रयतेचा राजा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
त्यानिमित्त या युगप्रवर्तक महापुरूषाला नांदेडीअन्सतर्फे मानाचा मुजरा !
शिवरायांच्या जडणघडणीत राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊमाँसाहेबांचा वाटा फार मोलाचा आहे.
त्यांनीच शिवरायांच्या बालमनावर सुसंस्काराची शिल्पे कोरली.
शिवरायांनी आयुष्याच्या आरंभीच स्वराज्य संस्थापनेचा नेक निर्धार केला आणि तो जिद्दीने सिद्धीस नेला, यामागची प्रेरणाही जिजाऊमाँसाहेबांचीच.
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून आग्रा येथून मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली.
शिवरायांनी दगाफटका करू पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटे तोडली आणि त्याला जीवनभराची अद्दल घडविली.
दुष्टबुद्धीने आणि दगाफटका करण्याच्या हेतूने भेटीस आलेल्या अफजलखानाचा तितक्याच चातुर्याने वध केला.
परस्त्री मातेसमान मानणाऱया शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी-चोळीचा आहेर करून सन्मानाने परत पाठविले.
ह्या झाल्या शिवरायांच्या जीवनातील काही नाट्यमय आणि अद्भूत घटना.
काही लोक या नाट्यमय घटनांमध्येच शिवरायांचे मोठेपण शोधण्याचा प्रयत्न करतात.
वास्तविक शिवरायांचे मोठेपण यात दडलेले आहे की शिवरायांनी शत्रूसाठी लढणाऱ्या आणि मरणाऱ्या मावळ्यांचे संघटन केले.
त्यांना त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.
या मावळ्यांचे लढाऊ सामर्थ्य स्वराज्यस्थापनेच्या कामी सत्कारणी लावले.
शिवरायांनी मावळ खोऱ्यातील दगडाधोंड्यांमध्ये प्राण फुंकले आणि त्यांच्यात स्वराज्यस्थापनेची चेतना जागविली.
शिवरायांचे मोठेपण यात दडले आहे की त्यांनी जिवाला जीव देणाऱ्या माणसांचा ताटवा उभा केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रयतेचे राज्य स्थापन केले, हा समकालीन आणि उत्तरकालीन मराठ्यांना पुरून उरणारा शिवरायांचा तेजस्वी असा वारसा आहे.
दुर्दैवाने शिवरायांना फारच अल्प आयुष्य लाभले.
त्यांचे सारे आयुष्य अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी लढण्यात खर्ची पडले.
जर त्यांना दीर्घायुष्य आणि स्वास्थ्य लाभले असते तर त्यांनी देशात विविध क्षेत्रांत आमूलाग्र क्रांती घडवून आणली असती, असे त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता लक्षात येते.
शिवरायांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व हे मोठे रोमहर्षक तसेच त्यागाची, संघर्षाची व समर्पणाची प्रेरणा देणारे आहे.
त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नेटाने पुढे चालविणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल.
Thursday, February 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment