरही प्रवाशांचा समावेश आहे. बरोबर एका तासाने ते मुंबईला पोचले.


-- Esakal

1 comments:

satyam said...

Good news for Nandedians residing in Delhi.
Number of people were waiting for Flight Connectivity to Nanded.

Post a Comment

Post a Comment