Saturday, March 8, 2008

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार …

Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.

मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.







भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.








याच
काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा. या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.

कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची - चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली. पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.

कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो, कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु, अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.

बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्‍या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.

अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक…..


साभार : http://aryachanakya.wordpress.com/

0 comments:

Post a Comment

Post a Comment