Wednesday, February 11, 2009

जिंदगी का सफर, है ये कैसा सफर....

रात्रीचे साधारणतः आठ वाजण्याची वेळ, शिवाजीनगरच्या ओव्हरब्रीजवर वाहनांची वर्दळ.
कुणी जीवनाचा चढाव उतरत आहे तर कुणी चढत आहे.
या साऱ्या गर्दीत एक मालवाहू रिक्षा मात्र संथगतीने शिवाजनगरच्या दादऱयावरून कलामंदीरकडे जात आहे.
रिक्षात आज वेगळाच माल आहे........

रिक्षावर एका व्यक्तीने धरलेली एक अंधूक प्रकाशातील बत्ती जीवनाचा शेवट दर्शविणारी.
चित्र थोडं नेहमीपेक्षा वेगळचं.
गाडिचा वेग वाढवून मालवाहतूक टेम्पो जवळ आल्याबरोबर अगरबत्तिच्या सुगंधाचा दरवळ आणि वाढलेले काळजाचे ठोके......

आज मालाएवजी चक्क एक प्रेत गाडीत सजवून ठेवलेलं.
दोन्ही बाजूला ४-४ माणसं खाली बसलेली तर एक हातात बत्ती घेऊन उशाशी उभा.
समोर गाडीच्या टपावर २ माणसं.
एक हातात मडकं घेवून तर दुसरा त्याला अगदी गच्च धरून सांभाळायला.

ड्रायव्हरच्या दोन बाजूला दोन वयस्क माणसं विचारमग्न अवस्थेत.
सगळा तेरा माणसांचा बाजार आणि तोही एका मालवाहतूक गाडीमध्ये.
या गाडीच्या मागे-पुढे गाडी तर सोडाच, पण साधी सायकलही नाही.
मनात एकच प्रश्न, 'किती गतिमान झालं आपलं जीवन ?'.

मुल जन्माला येताना घाई, त्यासाठी देखील मुहूर्त पाहणं, त्यात आणखी काही प्रकार.
पण मृत्युला सामोरे जावून घाटावर जाताना देखील गडबड.
आयुष्याचे तीन-तेरा तेही फक्त तेरा माणसांच्या साक्षीने ?

मन विमनस्क अवस्थेत.
घड्याळाच्या काट्याबरोबर चालणारे जीवन आज जन्म आणि मृत्यूच्या चक्रालादेखील आपल्याबरोबरच पळवत नसेल ना ?
आणि पळवतच असेल तर इतकी जगण्याची नव्हे, पळण्याची धडपड कशासाठी ?
समृद्ध भारतीय परंपरेत मरणादारी आणि तोरणाघरी जावे असा प्रघात आहे.
एक वेळा तोरणाघरी गेलं नाही तरी चालेल पण मरणाघरी जरूर जावे अशी आमची संस्कृती सांगते.

मग या संस्कृतीचे पाईक आम्ही आमची माणूसकी विसरत चाललो की काय ?
माणसाला घाटावर पोहोचविल्यानंतर तिथल्या स्मशानशांततेला आम्ही घाबरत तर नाही ना ?
किंवा जीवनातील अंतीम सत्याला सामोरे जायची आमची हिंमत राहिली नाही काय ?

हे सारं चित्र पाहून कदाचीत तो प्रेतात्मा म्हणतं असेल :-

कफन माझे दूर करूनी
पाहिले मी बाजूला,
एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला
हे सारे दृष्य बघुनी
माझेच आसू आले गालावरी,
जन्मभर हसूनी मी
रडलो असा मेल्यावरी.



ऋषिकेश कोंडेकर
दैनिक समिक्षा
दि. ११ फेब्रुवारी २००९

1 comments:

Shailesh said...

rushikesh .... funeral procession ...as usual just passes by and many of us just try to shrug off the thought of one day coming face to face with the reality , I am amazed and appreciate the courage and sensitivity with which you have written this article...keep it up ....and keep writing

Post a Comment

Post a Comment