Friday, March 26, 2010

'स्टॅंडिंग'मध्ये महापौरांचा घरचा आहेर

नांदेड - महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (ता. 25) पार पडली.
या सभेत सफाई कामगारांची भरती आणि जवाहरलाल नेहरू योजनेतील बसेस चालविण्याबाबत चर्चा झाली.
दरम्यान, सुरवातीला महापौर प्रकाश मुथा यांनीच महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

स्थायी समितीच्या बुधवारी (ता. 24) झालेल्या अंतर्गत अनौपचारिक बैठकीनंतर गुरुवारी सभा पार पडली.
या सभेत विविध 38 ठरावांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या सुरवातीलाच स्थायी समितीचे सदस्य असलेल्या महापौर प्रकाश मुथा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांअभावी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
शहरातील काही कामे पूर्ण होण्याच्या अगोदरच घाईघाईने उद्‌घाटन उरकण्यात आल्याबद्दलही त्यांनी टीका केली.
स्वतः महापौर असतानाही श्री. मुथा यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली, त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आपले म्हणणे मांडल्यानंतर सभा संपण्यापूर्वीच श्री. मुथा यांनी सभेतून काढता पाय घेतला.
त्यानंतर सभा सुरळीत पार पडली.
जवाहरलाल नेहरू योजनेत मंजूर झालेल्या 30 बसेस महापालिकेला प्राप्त झाल्या असून अजून एकही बस रस्त्यावर धावली नाही.
या बसेस चालविण्याचा ठेका पुणे येथील प्रसन्ना कंपनीला देण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.
या स्पर्धेत सध्याची लालपरी चालविण्याचा ठेका असलेली सिद्धेश्‍वर कंपनीही होती.
या सभेला स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी संबोधित केले.
या वेळी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, सुरेश कळसकर, शशीमोहन नंदा, महेश खोमणे, अब्दुल शमीम, तुलजेश यादव, रज्जाक, संगीता बियाणी, दीपाली मोरे आदींसह सदस्य उपस्थित होते.


Source --> Esakal.

0 comments:

Post a Comment

Post a Comment