Thursday, February 25, 2010

पाण्याचा अपव्यय की सदुपयोग ?

कोण म्हणतो पाण्याचा अपव्यय होत आहे ?

लातूर फाट्याजवळील फुटलेल्या जलवाहिनीतून तुम्ही तुमच्या गाडीची अशा प्रकारे फ्री वाटर सर्व्हीसिंग करून घेऊ शकता.


Wednesday, February 24, 2010

सचिन द बादशाह.

साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या दुसर्‍या वनडेमध्ये सचिन तेंडूलकरने तडाखेबाज द्विशतक झळकावले आहे.
अशा प्रकारे तो जगातला पहिला द्विशतक झळकावणारा बॅट्समन झाला आहे.

त्याच्या २०० धावांच्या जोरावर भारतीय टीमने ४०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. (सेहवाग-९, दिनेश कार्तिक-७९, युसूफ पठान-३६ आणि धोनी-६८)

सचिन तेंडूलकर नावाच्या व्यक्तीचे वर्णन आता कोणत्या शब्दात करावे तेच सुचत नाहीये.

आम्हाला तुझा अभिमान आहे सचिन.
यू रॉक.

Friday, February 19, 2010

शिवजयंती


छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.




:: आज दिवसभरातील शहरातील वेगवेगळे कार्यक्रम ::

शिवजन्मोत्सव सोहळा
वेळ :- सकाळी ११ वाजता
स्थळ :- यशवंतराव चव्हाण वसतीगृह, नवा मोंढा.

मिरवणूक व प्रबोधन
वेळ :- १९ फेब्रु. दु. ३.०० वाजता भव्य मिरवणूक.
२३ फेब्रु. सायं. ६ वाजता शाहीर भगवान गावंडे यांचा प्रबोधनपर कार्यक्रम.
२५ फेब्रु. सायं. ६ वाजता श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान.
स्थळ :- जिजाऊ सृष्टी, सिडको.

भव्य मिरवणूक
वेळ :- सायं. ४ वाजता
स्थळ :- पावडेवाडी नाका

Tuesday, February 9, 2010

BSNL वाले बाबा की जय !



तुम्हा सगळ्यांना माहित असेलच की BSNL ने आता घरपोच बील द्यायचे बंद केले आहे.
(नाही नाही, आपल्याला BSNL ऑफिसमध्ये जाऊन बील घ्यायची वेळ अजून तरी आली नाही.)

तर BSNL आता तुमच्या Landline टेलीफोनचे बील तुमच्या मोबाईलवरच SMS द्वारे पाठवणार आहे, आणि याची सुरूवातदेखील झाली आहे. (जानेवारी महिन्याच्या बीलापासून.)

दोन दिवसांपूर्वी माझ्या वडीलांच्या मोबाईलवर BSNL कडून Landline च्या बीलासंदर्भात खाली दिलेला SMS आला.
(येथे मुद्दामहूनच मी पूर्ण फोन नंबर आणि पूर्ण नाव दिलेले नाही, कारण ही आमची माहिती नाही. BSNL ने दुसर्‍यांचे बील आमच्या मोबाईलवर पाठवले आहे.)

Bill issued for No:
2462-2875**
Name: SHRI ##### JAGANNATH ########
bill date: 03-Feb-10,
Amt. Rs. 398.00.
Pls pay by 24-Feb-10.
NDAOTR-024622534**

BSNL ने हे ज्यांचे बील आमच्या नावावर फाडले आहे, ते योगायोगाने आमच्या ओळखीचेच आहेत.

BSNL आपल्या कार्यपद्धतीत बदल करत आहे ही निश्चीतच चांगली बाब आहे, पण असे कुणाचेही बील कुणाच्याही नावावर जाऊ लागले तर याला काय म्हणायचे हे तुम्हीच ठरवा.

Saturday, February 6, 2010

1411

पोस्टचे नाव वाचून ’हे काय भलतेच ?’ असे वाटले असेल ना तुम्हाला ?

