Wednesday, May 20, 2009

महापुरूषाच्या पुतळ्याने महापालिका कामाचे पितळ उघडे पाडले !

आठवड्याभरापुर्वीच झालेल्या पावसामुळे शहारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नव्यानेच लावण्यात आलेला रंग निघून गेला होता आणि त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर दोन ठिकाणी बसेसच्या काचासुद्धा फोडल्या होत्या.

त्याच बातमीच्या अनुषंगाने श्री. ऋषिकेश कोंडेकर यांनी बुधवार, दि.२० मे २००९ रोजीच्या दैनिक समिक्षामध्ये एक डोळ्यात अंजन घालेल असा लेख लिहीला आहे.
तोच लेख मी इथे पोस्ट करत आहे.


नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने महापुरूषांच्या पुतळा सुशोभिकरणावर झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या खर्चावर पाणी फेरले गेले. पुन्हा एकदा गुरू-ता-गद्दीच्या कामातील पडद्यामागचा कारभार आता हळूहळू पुढील नियमीत पावसाने पावसाळ्यात जनतेसमोर येतो की काय अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

गुरू-ता-गद्दीचा सोहळा म्हणजे शहराला मिळालेले एक 'वरदान’ होते.
याच सोहळ्याने नांदेड शहराला विकासासाठी करोडॊ रूपयांचा निधी प्राप्त करून दिला, पण म्हणतात ना "दैव देते पण कर्म नेते", तशीच गत आता शहरवासीयांची होते की काय असा प्रश्न सामान्य जनाच्या मनात घर करून बसला आहे. प्रश्नाला वाचा फोडायला कोणीही समोर येत नाही हे पाहून महापालिकेने केलेल्या गैरकारभाराच्या उघडकीची सुरूवातही शिवरायांच्या पुतळ्यालाच करावी लागली अन शेवटी पुतळ्याने आपले लढवय्ये रूप दाखवून दिले.
बाकी महापुरूषांचे पुतळे मात्र शांत असून बिचारे गांधीबाबा मात्र आपल्या हातात काठी घेऊन तटस्थ अवस्थेत हे करोडो रुपयांचे वाटोळे आपल्या नजरेने पहात स्तब्ध उभे आहेत.

गुरू-ता-गद्दीमुळे करोडो रूपये खर्च करून तात्पुरते निवारे, रस्ते, पाण्याच्या सोयी, वीज व इतर सुविधांवर कसा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आणि त्यावर शेवटी कसे पाणी फिरले हे चित्र अद्यापही नांदेडीअन्स विसरले नाहीत.
शहराच्या मुख्य हॉटमिक्स रस्त्यावर कॉंक्रीटची भर टाकून उंचच उंच रस्ते शहराची की कंत्राटदाराची आर्थिक स्थिती उंचावीत आहेत, असाही प्रश्न सामान्यांच्या मनात आहेच.
अहो इतकंच काय, प्रथम रोड करायचा व नंतर मधोमध ड्रेनेज लाईन किंवा पाईप लाईनसाठी खोदायचा. यात कसले नियोजन आहे हे तज्ञ अभियंत्यालाही कळणार नाही. पण पैसे उपलब्ध आहेत ना, मग ते ठराविक कालावधीत खर्च झालेच पाहिजेत म्हणून तर हा सारा खटाटोप नाही ना ?
आजपर्यंत शहरातल्या ओव्हरब्रीजचं उदाहरण घेतलं तर शिवाजीनगरचा ब्रीज अधुरा तर हिंगोली गेटचा एका पायाचा.
रस्ता रूंदीकरणामध्ये पादचारी मार्गासाठी भलीमोठी जागा, रस्त्यालगतच पार्किंगची सोय पण पार्किंग मात्र रस्त्यावरच.
बिचारे पोलिस तरी काय करतील, शेवटी तीसुद्धा माणसंच आहेत ना!
शहराच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे रस्त्याची रूंदी वाढविणे आवश्यक होते, ती वाढलीही पण पादचारी आणि सायकलमार्गामुळे रस्ते प्रसरण पावण्याऎवजी आकुंचनच पावले.

ऎवढा सगळा खटाटोप फक्त सुंदर नांदेडसाठी आणि कराचा बोजा मात्र सामान्य नागरिकांच्या माथी.
डोक्यावर अफाट कर्जाचा बोजा पडायला लागल्यावर जनतेला या सुंदर संकल्पनेचा आस्वाद तरी कसा घेता येईल ?

पण काही असो, पहिल्याच अवकाळी पावसाने महापालिकेच्या गुरू-ता-गद्दी कार्यक्रमादरम्यान झालेल्या विविध कामातील गैरप्रकार उघडकीस येण्याची सुरूवात महापुरूषाच्या पुतळ्यापासून झाली आणि आता नियमीत पावसाळा कशा-कशावर पाणी फेरतो आणि किती जणांना घेवून बुडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 comments:

Post a Comment

Post a Comment