Thursday, May 7, 2009

‘परिस्थितीच्या अभ्यासा’साठी शीघ्र कृतिदल नांदेडमध्ये

जातीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या राज्यातल्या जिल्ह्य़ांची यादी तयार झाली असून त्यात नांदेड अग्रभागी आहे, असे सांगण्यात आले.
या पाश्र्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास

करण्यासाठी शीघ्र कृतिदलाचे पथक येथे दाखल झाले आहे.

क्षुल्लक कारणावरून नेहमी घडणाऱ्या दंगलीसंदर्भात राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणा यांनी अभ्यास केला.
ज्या जिल्ह्य़ात दंगली होतात अशा जिल्ह्य़ांची यादी तयार करण्यात आली आहे. दंगली, नक्षलवादी समस्या, बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे कार्य व अन्य बाबींचा अग्रक्रम लावण्यात आला आहे.
दंगलीत नांदेड अग्रभागी असल्याचे स्पष्ट झाले; तर अन्य बाबीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शहरातील दंगली नेहमीच क्षुल्लक कारणावरून होतात.
बळाचा वापर केल्याशिवाय ही दंगल नियंत्रणात येत नाही, असे वेळोवेळी स्पष्ट झाल्याने किंवा गुप्तचर यंत्रणांनीही तसा अहवाल दिल्याने त्या जिल्ह्य़ाचा अभ्यास करण्यासाठी शीघ्र कृतिदलाच्या दक्षिण विभागातील बटालियनचे पथक नांदेडात दाखल झाले आहे.
हे पथक सर्वच अतिसंवेदनशील, संवेदनशील भागाचे सर्वेक्षण करणार आहे.
इत्थंभूत माहिती घेऊन मंदिर, मशीद, विहार, चर्च, गुरुद्वारा याची तपशीलवार तसेच वेगवेगळ्या मिरवणुकांचे मार्ग, वाद होणारी ठिकाणे, अंतर्गत रस्ते, टोलेजंग इमारती याची संपूर्ण माहिती घेऊन हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे, असे सांगण्यात आले.

भविष्यात जातीय किंवा कोणत्याही कारणाने दंगल झाली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृतिदलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
संपूर्ण शहराची माहिती त्यांना असावी या उद्देशानेच या पथकाचा अभ्यास दौरा असल्याचे सूत्रांनी सांगितले.


:: Source ::
Loksatta

0 comments:

Post a Comment

Post a Comment