आपला राष्ट्रीय प्राणी, वाघ !
आजमितीला किती उरलेत भारतात माहित आहे ?
१४११ ही संख्या आहे सध्या आपल्या भारतात शिल्लक असलेल्या वाघांची.
२० व्या शतकाच्या सुरूवातीस भारतात अंदाजे ४०,००० वाघ होते, ४०,००० !

काही जाणवतंय का मनाला ? :(

काल टी.व्ही.वर ही जाहिरात पाहिली आणि खूप वाईट वाटलं.


खालील लिंक पाहा आणि या शेवटच्या वाघोबांना जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करा कारण निसर्गाने ही शेवटची धोक्याची घंटा वाजवलेली आहे.
अभी नहीं तो कभी नहीं ।

:: या मोहिमेचे संकेतस्थळ ::
http://saveourtigers.com/index.php

:: जाहिरात ::
Save Our Tigers (Hindi)
http://www.youtube.com/watch?v=aoVx0QKamRg

Save Our Tigers (English)
http://www.youtube.com/watch?v=hRwOgGn6OmQ

Tuesday, January 26, 2010

अपरंपार



नाही, मी कुणा साधू-संताच्या महिमेबद्दल नाही सांगत आहे.
हे एका ठिकाणाचे नाव आहे.


काही दिवसांपूर्वी ऑर्कूटवर एका मित्राने मला ह्या ठिकाणाबद्दल सांगितले होते.
त्याने या ठिकाणाचे इतके चांगले वर्णन केले होते की, मी तेव्हाच ठरवलं होतं, या ठिकाणाला भेट द्यायचीच.


त्याने दिलेल्या माहितीवरून जेव्हा आम्ही मित्र अपरंपारच्या डोंगरावर पोहोचलो, तेव्हा कळालं की तो ऑर्कूटवरचा मित्र या ठिकाणाबद्दल इतके भरभरून का बोलत होता.




मित्रांनो, तुम्हीसुद्धा अपरंपारला गेलात तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की नांदेडच्या अगदी जवळ इतकं विलोभनीय, रमणीय आणि त्याचमुळे प्रेक्षणीय ठिकाण असू शकेल.


आता जास्त काही लिहीत नाही अपरंपारबद्दल.
तुम्ही स्वतः तिथे एकदा जाऊनच या.




ठिकाण :- अपरंपार


वैशिष्ट्ये :- गर्द वनराई, शहरी गोंगाटापासून दूर, नांदेडपासून फक्त ३५ कि.मी.

एक दिवसाची सहल काढण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण.


कसे पोहोचाल ? :- नांदेडहून भोकर फाट्याला जा, तिथून उजवीकडे बारड रस्त्याला लागा.

बारडच्या थोडसं पुढे पाटनूर या गावाची पाटी लागेल. (ही पाटी भोकर फाट्यापासून बरोबर १८ कि.मी.वर आहे.)

या पाटीपासून डाव्या हाताला जो रस्ता जातो, तोच रस्ता तुम्हाला अपरंपार मंदिरापर्यंत घेऊन जाईल.

पाटनूर पाटी ते अपरंपार मंदिर हे ७ कि.मी. चे अंतर आहे.


नोट :- पाटनूर पाटी ते अपरंपार मंदिरादरम्यानचे अंतर नीट लक्षात ठेवा कारण रस्त्यात कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही चुकून पुढे निघून जाऊ शकता.

अपरंपार मंदिराला जाताना पाणी आणि खाण्याचे पदार्थ घरूनच घेऊन जा कारण वर पाणी आणि जेवणाची सोय नाहीये.

आणि कृपया इतक्या निसर्गरम्य ठिकाणी पॉलिथीनच्या कॅरीबॅग वगैरेसारखा कचरा करू नका.


भेट देण्याचा उत्तम काळ :- जुलै ते नोव्हेंबर.

उन्हाळ्यात जाण्याचा विचारही करू नका.



काही फोटो :-
या फोटो पानगळीच्या काळात काढलेल्या आहेत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !



राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भारतीय जनतेला उद्देशून काल जो संदेश दिला, त्याच्यापेक्षा चांगला संदेश दुसरा कोणताच असू शकत नाही.


पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी तिच्या स्त्रोत्रांचा योग्य व आवश्यक तेव्हढाच वापर केला पाहिजे.
वनसृष्टी व प्राणीमात्रांचे संवर्धन करून पर्यावरणासाठी पोषक पावले उचलायला हवीत.





प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद !

Saturday, January 23, 2010

वाहतूक शाखा आणि मनपाचा धुमधडाका


माफ करा मित्रांनो, हा ब्लॉगपोस्ट लिहीण्यास खूप उशीर झाला माझ्याकडून.
असो, कुणीतरी म्हटलेलंच आहे 'Better late than never'.


हा ब्लॉगपोस्ट मी नांदेड शहर मनपा आणि वाहतूक शाखेला मनापासून अर्पण करतो.
मनापासून हा शब्द मुद्दामहून वापरलाय, कारण काय आहे आजकाल प्रत्येक जण माझ्या प्रत्येक वाक्यात टोमणाच शोधू लागला आहे.
अरे चांगल्या कामासाठी चांगलेच लिहीतो आम्ही.


मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की वाहतूक सुरक्षा सप्ताह ७ जानेवारी २०१० ला संपला. (अधिक माहिती.)
८ जानेवारी २०१० रोजी वाहतूक शाखा आणि मनपाने जो धुमधडाका सुरू केला, तो आजही सुरूच आहे.
तुम्ही विचार करत असाल की मी काय हे सारखं सारखं धुमधडाका, धुमधडाका लावलंय.
अहो तुम्हाला जेव्हा पूर्ण बातमी कळेल तेव्हा तुम्हीही या सगळ्या प्रकरणाला वाहतूक शाखा आणि मनपाचा धुमधडाकाच म्हणाल. (चांगल्या अर्थाने.)

त्याचे काय आहे, ८ जानेवारी २०१० रोजी फूटपाथ मोकळे करणे, अतिक्रमण हटविणे, वाहनांच्या नंबरप्लेट नियमानुसार करून घेणे आणि नागरिकांना शिस्त लावणे इत्यादी कामांसाठी पोलीस आणि मनपा यांच्यातर्फे एक मोहिम हाती घेण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत भरपूर वाहनांची चेकींग करण्यात आली, हातगाडेवाल्यांना रस्त्यावरून हटवण्यात आले, जागोजागी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
यात पोलिस प्रशासनाचे २०५, मनपाचे १०० व आर.टी.ओ.चे काही अधिकारी असे जवळपास ३२५ जण होते.

सगळ्यांना वाटलं की चहूबाजूंनी होणार्‍या टिकेमुळे वाहतूक शाखेने एक दिवसाचा पब्लिसिटी स्टंट आखला असेल.
पण दिवसेंदिवस हा वाहतूक सुधार कृती कार्यक्रम अधिकाधिक कडक होत गेला तेव्हा लोकांना याची गंभिरता आणि महत्त्व पटले.
९ तारखेला तर कलामंदीर परीसरातील हातगाडेवाल्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली.
पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर उपलब्ध होता म्हणून बरे झाले, नाहीतर परिस्थीती अजून बिघडली असती.
१४ तारखेला अण्णा भाऊ साठे चौकातसुद्धा पोलिसांत आणि हातगाडेवाल्यांमधे बाचाबाची झाली होती.
पोलिंसाचा अतिक्रमण दूर करण्याचा ठाम निश्चय पाहून नंतर काही व्यापार्‍यांनी नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्या जागेवरून स्वतःहून आपले सामान दूर केले.





पोलिसांनी केवळ हातगाडेवाल्यांनाच टार्गेट केले नाही तर दुचाकीधारकांकडूनही जबर दंड वसूल केला.
दुचाकीच्या फॅन्सी नंबरप्लेट्स बदलण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासोबत एक पेंटरच ठेवला होता, नंबरप्लेट नियमानूसार करायला.
फॅन्सी नंबरप्लेट्स व नंबरप्लेट्स नसलेल्या वाहनांवर कार्रवाई करून ’दादा, बाबा, मामा, राज, काका’ असे लिहीलेले नंबरप्लेट्स काढून जागेवरच नवीन नंबरप्लेट बसवण्याच्या अभिनव उपक्रमामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
या एकाच दिवशी तब्बल ५०० नंबरप्लेट्सच्या केसेस सॉल्व्ह झाल्या म्हणे.

