Saturday, September 27, 2008

* गुरु - ता - गद्दीचे काम पूर्ण करण्याचा पहिला मान आसना नदीच्या पुलाला *

गुरु - ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त तसेच जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गतच्या नदीवरील आणि शहरातील उड्डाण पुलांची कामे दररोज नव्या अडथळ्यांचा सामना करीत असतांना सर्वात उशिरा मंजूरी मिळूनही सर्वात अगोदर वाहतूक सुरु करण्याचा मान आसना नदीवरील पुलाला मिळाला आहे.
सा. बां. विभागाच्या राज्य मार्ग प्रकल्प शाखेने दिलेल्या मुदतीत केवळ कामच पूर्ण करुन दाखवले नाही तर स्पर्धात्मक निविदेतून दोन कोटी रुपयांची बचत केल्याने हे काम सर्वाच्या नजरेत भरण्यासारखे आहे.


येत्या दि. ४ ऑक्टोबरपासून हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असून पंतप्रधान डॉ.
मनमोहन सिंघ, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे.


पुलाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून, वाहतुकीची चाचणीही यशस्वी झाल्याचे सुत्रांनी सांगितले.


आसना नदीवरील पुल हा नांदेड, अकोला व अमरावती तसेच सोलापूर - नांदेड - नागपूर या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा मोठा दुवा आहे.
या पुलाची उंची जमिनीपासून १२ तर समुद्रसपाटीपासून ३५४.७१५ मीटर इअतकी कमी असल्याने गोदावरीच्या पुराचे पाणी तुंबले की आसना नदीला पूर येऊन वाहतूक ठप्प होत होती.

त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्यासाठी शेजारीच नव्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ कोटी ८७ लाख ही कामाची अंदाजीत किंमत असली तरी अहमदपूरच्या राजदीप बिल्डकॉन कन्स्ट्रक्शनने स्पर्धात्मक निविदा कमी दराची भरून शासनाचे २ कोटी रुपये वाचविले आणि केवळ ७ कोटी ८८ लाख रुपयात काम करताना, वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य दिले.

नांदेडमधील पुलांप्रमाने या पुलाच्या कामातही अडथळे आले, परंतु बांधकाम खात्याच्या राज्यमार्ग प्रकल्प विभागाने जमिनीच्या मोबदल्याचा गुंता काम सुरु करतानाच सोडवत सर्व अडथळे पार केले.
जवळपास २ कोटी रुपयांचा मावेजा पुल व त्याला जोडणारया रस्त्यासाठी शेतक-यांना उपलब्ध करुन दिला.

गेल्या दि. ८ नोव्हेंबर २००७ रोजी नव्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. २०० मजुरांच्या मदतीने ३५० मिटर लांब, साडेसात मीटर रुंद आणि जमिनीपासून १८ मीटर उंच आकाराच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. ३० नोव्हेंबर २००८ ही काम करण्याची अंतिम मुदत होती.


गुरु - ता - गद्दी अंतर्गत या विभागाला सर्वात शेवटी हे काम दिल्या गेले. परंतू अधिक्षक अभियंता सुनील वांढेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. काळेकर, उपअभियंता के. आर. पाटील, सहाय्यक अभियंता एस. एस. हाके यांनी 'राजदीप'चे सहाय्यक महाव्यवस्थापक विश्वास खडकीकर यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करुन दिवस - रात्र मोठ्या यंत्रणेचा वापर करुन मुदतीपूर्वीच काम करुन घेतले.

या पुलाच्या दोन्ही बाजूचे जोडरस्त्यांचे काम पाटील कन्स्ट्रक्शनच्या वतीने ठेकेदार गणपतराव मोरगे व त्यांच्या सहका-यांनी पूर्ण केले आहे.

--- गोविंद करवा
प्रजावाणी २७ सप्टेंबर २००८



:: काही छायाचित्रं ::




0 comments:

Post a Comment

Post a Comment