Saturday, October 24, 2009

दिवाळी अंक

दिवाळीला सर्वार्थाने परीपूर्ण करणारे माध्यम म्हणजे दिवाळी अंक असतात असे माझे मत आहे.
दिवाळीला चकली, लाडू, चिवडा यांच्यासोबतच दिवाळी अंकांनाही तीतकीच मागणी असते.

मी वाचलेले आणि मला आवडलेले काही दिवाळी अंक खालीलप्रमाणे आहेत.
तुम्ही कोणते दिवाळी अंक वाचले आणि तुम्हाला त्यातले काय आवडले हे कळवायला विसरू नका. १) लोकमतच्या दिवाळी अंकाची पेपर क्वालीटी एकदम मस्त आहे.
त्यातील गुलजार यांच्या कवीता, आणि त्यांना दिलेल्या Background Images तर निव्वळ अप्रतिम.

अनंत दीक्षित यांनी "सम्राटाच्या मनातलं" (सचिन तेंडूलकरची मुलाखतवजा बातचीत) अतिशय योग्य शब्दांत सांगितलं आहे.
सचिन तेंडूलकरवर टिका करणार्‍यांनी एकदा तरी हा लेख वाचावाच.

निळूभाऊंबरोबरचे ’प्रवासवर्णन’ करणार्‍या मकबुल तांबोळींनी निळू भाऊंना डोळ्यापुढे आणून ठेवले.

शर्मिला टागोर आणि ओम पुरी यांची मुलाखतींमधून त्यांच्या स्ट्रगलबद्दल नवीन माहिती मिळाली.  

२) महा -अनुभव हा दिवाळी अंकसुद्धा फार छान आहे.

अनिल अवचट यांचे आजवर बरेच लेख वाचले होते, पण प्रत्यक्षात त्यांच्याबद्दल वाचण्याची संधी दिली या दिवाळी अंकाने.

महाराष्ट्राचे पाऊल पडले मागे - अरूण साधू आणि महाराष्ट्राचे पाऊल थबकले; ते का ? - सुहास कुलकर्णी यांच्या ह्या लेखांनी डोळ्यात जळजळीत अंजन घालण्याचे काम सहजरीत्या पार पाडले.

सांस्कृतिक संघर्षाचे धुमसते ज्वालामुखी या लेखात निळू दामले यांनी भारतातील आणि जगातील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असंतोषांची माहिती दिली आहे.

हटके चित्रपट देणार्‍या विशाल भारद्वाज यांच्या कामगिरीचा मिलिंद चंपानेरकर यांनी घेतलेला आढावा छान आहे.

अंकातील इतर कथा कवितासुद्धा छान आहेत. 3) भटकंती हे मासिक तसे माझे फेव्हरीटच आहे, पण यावेळी दिवाळी अंकात त्यांनी भारत/महाराष्ट्रापेक्षा इतर देशांचीच जास्त भटकंती घडवून आणली आहे.
एव्हढे सोडले तर बाकी प्रवासवर्णनं, लेख छान जमले आहेत.

"वाघोबाला वाचवताना" वाचत असतांना आपल्याला जाणीव होते की वाघासारखा ऎटबाज प्राणी आज कोणत्या परिस्थीतींना सामोरे जात आहे.
अगदी १०० वर्षांपुर्वी भारतात ४०,००० वाघ होते, आणि आज ......
आज उणेपुरे २ ते ३ हजार वाघच भारतात शिल्लक आहेत.

सुधीर गाडगीळांची दिग्गजांबरोबरची भंटकंती त्या दिग्गजांची अनसुनी बातें आपल्यांपर्यंत पोहोचवते.

अच्युत गोडबोलेंची खाद्यभ्रमंती तुम़च्या तोंडाला नक्कीच पाणी आणील.

मागे एकदा मिलिंद गुणाजी एका कार्यक्रमानिमित्त आमच्या नांदेडला आले होते तेव्हा त्यांनी इथेही बरीच भटकंती केली होती.
त्यावर त्यांनी वाजवलेले ’सुरीले पाषाण’ छान नाद करून गेले. (या ठिकाणांबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर ती मी माझ्या ब्लॉगवर अगोदरच पोस्ट केलेली आहे.)