हळूहळू पोलिसांनी शहरातील अनेक भागांमधे हीच कार्रवाही सुरू ठेवली आणि त्याचे यथोचीत परीणामसुद्धा दिसायला लागले.
पुर्वी अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम लागायचे, पण या मोहिमेमूळे ट्रॅफिक जॅमच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.


:: दादरा ओव्हरब्रीज ::
दादरा ओव्हरब्रीजच्या कलामंदीरकडच्या टेकऑफ पॉईंटवर जे ऑटोवाले थांबतात त्यांच्यावर वाहतूक शाखेने, पोलिसांनी अजून काहीच कार्रवाई केलेली नाही.


:: फुटपाथ स्वतंत्र झाले ::
शहरात जागोजागी पाश्चात्य पद्धतीचे फुटपाथ बसवण्यात आले होते, पण या फुटपाथवर एकतर दुकानदारांनी किंवा हातगाडेवाल्यांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे नाईलाजास्तव पादचार्‍यांना रस्त्यावरून चालावे लागायचे.
पण आता फुटपाथांवरचे अतिक्रमण काढल्यामुळे पादचारी आणि वाहनधारक दोघांनाही मदत झाली आहे.


एकूणच या धडक मोहिमुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण नांदेडच्या वाहतूकीला शिस्त मात्र लागली आहे हे नक्की.
पोलिसांनी ही मोहिम अजून काही दिवस अशीच सुरू ठेवली तर नांदेडीअन्सनाही वाहतूकीचे नियम पाळायची सवय लागेल आणि मग आपोआपच वाहतूकीला शिस्त लागेल.
पण पोलिसांनी ह्या मोहिमेत थोडी जरी ढिलाई दिली तर पहिले पाढे पंचावण्ण होणार यात काहीही शंका नाही.


:: श्रेय कुणाला ? ::
प्रत्येक वृत्तपत्र आता आपापल्या परीने ही मोहिम सुरू करण्याच्या प्रक्रीयेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्याला हे श्रेय लाटण्याचा भानगडीत पडायचे नाही पण तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो :-

ऑर्कूटवर एक कम्युनिटी आहे, "Ashokrao Chavan" नावाची, ज्यात विपूल मोळके हेसुद्धा एक सभासद आहेत.
विपूल मोळके हे वार्ड क्रमांक २२ (गोकूळनगर) इथले नगरसेवक आहेत.
याच नांदेडमधल्या वाहतूकीच्या समस्येवर आम्ही त्या कम्युनिटीत चर्चा करत होतोत आणि त्यावर विपूल मोळके यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली.
ते काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे इथे पेस्ट करतो.


"Dear saurabh i know that there is problem in the trafic signals thats not only in signal but also int the traffic of our city nanded
we means every one of nanded city shold have to follow the rules of traffic and after that only we can change the condition of traffic in nanded.
ok i will put this matter towards commissioner of nwcmc and sp of nanded as to attend u r matter and try to arrange the special meeting with both mla s of nanded ,commissioner , sp of nanded ,traffic pi of city myself , hon mayor of the city and all concern officers and hon cm also and if nessasery
thanks for complain "



२५ डिसेंबर ०९ रोजी त्यांनी हे आश्वासन दिलं आणि ८ जानेवारी २०१० पासून हा धडक कृती कार्यक्रम सुरू झाला.

आता याचे श्रेय कुणाला द्यायचे हे तुम्ही ठरवा.
वाहतूक शाखा आणि मनपाला, की नांदेडच्या वृत्तपत्रांना, की विपूल मोळके यांना, की जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना, की अमिता भाभींना बेशीस्त वाहतूकीचा अनुभव देणार्‍या त्या ऑटॊचालकाला हे तुम्हीच ठरवा.
एक गोष्ट नक्की की या सर्व 'की' पैकी कोणतेही KEY लागलेली असली तरी फायदा मात्र नांदेडीअन्सचाच झाला आहे.