तरिही पुस्तकात कंधारच्या इतिहासाबद्दल वाचणारे, शाळेत इतिहास या विषयात शिक्षकांकडून ऎकणारे पण आपल्याच जिल्ह्यातील कंधार येथे न जाणारे काही महाभाग असतातच.
असो, हा लेख वाचल्यानंतर तरी ते कंधारला एकदा जाऊन येतील अशी अपेक्षा करूयात.
तर मी सांगत होतो कंधारबद्दल.
राष्ट्रकूट राजवटीत कंधार हे एक मुख्य शहर होते.
कंधार येथे उत्खननात सापडलेल्या एका राष्ट्रकूटकालीन शिलालेखाहून दहाव्या शतकातील कंधार येथे केल्या गेलेल्या बऱ्याच बांधकामांबद्दल माहिती मिळते.
हा शिलालेख सर्वप्रथम श्री. भट्टाचार्य आणि डॉ. सिरकार यांनी शोधून काढला असे कळते.
कंधार येथे केल्या गेलेल्या उत्खननांमधे आजपर्यंत बऱ्याच राष्ट्रकूटकालीन मूर्ती आणि शिलालेख सापडलेले आहेत.
यावरून कळते की त्याकाळी कंधार हे किती महत्त्वाचे शहर असेल.
१९८२ साली डेक्कन कॉलेज, पुणे यांनी केलेल्या उत्खननात ६२ फूट उंचीची क्षेत्रपालाची मूर्ती मिळाली.
त्या मूर्तीच्या पायाची लांबी १.७० मीटर आहे तर रूंदी ०.६२ मीटर आहे.
सध्या त्या मूर्तीचे अवशेष कंधार येथील किल्ल्याच्या आवारातच ठेवलेले आहेत.
कंधारचा किल्ला हा भुईकोट किल्ल्यांच्या प्रकारात मोडतो.
हा किल्ला राष्ट्रकूटांच्या काळात बांधला गेलेला आहे आणि नंतरच्या इतर राजांनी आपापल्या कारकिर्दीत त्याची डागडुजी केली असावी.
हा किल्ला जवळपास २४ एकरांमधे पसरलेला आहे असून किल्ल्याभोवती पाण्याचा एक मोठा खंदक आहे.
किल्ल्यात सध्या मोठ्या प्रमाणावर डागडुजी सुरू असल्यामुळे किल्ल्याचे मुळ वैभव नष्ट झाले आहे, तरीही किल्ल्याच्या आतील भागांत काही जागा अगदी जशास तशा आहेत.
कंधारचा हा भुईकोट किल्ला कंधार शहरापासून ४ कि.मी. अंतरावर आहे.
कंधारमध्ये पाहण्यासारखी अजून बरीच ठिकाणे आहेत :-
१) जगतुंग समुद्र :-
हा भव्य तलाव म्हणजे राष्ट्रकूटकालीन पाण्याचा साठा करण्यासाठी बांधलेले तळे होय.
दहाव्या शतकात बांधलेला हा तलाव आजही उपयोगात आणला जातो.
ह्याच्या भव्य आकारामुळे याला जगतुंग समुद्र म्हणतात.
२) अष्टभुजा खडंकी देवी :-
जगतुंग तलावाच्या काठावरच हे अतिशय जुने असे मंदीर आहे.
या मुर्तीची मान थोडी तिरकी आहे हे इथके वैशिष्ट्य.
इथून जगतुंग तलावाचे दृष्य अतिशय विलोभनीय दिसते.
३) हाजी सैय्या दर्गा :-
चौदाव्या शतकात एक मोठे सुफी संत सय्यद सईउद्दीन रफाई हे कंधार येथे वास्तव्यास होते.
इसवीसन १३४८ मध्ये अजून एक मोठे सुफी संत हजरत शेख अली सांगडे सुलतान कंधारमध्ये होऊन गेले.
ह्या दर्गेत उंचावर बांधलेली एक लोखंडी साखळी आहे. असे म्हणतात की तुम्ही जर त्या साखळीला हात लावला तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
४) राष्ट्रकूट संग्रहालय :-
कंधार येथे केल्या गेलेल्या उत्खननांमध्ये ज्या मूर्ती सापडल्या आहेत, त्यांपैकी बहुतेक मूर्ती या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
१९९२ साली या संग्रहालयाचे उद्घाटन झाले आहे.
५) सात शिवलींग मंदीर :-
राष्ट्रकूट संग्रहालयाच्या पायथ्यालाच हे नवीनच बांधण्यात आलेले मंदीर आहे.
ह्या मंदीराचा आकार हुबेहूब शिवपिंडीसारखा आहे.
मुख्य शिवपिंड हे सात छोट्या छोट्या शिवपिंडींपासून बनविलेले आहे.
हे मंदीर मन्याड नदीच्या अगदी काठावरच आहे.
६) घागरदरा :-
घागरदरा इथे महादेवाचे मंदीर आहे.
घागरदरा हे ठिकाण कंधारपासून २२ कि.मी. अंतरावर आहे.
अतिशय शांत, निसर्गरम्य अशा या ठिकाणी आल्यावर तुम्हाला इथून परत जावेच वाटणार नाही.
मंदीरापासून थोड्याच अंतरावर एक छोटेसे धरण बांधण्यात आलेले आहे.
उन्हाळ्यात जेव्हा नदीच्या पात्रात पाणी कमी असते, तेव्हा तुम्ही चक्क पात्रातूनच धरणापर्यंत पायी जाऊ शकता.
हा अनूभव निश्चितच न विसरता येण्यासारखा असतो.
काय मग नांदेडीअन्स, कधी निघणार कंधारला ?
:: फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ::
इथे क्लिक करा.
इथे क्लिक करा.
2 comments:
good work sourabh
thank you :)
Post a Comment