Monday, February 2, 2009

सर्पविज्ञान, पर्यावरणविषयक जनजागृती यात्रा नांदेडला येणार

समाजात सापाबद्दल समज, गैरसमज आहेत. साप चावला की माणूस मरतो, हा सुद्धा समज आहे, याबाबत महाराष्ट्र शासन वनविभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व औरंगाबाद महापालिकेचे प्राणिसंग्रहालय यांच्या वतीने महाराष्ट्रात सर्पविज्ञान व पर्यावरण जनजागृती यात्रा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ही यात्रा ता. दोन फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक व्ही. जे. वरवंटकर यांनी शनिवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, की या यात्रेचे नेतृत्व जळगावचे राजेश ठोंबरे हे करत आहेत. गेल्या मंगळवारी (ता. २७) औरंगाबाद येथून ही यात्रा सुरू झाली. जालना, बीड, लातूर आटोपल्यानंतर नांदेड जिल्ह्यात ता. दोन फेब्रुवारी रोजी प्रवेश करणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर माळेगाव यात्रा येथे ही यात्रा येईल. त्यानंतर माळाकोळी, लोहा, सोनखेडमार्गे नांदेड मुक्कामी येईल.
लोकमान्य मंगल कार्यालय, विद्युत भवनजवळ यात्रेचा मुक्काम राहील. बुधवारी (ता. तीन) सर्पविज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी राधेश्‍याम मोपलवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. महापालिकेचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, शल्यचिकित्सक डॉ. एस. पी. पाटील, माजी आमदार व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पी. जी. दस्तुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.


एका सुसज्ज वाहनातून मांडोळ, डुलक्‍या, घोणस, ट्रिंकेट, धूळनागीण, कवड्या, धामण, रुखई, अजगर, मांजऱ्या, हरणटोळ, हिरवा घोणस, फुरसे, मन्यार, नाग अशा सर्पाच्या अठरा ते वीस जाती या यात्रेत राहतील. याबाबतचे नियम पूर्णपणे पाळून मोठ्या काचेच्या पेटीतून आवश्‍यक त्या फलकासह हे प्रदर्शन विद्यार्थी व नागरिकांना निःशुल्क पहावयास मिळेल. याबरोबरच सर्पाची माहिती देणारी विविध पुस्तके, सीडी, सर्प घरात आल्यास सहजपणे उचलून दूर नेता येईल, अशा विशेष प्रकारच्या काठ्या, याबाबीही सर्पयात्रेत उपलब्ध असतील. ग्रामीण भागात सप्रयोग व्याख्याने देईल, यात्रेत पंधरा सर्पमित्रांचा चमू असेल. यात्रेचे नेतृत्व राजू ठोंबरे, गजेंद्र सुरकार, उल्हास ठाकूर, अमित सय्यद हे करत आहेत. नांदेडला ही यात्रा आल्यानंतर दहा ते पंधरा किलोमीटर परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना उद्‌बोधन करण्यात येईल.


--ई-सकाळ

0 comments:

Post a Comment

Post a Comment