Friday, October 9, 2009

सलमान खान येणार

अशोकरावजी चव्हाण हे नांदेडला निवडणूकीत प्रचारासाठी सिने-अभिनेत्यांना आणणार हे जणू समिकरणच झालेआहे.
लोकसभा निवडणूकीत त्यांनी सुनिल शेट्टी, राजू श्रीवास्तव इत्यादी मोठमोठ्या कलाकारांना बोलाविले होते.

विधानसभा निवडणूकीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकून चक्क सुपरस्टार सलमान खानलाच पाचारण केले आहे.
आता सलमान खान कोण असं विचारू नका.

तर सल्लू भाई हे उद्या कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेड जील्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
सकाळी .०० वाजल्यापासून भोकर, अर्धापूर, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर येथे त्यांच्या जाहीर सभा होणारआहेत.

इतक्या मोठ्या सुपरस्टारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होणार हे निश्चित. ‍


ता. क. :- ४ वाजून २५ मिनिटं
हुश्श्श !
सलमानला विमानतळापर्यंत निरोप देऊन आलो बुवा. :p
सलमान खानलासुद्धा दोन हात, दोन पाय आहेत हे माहित असूनही एका अनामिक ओढीने त्याच्या गाडीच्या मागे माझी गाडी दामटीत राहीलो.
सोबत माझ्यासारखेच शेकडो लोक होते.

सलमान खान नियोजीत रस्त्यावर पोहोचेपर्यंत आम्ही सगळे शॉर्टकटने त्याच्याआधी तीथे पोहोचू लागलो.
अक्षरशः अगणित नांदेडीअन्सच्या कॅमेर्‍यांमध्ये आज सलमान खान साठविला गेला. (त्यात मीसुद्धा आहेच.)

पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार सलमान खानची गाडी राज कॉर्नर, रेस्ट हाऊस, आय.टी.आय, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, यात्री निवास चौकी इथपर्यंत शेकडो चाहत्यांच्या गराड्यात कशीबशी आली खरी पण इथून पुढे न जाता सलमान तीथे़च थांबला आणि दुसर्‍या गाडीत बसून सुसाट वेगाने पुढे निघाला.
सगळ्या चाहत्यांना वाटलं की तो आता देगलूर नाक्याकडे (पूर्वनियोजीत कार्यक्रमाप्रमाणे) जाईल म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या गाड्या तिकडे वळविल्या, पण देगलूर नाक्याला पोहोचल्यावर पोलीसांनी केलेल्या अनाऊंसमेंटवरून कळालं की सलमान इकडे येणार नाही, तो विमानतळाकडे गेलाय.

मग काय, सगळ्यांच्या गाड्या देगलूर नाक्यावरनं मालटेकडी रेल्वे स्टेशन ओलांडून विमानतळाजवळ पोहोचल्या.
सुदैवाने सलमानही नुकताच तीथे पोहोचला होता, तीथेही प्रचंड गर्दी.
विमानतळाच्या धावपट्टीवर त्याचे विमान मोठ्या दिमाखात उभे होते.
त्याने विमानांच्या पायर्‍यांवर जाऊन परत एकदा गेटपाशी थांबलेल्या सर्व नांदेडीअन्सकडे पाहून हात हलवीला आणि गर्दीतून टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज निनादू लागला.

आणि काही वेळाने सगळे नांदेडीअन्स आपापल्या घराकडे परतू लागले पण तेही सलमानला याचि देही, याची डोळा पाहून आणि त्याच्या नांदेड भेटीला कॅमेर्‍यामध्ये, मोबाईलमध्ये कायमचे साठवून.


ता.क. :- संध्याकाळची ६ वाजून १५ मिनीटं
टी.व्ही. वर बातम्या येत आहेत की सलमान खान देगलूर नाक्याला आला नाही म्हणून तीथल्या संतप्त युवकांनी बसच्या काचा फोडल्या.





0 comments:

Post a Comment

Post a Comment