शेवटच्या पानांवर दाखवलेली चित्रविचित्र घरं पाहण्याचा मोह कुणालाही होईल. (बांधण्याचा नाही.)४)  गेल्या ५० वर्षांमध्ये मराठी संस्कृतीवर आणि एकूणच मराठी जगण्यावर ज्यांचे खोल संस्कार आहेत अशा ५० व्यक्तींच्या भल्याबुर्‍या योगदानाची एक अत्यंत संक्षिप्त झलक अक्षर दिवाळी अंकाच्या सुरूवातीलाच देण्यात आली आहे, आणि हेच मला या दिवाळीअंकाचे वैशिष्ट्य वाटले.

अंकातल्या सगळ्याच कथा बर्‍या आहेत.

दिप्ती राऊत यांनी अनुभवलेली वारी वाचतांना आपणही कधीतरी अशी वारी अनुभवावी असे वाटून जाते.

मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला आणि NSG कमांडॊंचे नाव सगळ्यांच्या ऒठावर खेळू लागले.
त्याच्या कितीतरी आधी, एका NSG कमांडोबरोबर संसार करत असतांना आलेला अनुभवर आपल्यासोबत शेअर केलाय ’नियती’तून वैदेही देशपांडे यांनी.

इरावती कर्णिकांची हॅकर ही कथादेखील मस्त आहे.

गणेश मतकरींनी या दिवाळी अंकातून भारतात आजवर बनलेल्या ’गरीबां’च्या सिनेमांचा आढावा घेतला आहे.
हेदेखील वाचनीय आहे.
५)   कालनिर्णयचा दिवाळी अंक माझा सगळ्यात जास्त आवडतो तो त्यांच्या सुटसुटीत मांडणीमुळे, आकर्षक छायाचित्रांमुळे आणि मुख्य म्हणजे त्यातल्या एकंदरीत सगळ्याच कंटेन्ट्समुळे.
पण यावेळी कालनिर्णयचे काही कंटेन्ट मला जास्त भावले नाहीत.

भीष्मराज बाम यांचा ’दहशतवादाचे बदलते स्वरूप’ दत्तप्रसाद दाभोळकर यांचा ’१८५७-१९४७ फाळणीचे गुन्हेगार’ राजन रायकर यांचा ’सर जमशेदजी जीजीभॉय’ हे लेख फारच छान आणि माहितीपूर्ण वाटले.

शशिकांत काळे यांनी आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल दिलेली सखोल माहिती फारच छान आहे. 


६)   म.टा.च्या मुख्य दिवाळी अंकातले सगळेच लेख एकापेक्षा एक चांगले आहेत.
त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त आवडलेले लेख म्हणजे 'तें’ चा, "मी गोळी घालीन म्हणालो, त्याबद्दल...." आणि प्रकाश अकोलकर यांचा मुंबईवर झालेल्या अनेक आघातांचा मागोवा घेणारा "न बुजलेले घाव".

परेश मोकाशी यांचा हरिश्चंद्र धुंडिराजाची फॅक्टरी हा लेखही छान आहे.

एकंदरीत म.टा.चा हा दिवाळी अंक सर्वार्थाने परीपूर्ण आहे.


म.टा.चा दुसरा दिवाळी अंक विदर्भ-मराठवाडा विशेष आहे.

संजीव उन्हाळे यांनी बापुसाहेब काळदातेंची घेतलेली मुलाखत वाचनीय आहे.

नागेश कांगणे यांनी विदर्भाच्या पंढरीची म्हणजेच शेगावची माहिती सांगितली आहे.
त्यात त्यांनी संस्थानचा १०० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे.

वि.ल. धारूरकरांचा "वैभवशाली रूप जपणार" हा लेख अजिंठा, वेरूळ तसेच पैठण या गांवाचे रूप कसे बदलले हा सांगणारा आहे.

डॉ. सुरेश सावंत यांनी फ. मुं. शिंदेंवर लिहीलेला "अवलिया" हा लेख कसा आहे हे तुम्हीच मला सांगा, जेणेकरून मला तुमची प्रतिक्रीया पप्पांपर्यंत पोहोचवता येईल.

0 comments:

Post a Comment

Post a Comment