Tuesday, January 12, 2010

तुमच्याही मुलांच्या काळजात आहे एक कविता !


गेल्याच आठवड्यात एक उच्चविद्याविभूषित जोडपं भेटावयास आलं. या जोडप्याला एक लाडकी मुलगी आहे. अश्विनी तिचं नाव. ती पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतेय. मुलीनं अभियंता व्हावं, ही आई-वडिलांची तीव्र इच्छा. त्यादृष्टीनं तिची मानसिक, शैक्षणिक जडणघडण झालेली.

आईचा मुलीवर भारी जीव. तिच्या शिक्षणकाळात तिच्याचजवळ राहता यावं, यासाठी तिच्या आईनं तीन वर्षंबिनपगारी रजा घेतली.

मुलीचं शिक्षण सुरू होतं. मध्यमवर्गीय पालकांना जबरदस्त धक्का बसावा, अशी एक गोष्ट उजेडात येते. ही लाडकी मुलगी अभ्यासात कमी आणि साहित्यलेखनात अधिक लक्ष घालत असे. साहित्यवाचनाचं तिला वेड लागतं. त्यातूनच ती कविता लिहायला लागते... सुंदर कविता... इंग्रजीतून कविता...

राजेंद्र जोगी सुरेखा जोगी... माझ्याबरोबर बोलत होते, तेव्हा माझ्या मनात कालवाकालव होत होती. हे जोडपं आता कथेचा शेवट कुठं करणार, याचा अंदाज मला येऊ लागला....गेले काही दिवस वैफल्यग्रस्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पाहून संशयाचे, काळजीचे अनेक ढग माझ्या मनात निर्माण होत होते.

'आमच्या मुलीला काहीतरी समजावा. ती अभियंता व्हावी, असं स्वप्न आम्ही बाळगलं...ही कविता मध्येच कुठून आली...? तिला तुम्हा समजावा... कवितेपासून दूर करा... अन्यथा तिचं करिअरकडं दुर्लक्ष होईल... आमची स्वप्नभंग पावतीलं...,'' अशी काहीतरी अपेक्षा ते व्यक्त करतील; मला कौन्सिलिंग करायला सांगतील, असा माझा अंदाज...

माझा अंदाज खोटा ठरवून हे जोडपं म्हणालं, 'आम्हाला आमच्या मुलीच्या कवितांचा अभिमान वाटतो. तिनं आपल्या कविता इंटरनेटवरून जगभरातील अनेक प्रकाशकांकडे पाठविल्या. त्यातील काहींनी विधायक प्रतिसाददिलांय... समजा कोठूनच मदत मिळाली नाही तर आम्ही तिचा काव्यसंग्रहही काढू.''

पालकांचं म्हणणं ऐकून मला आनंद वाटत होता; पण हे ते सारं मला का सांगताहेत, कळत नव्हतं. मी म्हणालो, 'तुमचे सारे निर्णय चांगले आहेत. मला का सांगत आहात हे सारं?''

ते म्हणाले, 'कोणाशी तरी शेअरिंग करायला पाहिजे म्हणून.''
मी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला; त्यांना खूप बरं वाटलं.

आपल्या भावी अभियंता मुलीच्या काळजात उगवलेल्या आणि उगवू पाहणाऱ्या अनेक कवितांचं संवर्धन त्यांनी करायचं ठरवलं. तिच्या सर्जनशीलतेला पाठिंबा द्यायचं ठरवलं. पालक म्हणून आपल्या स्वप्नाखाली तिची कविता चिरडू नये, असा निर्धार करण्याचंही ठरवलं.

'आमच्या मुलीच्या कविता एकदा वाचा,'' अशी विनंती करून जोडपं पाठमोरं झालं...
मी ठरवलं होतं, तिच्या कविता वाचण्याचं....मी डोळ्यांसमोर एक स्वप्नही रंगवत होतो... पालकांनी आपल्याच वाटांवर चालण्याची सक्ती आपल्या मुलांना केली नाही तर....? मुलांच्या ओंजळीत आणि त्यांच्या डोळ्यांत असलेल्या त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचं ठरवलं तर...?
व्यवहारी पालक या निर्णयाचं स्वागत कसं करतील, माहीत नाही; पण या पालकांनी मात्र धाडस केलं आणि ते म्हणजे आपली स्वप्नं मुलीवर लादण्याचं..

(प्रा. राजेंद्र जोगी, मोबाईल क्रमांक - 9422754833)
(प्रा. सुरेखा जोगी, मोबाईल क्रमांक - 9422754933)-- उत्तम कांबळे (मुख्य संपादक)
सकाळ वृत्तसेवा.माझ्या मते त्या पालकांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.
Hats Off To Them !

त्या पालकांच्या निर्णयाबद्दल किंवा एकंदरीतच अशा प्रकारे उद्भवणार्‍या परिस्थींबद्दल तुमचे काय मत आहे ?

1 comments:

Anand said...

निर्णय बरोबर आहे, मुलांनी काय बनावं हे सर्वस्वी मुलांनी जर ठरवलं तर ते जास्त उपयोगी आहे. गरज पडल्यास त्यांना फक्त सहाय्य करावं पण फोर्स करु नये. यात मुलांनी सुद्धा आपल्या पालकांच्या ऐपती प्रमाणे कोर्सेस वगैरे पाहीले पाहीजेत...

Post a Comment

Post a Comment